Sankashti Chaturthi March 2021: मराठी वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी; पाहा, शुभ मुहूर्त आणि महती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 10:50 AM2021-03-30T10:50:58+5:302021-03-30T10:54:55+5:30
sankashti chaturthi march 2021: मराठी वर्षातील अखेरची संकष्ट चतुर्थी साजरी होईल. जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीचा शुभ, मुहूर्त, महती आणि काही मान्यता...
भारतीय संस्कृतीत साजऱ्या होणाऱ्या सण-उत्सव, व्रत-वैकल्यांपैकी अधिक महत्त्व प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थीलाही आहे. कारण गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे लाडके दैवत. हजारो भाविक लहान वयापासून संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायकी चतुर्थीचे व्रत केले जाते. तर, वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. बुधवार, ३१ मार्च २०२१ रोजी मराठी वर्षातील अखेरची संकष्ट चतुर्थी साजरी होईल. जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीचा शुभ, मुहूर्त, महती आणि काही मान्यता... (sankashti chaturthi march 2021)
गणपती बाप्पाचे केवळ नाव उच्चारताच वातावरण एकदम आनंददायी, मंगलमय होते. गणपती बुद्धीची देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. फाल्गुन वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाईल.
फाल्गुन संकष्ट चतुर्थी: बुधवार, ३१ मार्च २०२१
फाल्गुन वद्य चतुर्थी प्रारंभ: बुधवार, ३१ मार्च २०२१ रोजी दुपारी ०२ वाजून ०४ मिनिटे.
फाल्गुन वद्य चतुर्थी समाप्ती: गुरुवार, ०१ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११ वाजता.
चंद्रोदय वेळ: रात्रौ ०९ वाजून ४१ मिनिटे.
देवघरात नेमके कोणते आणि किती देव ठेवावेत, जाणून घ्या!
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. असे असले, तरी संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे फाल्गुन महिन्यातील संकष्ट चतुर्थी बुधवार, ३१ मार्च २०२१ रोजी साजरी करावी, असे सांगितले जाते. (sankashti chaturthi march 2021 date)
संकष्ट चतुर्थीच्या व्रताचे आगळे-वेगळे महत्त्व
फाल्गुन संकष्ट चतुर्थीचे विशेष म्हणजे ही मराठी वर्षातील अखेरची चतुर्थी आहे आणि दुसरे म्हणजे मार्च महिन्यातील ही दुसरी चतुर्थी आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आला होता. मुलांच्या प्रगतीसाठी, दीर्घायुष्यासाठी अनेक पालक संकष्टीचे व्रत करतात. एवढेच काय, तर खुद्द यशोदा मय्याने कृष्णाच्या खोड्या कमी व्हाव्यात म्हणून संकष्टीचे व्रत केले होते. गणपती हा मंगलमूर्ती आहे. म्हणून त्याची उपासना करणाऱ्या व्यक्तीचे अमंगल होत नाही, अशी धारणा आहे. भावभक्तीने हे व्रत केल्यामुळे ग्रहदशा सुधारते व अनिष्ट ग्रहस्थिती असल्यास बाप्पाच्या कृपाशिर्वादाचे पाठबळ मिळते. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यामुळे घरात मंगलमय वातावरण राहते. तसेच मंगल कार्यांना गती मिळते.