आईला नको झालेला, परंतु जगाला हवाहवासा वाटणारा मार्तंड, त्याच्या स्मरणार्थ करतात मार्तंड सप्तमी व्रत!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 18, 2021 12:17 PM2021-01-18T12:17:48+5:302021-01-18T12:21:05+5:30
ही कथा महाभारताच्या अनुशासन पर्वात वाचायला मिळते. मार्तंडाप्रमाणे आपणही जन्माला आल्यावर आपल्या गुणांनी जग जिंकून घ्यावे, हा मंत्र आपल्याला या कथेतून मिळतो, म्हणून मार्तंड सप्तमीच्या दिवशी त्याचे स्मरण करावे आणि त्याच्या नावे सूर्याला अर्घ्य द्यावे.
पौष मासाची सुरुवातच मकर संक्रांतीच्या सणाने होते. सूर्याचे उत्तर दिशेने भ्रमण सुरू होते, म्हणून या संक्रमणाला उत्तरायण असे म्हणतात. या मासात संक्रांती व्यतिरिक्त अन्य उत्सव नसले, तरीदेखील सूर्यपूजेला विशेष महत्त्व दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे पौष शुक्ल सप्तमी (१९ जानेवारी) अर्थात मार्तंड सप्तमी या दिवशी `ऊँ मार्तंडाय नम:' असा नामोच्चार करून सूर्याला अर्घ्य द्यायचे असते.
मार्तंड हे सूर्याचे एक नाव. तसेच या नावाशी निगडित एक पौराणिक कथा सांगितली जाते, की मार्तंड हा ऋग्वेदकालीन अदिती हिचा आठवा मुलगा. हा नको असताना झाला, म्हणून गर्भावस्थेत तिने त्याचा त्याग केला. मात्र मृत गर्भातूनही त्याचा जन्म झाला. अदितीच्या सर्व मुलांप्रमाणे त्यालाही मार्तंड अशी ओळख मिळाली. त्याने आपल्या कर्तृत्वाने नाव गाजवले आणि लोकप्रियता मिळवली. मातेला नको असताना झालेला, पण त्याच्या गुणांमुळे जगाला हवाहवासा वाटणारा `मार्तंड' हा आदर्शच मानला पाहिजे. ही कथा महाभारताच्या अनुशासन पर्वात वाचायला मिळते. मार्तंडाप्रमाणे आपणही जन्माला आल्यावर आपल्या गुणांनी जग जिंकून घ्यावे, हा मंत्र आपल्याला या कथेतून मिळतो, म्हणून मार्तंड सप्तमीच्या दिवशी त्याचे स्मरण करावे आणि त्याच्या नावे सूर्याला अर्घ्य द्यावे.
याच व्रताला उभय सप्तमी असेही म्हणतात. उभय सप्तमी देखील सूर्यपूजेचे महत्त्व सांगते. यात फरक एवढाच की, केवळ पौष शुद्ध सप्तमीला सूर्यपूजा न करता याच महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या सप्तमीलादेखील सूर्यपूजा करणे अभिप्रेत असते. या दोन्ही तिथींना हे व्रत केले जाते, म्हणून त्या उभय सप्तमी असे नाव दिले आहे.
हिवाळ्याच्या दिवसात संक्रांतीचा सण सर्वार्थाने ऊबदारच म्हणायला हवा. तीळाची स्निग्धता, गुळाचा गोडवा आणि पतंगाच्या निमित्ताने सूर्यस्नान, यामुळे थंडी कुठल्या कुठे पळून जाते. परंतु, ही व्यवस्था एकदिवसीय न राहता, सबंध महिनाभर सूर्याच्या कोवळ्या किरणांशी आपला संपर्क यावा, म्हणून पूर्वजांनी व्रतांच्या निमित्ताने रोज काही ना काही कारणाने सूर्यदर्शन योजले आहे.
रोज सकाळी उठून सूर्याचे दर्शन घ्या, सूर्यनमस्कार घाला, असे सांगितले, तर लोक उठणार नाहीत. परंतु, कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये अनेक प्रकारचे रोग घालवण्याची क्षमता आहे, असे सांगितले, तर नक्की सूर्यदर्शन घेतील. उगवत्या सूर्याला अर्घ्य देणे, ही भारतीय संस्कृती आहे. अर्घ्य देण्याची क्रिया सूर्यासाठी असली, तरी त्याचे फायदे आपल्यालाच असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच रोज सूर्यनमस्कार घातल्यामुळे शरीर लवचिक आणि निरोगी राहते व दीर्घायुष्य लाभते.
रोज न थकता हजर राहणारा, कोणातही भेदाभेद न करता सर्वांना समान प्रकाश देणारा, अंधाराला पराजित करून उजेडाचे साम्राज्य पसरवणारा, एकटाच असूनही तेजस्वीपणे तळपत राहणारा सूर्य हा केवळ ग्रह नाही, तर सकल सृष्टीचा पोशिंदा आणि आदर्श आहे. त्याच्या दर्शनाने आपल्या दिवसाची सुरुवात व्हावी, यासाठी सूर्याचे प्रात:दर्शन घेण्याचे पूर्वापार संकेत आहेत.
हेही वाचा : मुलांच्या दीर्घायुष्यासाठी पौष शुक्ल षष्ठीला करतात, 'हे' सुगंधी व्रत!