वर्षभरात एकूण तीन नवरात्री येतात. पहिली चैत्र नवरात्र, दुसरी शारदीय नवरात्र आणि तिसरी शाकंभरी नवरात्र. चैत्र नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असते. शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते. तर शाकंभरी नवरात्र पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते. चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र उत्साहात साजरी केली जाते, परंतु शाकंभरी नवरात्राबद्दल अनेकांना पुरेशी माहिती नसते. काय आहे या नवरात्रीचे वैशिष्ट आणि ती कशी साजरी करतात, याची सविस्तर माहिती ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या 'धर्मबोथ' या ग्रंथातून जाणून घेऊया.
हेही वाचा : Navratri 2020: त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसी नाही...देवीच्या आरतीचा भावार्थ!
पौष शुद्ध सप्तमीच्या दिवशी शाकंभरी देवीचे नवरात्र सुरू होते. ह्याचे सारे पूजाविधी हे अश्विनातील देवी नवरात्रीसारखेच आहेत. अनेक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबाची शाकंभरी देवी ही कुलदेवता आहे. हिचे दुसरे नाव 'बनशंकरी' असे आहे. या बनशंकरीचे विजापुरातील बादामी येथे मंदिर आहे. या काळात तिथे फार मोटा रथोत्सव असतो. वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते.
शाकंभरी नवरात्रीची कथा
देवीभागवतामध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा आहे. त्यानुसार, एकदा आपल्या देशात अवर्षणामुळे लोक अन्नपाणी नसल्यामुळे तडफडून प्राण सोडू लागले. त्यांच्या या दीनस्थितीने देवीला त्यांची दया आली. त्यावेळी तिने आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या भाज्या, पालेभाज्या निर्माण केल्या. त्या या मरणासन्न जनांना प्रेमाने खाऊ घालून देवीने त्यांचे प्राण वाचवले. म्हणून तिला 'शाकंभरी' हे नाव प्राप्त झाले. अशी क्षुधाशांती करणारी देवी, म्हणून तिची प्रार्थना करूया.
या देवि सर्व भुतेषु क्षुधारूपेण संस्थिता,नम: तस्यै, नम: तस्यै, नम: तस्यै नमो नम:
महाभारतातील वनपर्वामध्ये देवीने केवळ पालेभाज्या खाऊन एक हजार वर्षे तप केले, म्हणून तिला 'शाकंभरी' हे नाव मिळाले अशी कथा आहे.
शाकंभरी देवीचा नैवेद्य
ज्यांची ही कुलदेवता आहे, ती मंडळी पौष शुक्ल सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत या देवीचा नवरात्रोत्सव भक्तीपूर्वक साजरा करतात. पौष पौर्णिमेला देवीला साठ भाज्या आणि साठी कोशिंबिरींचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. म्हणून या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हणतात.
अलिकडच्या काळात आरोग्याबद्दल समाज सजग झाला आहे. आहाराचे संतुलन आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञदेखील फळे, भाज्या, कोशिंबिरी, भाज्यांचे, फळांचे रस घेण्याचा सल्ला देतात आणि लोक ऐकतातही!
शाकंभरी नवरात्रीनिमित्त असाही एक संकल्प
शाकंभरी नवरात्रानिमित्त मुद्दाम नऊ दिवस विविध भाज्या मुद्दाम आहारात समाविष्ट कराव्यात. तसेच इतरांनाही रसरूपात द्याव्यात. ही एवढी सोपी गोष्ट 'व्रत' म्हणून कोणालाही करता येणे सहज शक्य आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही हे व्रत हितकारक आहे. चला तर, 'जय माता दी' म्हणत शाकंभरी देवीचा उत्सव साजरा करूया आणि आरोग्याचे संवर्धन करूया.
हेही वाचा : Navratri 2020 : नवरात्रीत करा सप्तशतीमधील सिद्धमंत्रांचे पठण, भक्तिमय होईल वातावरण!