घरातून आजारपण जात नाहीये? वास्तुशास्त्रात सांगितलेले उपाय करून पहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 04:20 PM2021-04-28T16:20:48+5:302021-04-28T16:21:33+5:30
वास्तूशास्त्रानुसार घरात दीर्घकाळ आजारपण टिकण्याचे कारण घरातल्या वास्तुदोषांना जाते. ते वास्तुदोष दूर कसे करता येतील हे जाणून घेऊया.
अनेकदा आपण आरोग्याची, आहाराची उचित काळजी घेऊनही घरात आजारपणाचा शिरकाव होतो. छोटे मोठी दुखणी प्रत्येकालाच होत असतात. परंतु जेव्हा एखाद्याचे आजारपण दीर्घकाळ जात नाही आणि त्या व्यक्तीची सेवा सुश्रुषा करून घरातील इतर सदस्यांना आजारपण येते, तेव्हा औषध उपचार यांबरोबरच वास्तुशास्त्रात दिलेले काही उपाय अवश्य करून पहा.
वास्तूशास्त्रानुसार घरात दीर्घकाळ आजारपण टिकण्याचे कारण घरातल्या वास्तुदोषांना जाते. ते वास्तुदोष दूर कसे करता येतील हे जाणून घेऊया.
तुमच्या राहत्या घराच्या किंवा इमारतीच्या समोर एखादा मोठा खड्डा असेल, तर तो आधी बुजवून घ्या. त्यामुळे घरातल्या सदस्यांना शारीरिक, मानसिक दुखणी उद्भ्वत राहतात. त्याचप्रमाणे घराच्या, इमारतीच्या समोरील मुख्य बाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. तो परिसर अस्वच्छ असल्यास तेही आजारपणाचे कारण बनते.
वास्तूचा मध्यभाग रिकामा असायला हवा. त्याला वास्तूचे ब्रह्मस्थान म्हणतात. पूर्वीच्या काळी चौसोपी वाड्यात मधला भाग अंगणासारखा मोकळा असे. आताच्या काळात घरात तसे मोकळे अंगण करता आले नाही, तरी निदान त्या जागेवर जड सामान, फर्निचर, सोफासेट, टेबल या गोष्टी ठेवू नयेत. तेवढा भाग मोकळा ठेवला पाहिजे, अन्यथा वास्तुदोष निर्माण होतो, असे वास्तुशास्त्र सांगते.
उत्तर पूर्व दिशा, ज्याला ईशान्य कोन म्हटले जाते, ती जागा भगवंताच्या वास्तव्याची समजली जाते. त्या दिशेला टॉयलेट किंवा शिडी असणे, वास्तुदोषाचे मोठे कारण मानले जाते. त्यामुळे घरात सतत आजारपण येते. महिलांना देखील शारीरिक व्याधी संभवतात. त्या दिशेला देवघर असणेच शुभ ठरते. परंतु आता त्यात बदल करणे शक्य नसेल, तर किमान घराचा प्रत्येक ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि आजारी व्यक्तीने ईशान्येकडे डोके करून झोपू नये. या नियमांचे पालन करावे.
वास्तूमध्ये स्वयंपाकघर दक्षिण पूर्व अर्थात आग्नेय दिशेला असले पाहिजे. ती दिशा स्वयंपाकघराच्या दृष्टीने लाभदायक ठरते. परंतु तसे नसेल, तर घरातील सदस्यांमध्ये वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण जास्त दिसते. विशेषतः घरातल्या कमावत्या व्यक्तीला त्याचा जास्त त्रास होतो. परंतु तुमचे स्वयंपाकघर आग्नेय दिशेला नसेल, तर जिथे स्वयंपाक घर आहे, त्या जागी भिंतींना ट्रॉली किचनला लाल रंग लावून घ्यावा. म्हणजे वास्तुदोष दूर होऊन सर्वांची तब्येत ठीक राहते.