ज्योत्स्ना गाडगीळ
श्रीगजननासमोर देवदैत्यांनीही शरणागती पत्करली. त्याच्यासमोर विघ्नेदेखील चळाचळा कापू लागतात. ज्या मंगळ ग्रहाची आपल्याला भीती वाटते, त्यानेही बाप्पासमोर हात टेकले. एवढेच नव्हे, तर श्रीगणेशाने आपले नाव धारण करावे अशी प्रार्थना केली. अमंगलाचेही मंगल करणाऱ्या बाप्पाने त्याची विनंती मान्य केली आणि त्याचे नाव धारण केले. तेव्हापासून बाप्पा `मंगलमूर्ती' म्हणून ओळखला जाऊ लागला.
असा हा भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा बाप्पा सदैव आपल्यासाठी प्रेरणास्रोत म्हणून समोर असावा. म्हणून दासबोधात समर्थ रामदासांनी बाप्पाला विनवले,
ऐसा गणेश मंगळमूर्ति, तो म्या स्तविला यथामती।वांछा धरून चित्ती, परमार्थाची!
ऊँकार हे गणेशाचे निर्गुण रूप आहे. परंतु, ऊँकार उभा लिहिला असता, तो हत्तीच्या सोंडेसारखा दिसतो. यावरून त्याला गजानन, गणेश, गणपती अशी ओळख मिळाली. निर्गुण रूपात तर तो सर्वत्र व्यापून आहेच, परंतु सगुण रूपातही त्याचे रूप साजिरे आहे. आनंद देणारे आहे. मंगलमयी आहे. अशी ही मंगलमूर्ती!
हेही वाचा : हिवाळ्यात आहार कसा असावा? तर,बाप्पासारखा!
चौदा विद्या चौसष्ट कलांचा तो अधिपती. त्याचे गुणवर्णन करताना समर्थांनी आरती लिहिली, त्यात बाप्पाचे सविस्तर वर्णन केले आहे. ती आरती सर्वांनाच पाठ आहे. सुखकर्ता दु:खहर्ता असा बाप्पाचा लौकिक आहे. भक्तांना त्याचा अनुभवही येतो.
आदर्श नेत्याला आवश्यक असलेले गुण, दुसऱ्यांचे अपराध पोटात घेण्याची क्षमता, दुष्ट दुर्जनांचे तुंडन करण्याचे सामर्थ्य त्याच्यात आहे. तसेच नृत्य, नाट्य, संगीत यातही तो निपुण आहे. त्याच्याकडे दूरदृष्टी आहे. नेतृत्त्वाचे गुण आहेत. तो श्रीगणेश केवळ मूर्तीत नाही, तर मानवी देहातही स्थित आहे. मानवी देहातील मूलाधार चक्राच्या ठायी गणेशाचा वास असतो.
त्या गणरायाला साक्षी ठेवून आपणही आपल्या कार्यात त्याचे अनुकरण केले पाहिजे. शांत डोक्याने, मधूर हास्याने, आपल्या क्षेत्रात तरबेज होऊन आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात मोद अर्थात आनंद दिला पाहिजे. तिच खरी ईशसेवा.
दासांनी हा बोध लक्षात घेऊन परमार्थाचा श्रीगणेशा करावा, असे समर्थ रामदास स्वामी आपल्याला सुचवतात.