जगाचे कल्याण कशात आहे ? असा प्रश्न केला तर सामान्यतः कुणी त्याचे उत्तर सहज नाही देऊ शकणार. मनुष्याला आपले स्वतःचेच तर खरे कल्याण कशात आहे ते कळत नाही. कल्याण कळते तर ते हेच की आयुष्यात आपल्याला सगळी सुखं मिळावीत. म्हणून मनुष्य आपल्या नंतरच्या पुढच्या पिढीलाही एकच आशीर्वाद देतो खूप मोठा हो, खूप सुखी हो. हिंदीचा आशीर्वाद तर प्रसिध्द आहे दुधो नहाओ, पूतो फलो. दुधाने नित्य आंघोळ घेता येईल असे वैभव लाभो व तेही पुत्राच्या पुत्रापर्यंत फलित होवो. हे सर्व जगाचे कल्याण नाही आपल्यापुरत्या ममत्वाचे कल्याण आहे. मग मनुष्याचे हे ममत्व जगाचे कल्याण काय समजणार? जगाचे कल्याण मीच करु शकतो, त्यासाठी अख्खे जग माझ्या मुठीत हवे म्हणून सिकंदर सारखा राजा जगावर राज्य करायला निघतो. मात्र त्या नादात स्वतःचे अल्पायु जीवन ओढवून घेतो. कधी हिटलर नाझी वंश श्रेष्ठ ठरवित जगाच्या कल्याणाचा विचार करीत जगाचा विनाश करतो व स्वतःचाही आत्मघात ओढवून घेतो. अनेक राजे आले व गेले. राजेशाही अत्याचारातूनच लोकशाही उदयास आली. मग लोकशाही चालविणारे लोकप्रतिनिधी आले की, आम्ही जनतेचे सेवक आहोत. जगाचे कल्याण करु. पण बहुतांश प्रतिनिधी स्वकल्याण करुन चालते होतात. सामान्य मनुष्य आपला आशाभूत होऊन नवनवीन लोकप्रतिनिधी निवडून देतच आहे की करेल कुणी आपले कल्याण, जगाचे कल्याण. पण जगाचे कल्याण तर दूर जगाचे स्वरुप बदहून बदतर अराजक होत चालले आहे. कुटुंब प्रमुख असो की गाव प्रमुख, राज्य प्रमुख असो की राष्ट्र प्रमुख, सर्वच लोक कामना ठेवतात की जगाचे कल्याण करु पण नाही होत. मग तुकोबा व कबीर कशाचे आधारे म्हणतात की संत जगाचे कल्याणासाठी जगतात. कारण फक्त संतांनाच कळते की जगाचे कल्याण कशात आहे. म्हणून कधी या देशात अशी स्थिती होती की, धर्मज्ञानी राजाचे राजगुरु असायचे. अशा काळातच भारतातील मौर्य सत्तेसारखे विशाल साम्राज्य विकसीत झाले होते. कबीर म्हणताहेत, बिरछ कबहुँ नहिं फल भखै, नदी न संचै नीर। परमारथ के कारने, साधुन धरा सरीर।।
बिरछ, वृक्षचा अपभ्रंश आहे. वृक्ष कधीहि आपले फळ खात नाही. किंवा नदी आपल्यासाठी नीर, जल साठवूण ठेवत नाही वा उपयोगात घेत नाही. तसेच साधु ह्याने केवळ परमार्थाचे कारणास्तव शरीर धारण केलेले आहे.याच आशयाचे तुकोबाचे वचन आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती । देह कष्टविती परउपकारे ॥ भूतांची दया हे भांडवल संता । आपुली ममता नाही देही ॥ तुका म्हणे सुख परावविया सुखे । अमृत हे मुखे स्त्रवत असे ॥
कबीर म्हणतात, परमार्थ कारणाने संत शरीर धारण करतात. स्वार्थासाठी नाही. ममत्वाचे अर्थाने नाही. तुकोबा म्हणतात, जगाच्या कल्याणासाठी संत देह कष्टविती पर उपकारे. स्व उपकारार्थ नाही, स्व अर्थाने नाही. संत आपले आयुष्य वेचतात, इतरांचे भले व्हावे यासाठी. आपल्याला मिळालेले आयुष्य आपल्यासाठीच नाही वेचायचे. कबीर म्हणतात, तसे जसे वृक्ष विकसीत होतो ते इतरांना फळे मिळावीत म्हणून. नदी वाहते ती इतरांना जळ मिळावे म्हणून. तुकोबा म्हणतात, संतांना आपल्या देहाची ममताच नाही राहत. म्हणून त्यांना देहासाठीच्या संपत्ती सुखाची इच्छाही नाही राहत. प्राणीमात्रांप्रती दया, करुणा व प्रेम हेच संतांचे भांडवल असते. संत इतरांचे सुखात सुख मानतात, त्यामुळे ते इतके करुणावान होतात की, प्रेमाचे अमृत त्यांच्या प्रत्येक शब्दातून मुखाव्दारे वाहत असते. संत आयुष्यभर सर्वांना परमार्थाचा मार्ग दाखवितात. कारण तेच जाणतात की, कल्याण स्वार्थाचे नाही तर परमार्थाचे मार्गावर उपलब्ध होते.
- शं.ना.बेंडे पाटील, अकोला.