नवग्रहांची ‘कुंडली’कथा: वाह ‘गुरु’! मातीचे सोने करण्याची शक्ती असलेला ग्रह; चंद्राशी ‘युती’ म्हणजे ‘राजयोग’च
By देवेश फडके | Published: June 14, 2024 08:23 PM2024-06-14T20:23:41+5:302024-06-14T20:28:18+5:30
Navgrahanchi Kundali Katha: भारतीय संस्कृती, परंपरेत गुरुची महती सांगावी तेवढी कमीच आहे. ज्योतिषशास्त्रातही गुरु ग्रहाला अतिशय महत्त्व असून, वरचे स्थान आहे. जाणून घ्या...
Navgrahanchi Kundali Katha: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरू मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचा पहिला गुरू त्याची आई असते. अगदी चालण्या-बोलण्यापासून ते संस्कार करेपर्यंत अनेक गोष्टी आई शिकवत असते. म्हणूनच 'आई माझा गुरु, आई माझा कल्पतरु, सौख्याचा सागरु, आई माझी', असे म्हटले जाते. आईसोबत वडीलही अनेक गोष्टी शिकवत असतात. आयुष्यात चांगला गुरू मिळणे भाग्याचे लक्षण समजले जाते. गुरूची महती सांगावी तेवढी कमीच आहे. ज्योतिषशास्त्रातही गुरु ग्रहाला अतिशय महत्त्व असून वरचे स्थान आहे.
सर्व ग्रह एकत्रित केले तरी गुरुचा आकार अडीच पट मोठा
गुरु हा सूर्यमालेतील सूर्यापासून पाचवा ग्रह आहे. सर्व ग्रह एकत्र केले तरी याचा आकार त्यांच्यापेक्षा अडीच पट मोठा आहे. सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्याचा त्याचा काल सुमारे १२ वर्षे आहे. साधारणपणे गुरु ग्रह एका राशीतून एक वर्ष ते तेरा महिने इतक्या कालावधीत भ्रमण करतो. सूर्यापासून गुरु ग्रहाचे अंतर ४८ कोटी ६६ लक्ष २५ हजार मैल, तर पृथ्वीपासून त्याचे अंतर ६२ कोटी ८७ लक्ष ३० हजार किमी आहे. गुरु ग्रहाला सुरेश, अमरेश, पूज्य, देवगुरु, सुराचार्य, देवेज्य, बृहस्पती अशी नावे आहेत. गुरु ग्रहाला इंग्रजीत ज्युपिटर असे म्हणतात. आठवड्यातील गुरुवार या दिवसावर गुरुचा अंमल असतो.
मातीचे सोने करू शकणारा ग्रह
गुरु हा ज्ञान, सुख व स्वराचा कारक, सचिव आहे. पिवळ्या रंगावर याचा प्रभाव आहे. ईशान्य दिशेचा मालक आहे. गुरु हा आकाशतत्वाचा ग्रह आहे. चांदी धातूवर गुरुचा अंमल असून, ऋतुंमध्ये हेमंतऋतु याचे प्रभुत्व आहे. राशीचक्रात धनु व मीन या दोन राशींचे अधिपत्य गुरु ग्रहाकडे आहे. तर पुनर्वसु, विशाखा, पूर्वाभाद्रपदा या नक्षत्रांचे स्वामित्व गुरुकडे आहे. अंकशास्त्रात मूलांक ३ चा स्वामी गुरु आहे. कर्क ही गुरुची उच्च रास आहे. म्हणजेच या राशीत गुरु सर्वाधिक, सर्वोत्तम फले देऊ शकतो. तर, मकर रास गुरुची नीच रास होय. या राशीत गुरु कमी फले देऊ शकतो, असे म्हटले जाते. रवि, चंद्र व मंगळ हे गुरुचे मित्रग्रह आहेत. तर बुध, शुक हे शत्रूग्रह आहेत. शनी, राहु यांच्याशी याचे समत्वाचे संबंध आहेत. गुरु हा देवांचा गुरु तर शुक्र हा दैत्यांचा गुरु आहे. शुक्राचा रंगेलपणा गुरुला मानवत नाही तर गुरुची गंभीरवृत्ती शुक्राला आवडत नाही. गुरु हा सत्वगुणी ग्रह आहे. गुरु हा आपल्या स्पर्शाने अथवा दृष्टीने मातीचे सोने करण्याची क्षमता असलेला ग्रह आहे.
जन्मकुंडलीत गुरु ग्रहाला जास्त महत्त्व
मनुष्यजातीचे कल्याण करणे, समता वाढविणे व उत्पन्न करणे, संस्कार वृद्धिंगत करणे हे गुरुचे मुख्य गुणधर्म आहेत. रवि-चंद्राचे शीघ्र परिणाम, मंगळाची तीव्र उष्णता व सामर्थ्य, बुधाचे बुद्धीचे विकसन, शुक्राचे तेज, सौंदर्य, शनिचे संहारक कार्य, खलवृत्ती, मुत्सद्दीपणा किंवा कुबेराची संपत्ती अथवा दारिद्र्य, हर्षलाचा विचित्रपणा, नेपच्युनचे दैवी सामर्थ्य या गोष्टी गुरुकडे नाहीत, तरीसुद्धा गुरुला कुंडलीत जास्त महत्त्व आहे. गुरुमुळे 'हंस' नावाचा पंचमहापुरुषयोग होतो. चंद्र-गुरु यांच्या युती वा केंद्रयोगामुळे गजकेसरी राजयोग होतो. 'पुष्कराज' हे गुरुचे रत्न आहे. पहिल्या भागात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील एक ते सहा स्थानावर गुरु असेल, तर त्याचा जातकावर कसा प्रभाव असू शकतो किंवा जातकाला त्याचे कसे परिणाम मिळू शकतात, हे पाहणार आहोत. तर दुसऱ्या भागात गुरुशी संबंधित आणखी काही मान्यता, उपाय आणि कुंडलीतील सात ते बारा या स्थानावर गुरु असेल, तर त्याचा जातकावर कसा प्रभाव असतो, याची थोडक्यात माहिती घेणार आहोत.
१) प्रथम स्थान: कुंडलीतील पहिल्या स्थानाला लग्न स्थान असे संबोधले जाते. यावरून व्यक्तिमत्व, रुप-रंग, शरीर, यशापयश, पूर्वज, सुख-दुःख, आत्मविश्वास, अभिमान अशा गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानी गुरु असेल तर जातक दीर्घायू, निरोगी, विवेकी, धैर्यवान, विद्वान, सदाचारी, सुंदर, आर्थिक दृष्टीने संपन्न, समाजात व राजद्वारी प्रतिष्ठित, यशस्वी, गंभीर, ज्ञानी, आध्यात्मिक, स्थिर वृत्तीचा, मिष्ठान्नप्रेमी व मधुरभाषी असा असतो. धनप्राप्तीची अनेक साधने उपलब्ध असतात. सुखी जीवन जगतो. शत्रू फार असतात. खोटे आरोप होतात. निरंतर चिंता व निरर्थक भीती असते. पाश्चात्त्यांच्या मते, गुरु लग्न स्थानी असेल तर मोठ्या प्रमाणात शुभफले मिळतात. जन्म राशीचा गुरु उत्तम फलदायी असतो. असा जातक तेजस्वी असतो.
२) द्वितीय स्थान: कुंडलीतील दुसरे स्थान धनस्थान मानले जाते. यावरून आर्थिक स्थिती, कुटुंबसौख्य, घराणे, संपत्ती पाहिली जाते. द्वितीय स्थान म्हणजे धनस्थानी गुरु असेल तर जातकाची वाणी सुंदर, प्रभावशाली व प्रवाहित असते. कवी किंवा साहित्यकार असतो. परोपकारी, समाजात प्रतिष्ठित, आर्थिकदृष्ट्या संपन्न, वाचाळ व भोजनप्रिय असतो. याला शत्रु अधिक असतात. जवळच्या लोकांशी व भावंडांशी पटत नाही. अधिकांश आचार्यांच्या मते द्वितीयेतील गुरु जातकाला संपन्न बनवतो. गुरुमुळे धनलाभ मुश्किलीने होतो. धनस्थ गुरु सामाजिक नेतृत्त्वाची क्षमता व अधिकार देतो. जातक नेता किंवा कुशल प्रशासक होऊ शकतो. काही विद्वानांच्या मते या स्थानी गुरु असता असा जातक लोकांचे उपकार लवकर विसरतो, कृतघ्न होतो. आर्थिक दृष्टीने असा जातक संपन्न असतो. धनस्थ गुरु जातकाला श्रीमंत बनवतो, असे काहींचे मत आहे.
३) तृतीय स्थान: कुंडलीतील तिसरे स्थान मातृस्थान मानले जाते. यावरून भावंडे, शैली, जनसंपर्क, भावंडांकडून मिळणारे सुख अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. तृतीयस्थानी गुरु असेल तर जातक श्रीमंत असतो, पण व्यवहारकुशल व कंजूष असतो. आवाज सुरेल असतो. भल्याबुऱ्याचा विचार नसतो. अनेक आचार्यांनी अशा जातकाला कृतघ्न म्हटले आहे. स्वार्थी असल्याने विश्वासपात्र नसतो. तर काहींच्या मते, जातक राजमान्य असतो. याच्या आधीन अनेक लोक काम करतात. नावाजला जातो. संकटसमयी हा डगमगत नाही. ३८ व्या वर्षी विदेशयात्रा संभवते. असा जातक प्रवासी, लेखक, साहित्य सेवी, विचारवंत, धार्मिकवृत्तीचा व विद्वान असतो. पण विचार स्थिर नसतात. तर्क फार करतो.
४) चतुर्थ स्थान: कुंडलीतील चौथे स्थान सुखस्थान मानले जाते. हे मनाचे कारक स्थानही मानले जाते. गृहसौख्य, सासर, वाहनसौख्य, घरातील वस्तु, घराभोवतालचा परिसर, पदवी, मालमत्ता अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. चतुर्थस्थानातील गुरुची फले शुभ असतात. जातकाचे जीवन सुखी असते. गुरुबरोबर अन्य कोणताही पापग्रह नसेल तर वडिलोपार्जित, पूर्वजांची संपत्ती मोठ्या प्रमाणात मिळते. पुरलेले धन मिळू शकते. वाहनादि स्थावर संपत्तीचा उपभोग मिळतो. समाजात प्रख्यात असतो. मित्र भरपूर असतात. विरोधकही प्रशंसक बनतात. काही आचार्यांच्या मते संपूर्ण सुख-समृद्धी असूनही मानसिक शांती कमी मिळते. राजसन्मान व मित्रसुख मिळते. जातक मातृपितृभक्त असतो. आयुष्याचा उत्तरार्ध चांगला जातो. ही आणखी अधिक फले सांगितलेली आहेत.
५) पंचम स्थान: कुंडलीतील पंचमस्थान संततीस्थान मानले जाते. यावरून संततीसुख, प्रेमातील यश, शिक्षण, कलेतील यश, आर्थिक लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. पंचमस्थानात गुरु शुभ मानला जातो. असा जातक बुद्धिवान, श्रीमंत, ज्ञानी, विवेकी, धैर्यवान व सुखी असतो. मित्र खूप असतात. कुंडलीतील अन्य योग व ग्रहस्थिती पाहून तुलनात्मक दृष्ट्या निष्कर्ष काढणे आवश्यक ठरते. कोणतेही कार्य निर्विघ्नपणे सुरू होते, पण ते पूर्णावस्थेला जात नाही. अनेक अडचणींनंतर कार्य पूर्ण होते. आर्थिक दृष्टीने जातक संपन्न नसला तरी त्याला समाजात जास्त प्रतिष्ठा मिळते. खरेदी-विक्रीत खूप हुशार असतो. दानप्रिय असतो. राज्यशासनाकडून लाभ किंवा यश प्राप्त होते. जातक न्यायप्रिय असतो. जर गुरुचा रवि किंवा चंद्राशी चांगला दृष्टीसंबंध असेल तर जातकाला अकस्मात धनलाभ होतो, परीक्षेत यश मिळते.
६) षष्ठस्थान: कुंडलीतील षष्ठस्थान म्हणजेच सहावे स्थान शत्रूस्थान मानले जाते. यावरून शत्रू, गुप्त शत्रू, शारीरिक व्याधी, मामा, मावशीकडून मिळणारे सुख, नोकर-चाकर, मानसिक वा शारीरिक ताण अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. षष्ठस्थानी गुरु असेल तर जातकाला शत्रू फार असतात. परंतु ते पराजीत होतात. समाजात प्रतिष्ठित व विख्यात असतो. सुखशांती कमी मिळते. युद्ध विषयक कार्य व वाक्युद्ध दोन्हीत तरबेज असतो. आयुष्य अनेक विघ्नबाधांनी युक्त व संघर्षमय असते. काही आचार्यांच्या मते, गुरु वक्री असेल तर शत्रू बलवान असतात. राजदरबारी असलेल्या प्रश्नात चांगले फल मिळते. काही तज्ज्ञ षष्ठातील गुरु शुभ मानत नाहीत.
- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
- देवेश फडके.