प्रत्येक एकादशीचे आगळे वेगळे महत्त्व आहे. हिंदू धर्मातील सर्व सण, वार, उत्सव, व्रत, वैकल्ये ही निसर्गाशी निगडित आहेत. १७ सप्टेंबर रोजी शुक्रवारी परिवर्तिनी एकादशी आहे. ही एकादशी पद्मा एकादशी या नावेही ओळखली जाते. या एकादशीमागे काय कथा आहे ती जाणून घेऊ आणि तिचे व्रतमहात्म्य समजून घेऊ.
या एकादशीची एक विशेष कथा आहे. ती अशी-
फार पूर्वी सूर्यवंशीय राजा मांधाना याच्या राज्यावर अनावृष्टीचे संकट ओढावले. त्यावेळी त्याने अंगिरा ऋषींना यावर उपाय विचारला. त्या ऋषींच्या सांगण्यावरून राजाने मनोभावे पद्मा एकादशीचे व्रत श्रद्धापूर्वक केले. परिणामी पाऊस पडून दुष्काळाच्या संकटाचे निराकरण झाले. राजा आणि प्रजा सुखी झाली.
असे परिवर्तिनी एकादशीचे महत्त्व आहे. हे व्रत करण्यासाठी व्रतकर्त्याने प्रात:काळी शुचिर्भूत होऊन भगवान श्रीविष्णूंची यथासांग पूजा करावी. पूर्ण दिवसाचा उपास करून रात्री नामसंकीर्तन करीत जागरण करावे. द्वादशीला इतर एकादशीप्रमाणे भोजन करून उपास सोडावा.
या दिवशी श्रवण नक्षत्र असल्यास या एकादशीला 'विजया एकादशी' असेही म्हणतात. या योगावर एकादशीचे व्रत केल्यास आपल्या सर्व मनोरथांची पूर्तता होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या विजया एकादशीच्या मुहूर्तावर वामनाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुसऱ्या दिवशी अन्नदान करून या व्रताची पूर्तता केली जाते.
भाद्रपद शुक्ल एकादशी : भगवान विष्णूंचा कूस बदलण्याचा दिवस; सविस्तर वाचा!
विष्णुभक्तांसाठी एकादशी हे व्रत म्हणजे एक पर्वणीच असते. त्यामुळे जे नेमाने सर्व एकादशी करतात, ते ही एकादशीदेखील करतात. ज्यांना उपास करणे शक्य नसते त्यांनी भगवान विष्णूची पूजा करावी. तसेच साधा सात्त्विक आहार घ्यावा. 'ऊँ नमो भगवते वासुदेवाय नम:' या मंत्राचा जप करावा. अथवा विष्णुसहस्त्रनामाचे श्रवण-पठण करावे.