Navratri 2020: नवदुर्गांचे स्वरूप आणि महात्म्य : चौथी माळ: कूष्माण्डा

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 20, 2020 07:30 AM2020-10-20T07:30:00+5:302020-10-20T07:30:02+5:30

Navratri 2020: कु म्हणजे छोटे, उष्म म्हणजे ऊबदार आणि अण्ड म्हणजे तिच्या दिव्य बीजातून ब्रह्माण्ड उत्पन्न झाले, म्हणून देवीला, कूष्मांडा हे नाव दिले गेले.

Nature and majesty of Navdurga: Kushmanda devi | Navratri 2020: नवदुर्गांचे स्वरूप आणि महात्म्य : चौथी माळ: कूष्माण्डा

Navratri 2020: नवदुर्गांचे स्वरूप आणि महात्म्य : चौथी माळ: कूष्माण्डा

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ 

नवरात्रीतील आई भगवतीचे चौथे रूप कूष्माण्डा नावाने परिचित आहे. आपल्या स्मित हास्याद्वारे देवी कूष्माण्डा संपूर्ण जगताला मोहून घेते. तीच या ब्रह्मांडाची जन्मदात्री आहे, म्हणून तिला कूष्मांडा असे म्हटले जाते. कु म्हणजे छोटे, उष्म म्हणजे ऊबदार आणि अण्ड म्हणजे तिच्या दिव्य बीजातून ब्रह्माण्ड उत्पन्न झाले, म्हणून देवीला, कूष्मांडा हे नाव दिले गेले.

जेव्हा सृष्टीचे अस्तित्त्व नव्हते, चोहो बाजूंना अंध:कार होता, तेव्हा देवीने आपल्या `ईषत्' हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती.  म्हणून देवीला सृष्टीची आदि-स्वरूपा म्हटले जाते. 

देवीचे निवासस्थान सूर्यमंडलाच्या आत आहे. ज्या सूर्याकडे तुम्ही आम्ही क्षणभरसुद्धा पाहू शकत नाही, त्या सूर्यमंडलाच्या आत देवी राहते, यावरून तिचे तेज सूर्यापेक्षा कितीतरी पट जास्त असेल, याची कल्पना येते. देवीची कांती सूर्यकीरणांसाठी तेजस्वी आहे. देवीचे तेज अतुलनीय आहे. याच तेजाने दशदिशा व्यापलेल्या आहेत. ब्रह्नांडातले सर्व जीव देवीच्या तेजाने प्रभावित आणि प्रकाशित झाले आहेत.

हेही वाचा : Navratri 2020: नवदुर्गांचे स्वरूप आणि महात्म्य : दुसरी माळ: ब्रह्मचारिणी

देवीला आठ भुजा आहेत. म्हणून कूष्मांडा देवी अष्टभूजा म्हणूनही ओळखली जाते. देवीच्या सात हातात क्रमश: कमंडलु, धनुष्य, बाण, कमळ, अमृतपूर्ण कलश, चक्र आणि कदा आहेत.आठव्या हातात सर्व सिद्धी आणि निधी प्रदान करणारी जपमाळा आहे. देवी सिंहासनाधिष्ठित आहे. 

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कूष्माण्डा देवीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'अनाहत' चक्रात स्थिरावते. अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने, देवीला मनाच्या चौरंगावर स्थापित करून, तिचे अविरत स्मरण करावे. या देवीच्या उपासनेमुळे भक्तांचे दु:ख नाहीसे होते. आजार दूर होतात. देवीच्या भक्तीने आयुष्य, यश, बल, आरोग्याची वृद्धी होते. देवी कूष्माण्डा अल्प सेवा आणि भक्तीनेही प्रसन्न होणारी आहे. जर कोणी मनुष्य, निष्काम मनाने देवीला शरण गेला, तर त्याला देवीची कृपीदृष्टी प्राप्त होते, तसेच मरणोत्तर सहजस्वरूपात पदम पदाची प्रप्ती होते, असा विश्वास आहे.

आपणही शास्त्र-पुराणात दिलेल्या विधी विधानकानुसार देवीची उपासना केली पाहिजे. देवीच्या भक्तीमार्गावर चालणाऱ्या  साधकाला यशस्वी होण्यासाठी देवीच मदत करते. अशा भक्तांसाठी संसारसागर हा अमृतसागर वाटू लागतो. देवी कूष्माण्डाची उपासना मनुष्याला सर्व प्रकारच्या आधी-व्याधीतून मुक्त करते. सुख, शांती, समृद्धी, उन्नती या वाटेवर नेऊन सोडते. 

म्हणून तुम्हालाही जर वाटत असेल, की आपली लौकिक-परलौकिक उन्नति व्हावी, तर देवी कूष्माण्डाची उपासना जरूर करावी.

सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च।
दधाना हस्तपद्माभ्यां कूष्माण्डा शुभदास्तु मे।।

कूष्माण्डा माता की जय....!

हेही वाचा: Navratri 2020: नवदुर्गांचे स्वरूप आणि महात्म्य : तिसरी माळ: चंद्रघण्टा

Web Title: Nature and majesty of Navdurga: Kushmanda devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.