Sarva PItru Amavasya 2023: सर्वपित्री तसेच शनी अमावस्येला मिठाचा तोडगा करा आणि शनिदोषातून मुक्ती मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 05:10 PM2023-10-11T17:10:22+5:302023-10-11T17:10:42+5:30
Astrology Tips: सर्वपित्री अमावस्या शनिवारी आल्याने तिचे महत्त्व अधिक वाढले आहे, यादिवशी केलेले उपाय तुमच्यासाठी कसे लाभदायी ठरतील ते जाणून घ्या!
१४ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे आणि ही तिथी शनिवारी आल्याने ती शनी अमावस्या म्हणून ओळखली जाईल. हा दिवस पितृपक्षाचा शेवट मानला जातो. तसेच शनी अमावस्या असल्याने या दिवशी न्यायदेवता शनिदेवाची पूजा करण्याचा नियम आहे. शनि अमावस्येला जप, तप, ध्यान, दान इत्यादी केल्याने चांगले फळ मिळते. ज्योतिष शास्त्रानुसार शनि अमावस्येच्या दिवशी मिठाशी संबंधित उपाय केल्यास लक्ष्मी मातेची कृपा त्यांच्या कुटुंबावर सदैव राहते आणि घरातील वातावरणही सकारात्मक राहते. जाणून घेऊया शनि अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करावेत ते!
ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र, शुक्र आणि राहूचे प्रतीक मानले जाते. याचा वापर केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते. ग्रहस्थिती सुधारते. आर्थिक स्थिती मजबूत होते. मीठ समुद्रातून मिळाले आणि लक्ष्मी ही समुद्राची कन्या, त्यामुळे मीठाला लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. लक्ष्मी देवी आपल्या घराकडे आकृष्ट व्हावी, यासाठी वास्तुशास्त्रातही मिठाचे उपाय सांगितले जातात. ते पुढील प्रमाणे-
>> अमावास्येच्या दिवशी घराची साफसफाई मिठाच्या पाण्याने करावी. यासाठी फार नाही, तर केवळ चमचा भर साधे मीठ किंवा खडे मीठ पाण्यात टाकावे आणि त्या पाण्याने घराची जागा पुसावी. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. यासोबतच तुमच्या घरात लक्ष्मी माता मुक्काम करेल, तिचा आशीर्वाद मिळेल. गुरुवार सोडून तुम्ही दररोज हा उपाय करू शकता.
>> शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी काचेच्या ग्लासमध्ये थोडे मीठ आणि पाणी टाकून नैऋत्य दिशेला ठेवावे. पाण्याची वाफ झाल्यास ग्लास पुन्हा पाण्याने भरावा. हा उपाय त्या दिवसभरापुरताच करावा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यक्तीच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
शनिश्चरी अमावस्येसाठी इतर उपाय
>> शनि अमावस्येच्या दिवशी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावेत. यामुळे सुख समृद्धी मिळेल.
>> शनि अमावस्येच्या दिवशी पितरांना जल अर्पण करण्यासोबतच आपल्या क्षमतेनुसार दान अवश्य करावे त्यामुळे घरावर अकल्पित संकट येत नाही.
>> अमावास्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. पाणी घालावे आणि 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करताना सात प्रदक्षिणा घालाव्यात. ही प्रार्थना त्रिदेवांपर्यंत पोहोचते. कारण पिंपळाच्या झाडावर त्रिदेवतांचा वास असतो असे श्रीकृष्णांनी गीतेत सांगितले आहे.
>> शनि अमावस्येच्या एखाद्या गरजवंताला अन्न, कपडे किंवा त्याला उपयोगी पडेल अशी वस्तू दान करावी. शनी देवांचा आशीर्वाद लाभेल.
>> शनि अमावस्येला शनिदेवाला मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करावे. यामुळे कुंडलीतील साडेसातीच्या त्रासापासून किंवा शनी प्रभावापासून बचाव होतो.