पितृपक्षात श्राद्धाच्या भोजनातील कोणते पदार्थ पितरांना तृप्त करतात? पाहा, मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 08:53 PM2021-09-26T20:53:34+5:302021-09-26T20:53:55+5:30
पितृपक्षात श्राद्ध विधि करताना भोजन, पिंडदान, तर्पण, वैश्वदेव हे त्यातील महत्त्वाचे अंग आहेत.
पितृपक्षात श्राद्ध विधि करताना भोजन, पिंडदान, तर्पण, वैश्वदेव हे त्यातील महत्त्वाचे अंग आहेत. भोजनामुळे तृप्ती झाल्याशिवाय तर श्राद्धाला पूर्णत्वच येऊ शकत नाही. परंतु प्रश्न असा पडतो की, पितरांना नेमके कोणते पदार्थ आवडतात? तर याचे उत्तर असे आहे की, आपण श्राद्धात जो स्वयंपाक करतो, तो घन किंवा द्रव स्वरूपात पितरांपऱ्यंत पोहोचत नाही. तर ते वायूरूपाने त्यांच्यापऱ्यंत पोहोचतो व ते तृप्त होतात. पितरांना तृप्त करणाऱ्या खाद्य पदार्थांची माहिती घेऊ या-
खीर : पितरांना खीर सर्वाधिक आवडते. त्यांच्या वासाने ते तृप्त होतात. काही ठिकाणी खीर दूध, तांदळाची असते. काही ठिकाणी गव्हाची असते. मग अनेक ठिकाणी त्यात प्रदेश परत्वे बदलही केले जातात. अनेक ठिकाणी त्यात सुकामेवा टाकला जातो. साखर, तूप, नारळाचा कीस, विलायची पावडर, केसर हेही टाकले जातात. घरोघरी अत्यंत श्रद्धेने खीर केली जाते. ती प्रसाद म्हणूनही घेतली जाते. पितरांना उकळलेले गोड पदार्थ आवडतात.
मध : पितरांना खिरीच्या बरोबरीने मध आवडतो. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जेवणात पोळीवर मध वाढण्याची पद्धत आहे. मधु वाता ऋतायते मधु क्षरन्ति सिन्धवः । माध्वीर्नः सन्त्वोषधीः या मंत्राने मध वाढला जातो. अनेक ठिकाणी मध वाढण्याची प्रथा नाही. तेथे केवळ मंत्र म्हटला जातो. परंतु श्राद्धात मधाचेही तेवढेच महत्त्व आहे, हे ध्यानात ठेवावे.
पुरी : अनेक ठिकाणी पितरांना आवडणारी पुरी केली जाते. यातही प्रदेश परत्वे बदल केले जातात.
पुरणपोळी : पितर पुरणपोळीने तृप्त होतात. गहू, चना डाळ, साखर, केसर, विलायची, जायफळ, शुद्ध तूप टाकून केलेल्या पुरणाच्या वासाने पितर तृप्त होतात. यामध्ये सर्व प्रकारचे सत्व आल्यामुळे या पोळीला पूर्णपोळी किंवा पुरणपोळी म्हणतात. देवांनाही ही पोळी प्रिय आहे.
रसमलाई : पितरांना दुधाचे पदार्थ आवडतात. त्यामुळे काही ठिकाणी खीर तर काही ठिकाणी रसमलाई श्राद्धात भोजनासाठी केली जाते. यातही ड्रायफ्रूटस टाकल्यास उत्तम.
रसगुल्ले : काही ठिकाणी प्रदेशनुसार रसगुल्लेही श्राद्धविधीमध्ये भोजनासाठी केले जातात. याच बरोबर पूर्वजांना सर्वांत जास्त आवडणारे पदार्थही केले जातात. त्यांच्या वासामुळे ते तृप्त होतात, अशी आपल्याकडे मान्यता आहे.