प्रार्थनेचा अर्थ मन प्रेमाने भरून ओसंडून जाणे आहे - ओशो
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 30, 2021 09:00 AM2021-01-30T09:00:00+5:302021-01-30T09:00:02+5:30
प्रार्थना हा जिवंत अनुभव असायला हवा. हृदयाचा हृदयाशी संवाद हवा. एकदा तुमच्या हृदयाची दारं उघडली की सारं अस्तित्त्व प्रतिसाद देऊ लागते.
भय सोडा. प्रेमाचा स्रोत वाहू द्या. विनाअट प्रेम करा. प्रेम करताना दुसऱ्याला काही देतो आहेत असा भाव मनात बाळगू नका. प्रेम तुम्ही स्वत:च्या आनंदासाठी करता. तुम्ही प्रेम करता तेव्हा त्याचा लाभ तुम्हालाच होतो. म्हणून वाट बघू नका की कुणी तुमच्यावर प्रेम करेल. मग तुम्ही कुणावर प्रेम कराल. नको, अशी वाट बघण्याऐवजी प्रेम करा. तुम्ही तृप्त व्हाल. अधिकाधिक धन्य व्हाल. प्रेम जसजसे खोलवर रुजेल तसतसे भय संपुष्टात येईल. प्रेम प्रकाश आहे आणि भय अंधार आहे.
प्रेमाची पुढली अवस्था असते प्रार्थनेची! सगळे धर्म आणि संप्रदाय तुम्हाला प्रार्थना करायाला शिकवतात. पण एक प्रकारे ते तुमची नैसर्गिक प्रार्थना थांबवत असतात. प्रार्थना ही सहज स्वाभाविक घटना आहे. ती शिकवली जाऊ शकत नाही. प्रार्थना सहजपणे घडते. ती नैसर्गिक अनुभूती आहे.
नैसर्गिक गोष्टींचा अनुभव घ्यायला शिका. परंतु या जगाची सहजस्वाभाविकपणा म्हणजे वेडेपणा ठरतो आणि औपचारिकता म्हणजे मोठी बुद्धिमान गोष्ट ठरते. वास्तव परिस्थिती अगदी त्याच्या उलट असते. हृदयाचा हृदयाशी संवाद घडू द्या. ती प्रार्थना एवढी सुंदर असते, की तुम्ही स्वत: आतून फुलू लागता. प्रार्थनेचा अर्थ मन प्रेमाने भरून ओसंडून जाणे आहे.
या संबंधात तुमची मुळे खोलवर रुजलेली असतात. कधी तुम्ही नाराज असता, कधी अनुग्रहाने विनम्र होता, कधी उपेक्षित असल्याची जाणीव होते. पण हा संबंध जिवंत असेल, तरच अशी अस्सल प्रार्थना घडते.
प्रार्थना हा जिवंत अनुभव असायला हवा. हृदयाचा हृदयाशी संवाद हवा. एकदा तुमच्या हृदयाची दारं उघडली की सारं अस्तित्त्व प्रतिसाद देऊ लागते. प्रेमाची शेवटची अवस्था ध्यानाची असते. शब्द संपुष्टात येतात. तुम्ही ब्रह्मांडरूप होता. प्रेमाच्या पायऱ्यांवर भय नाहीसे होते. ध्यानात तर निर्भयताही मिटून जाते. काहीच उरत नाही. शांत पोकळीचा तुम्ही अनुभव घ्यायला शिकता. ही अनुभूती, म्हणजे खरी प्रार्थना!