गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्यनक्षत्र योग. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो. गुरुपुष्यामृत योग पुष्य नक्षत्रासाहित गुरुवारी येतो. यंदा पितृपक्षात ३० सप्टेंबर रोजी हा योग जुळून आला आहे.
गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करतात. याशिवाय गृहप्रवेश, मालमत्ता आणि इतर गुंतवणूक, खरेदी, नवीन व्यवसायाची सुरूवात, विद्यारंभ म्हणजेच शिक्षणाची सुरुवात केली जाते. पितृपंधरवडा सुरू असल्याने अनेक जण या काळात नवीन खरेदी, नवीन कामाची सुरुवात टाळतात. परंतु हा काळ केवळ शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला गेला आहे. तसेच या दिवशी गुरु मंत्र व देवाचे नामस्मरण, तसेच इतर सर्व धार्मिक /अध्यात्मिक कार्य केल्यास सेवेकऱ्यांना अत्यंत लाभ होतो. पितृपंधरवडा सुरू असल्याने या मुहूर्तावर दानधर्म करून अधिक पुण्य पदरात पाडून घेता येईल. . तसे केल्याने पितरांचा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभून घरात भरभराट होईल.
पुष्यामृत गुरुवारी येणे हा योग दुर्मिळ आहे. म्हणूनच आपण याला अमृत योग असे संबोधितो. या शुभ मुहूर्ताचा अधिक लाभ व्हावा म्हणून देवी लक्ष्मी, श्रीविष्णू आणि गणपती, शंकराची पूजा करावी. लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्ती चा आशीर्वाद देणारे आहेत, पण मग शंकर आणि गणपती यांची पूजा आज का, असा प्रश्न आपल्याला पडेल. तर शंकर हे संकटमोचक तर गणपती बुद्धिदाता मानला जातो. लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य तऱ्हेने विनियोग आणि संरक्षण करणेही तितकेच म्हत्ववाचे आहे. म्हणून या निमित्ताने त्या दोहोंचीही पूजा योजली असावी. घरातील ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच देव्हाऱ्यात उजव्या कोपऱ्याला श्रीसुक्त , पुरुषसुक्त वाचून व पंचोपचार पूजा करून कलश स्थापना केल्यास घरात धन-धान्य वृद्धी व लक्ष्मीप्राप्ती होते.
गुरुपुष्यामृत हा मुहूर्त शुभ असला, तरी विवाह किंवा मंगल कार्यासाठी तो निषिद्ध मानला जातो. कारण, गुरुपुष्यामृत या मुहूर्तावर खुद्द दत्त गुरूंची कृपादृष्टी असते. दत्तगुरु वैराग्याचे प्रतीक मानले जातात. संसारात किंवा मंगल कार्यात वैराग्य येऊन कसे चालेल? म्हणून या मुहूर्तावर खरेदी विक्री करावी पण मंगलकार्य टाळावे. तसाही सध्या पितृ पंधरवडा सुरू असल्यामुळे शुभ कार्याला स्थगिती मिळाली आहेच, परंतु या काळात विवाहाची बोलणी करण्यास, तारखा नक्की करण्यास काहीच हरकत नाही.
Pitru Paksha 2021 : अविधवा नवमी श्राद्ध का? कोणासाठी? कसे? व कधी केले जाते, ते सविस्तर जाणून घ्या!
पूर्वी या मुहूर्तावर ज्ञानदानास प्रारंभ केला जात असे. याशिवाय, धर्म, कर्म, मंत्र, अनुष्ठान, इ गोष्टींचा शुभारंभ केला जातो. नशीब बदलणारा, दारिद्रय दूर करणारा आणि इच्छित फळ देणारा असा हा गुरूपुष्यामृत योग आहे.