मानसशास्त्राचा तास सुरू होणार होता. विद्यार्थी आपापल्या जागेवर बसले होते. शिक्षक येताच सगळ्यांनी एकत्र उभे राहून त्यांना अभिवादन केले. शिक्षकांनी सर्वांना बसण्याची अनुमती दिली. टेबलावर पाण्याचा एक पेला आणि जग ठेवला होता. शिक्षकांनी रिकामा पेला अर्धा भरला आणि तो हातात धरत विद्यार्थ्यांकडे पाहिले. विद्यार्थ्यांना वाटले, आता नेहमीचा ठरलेला प्रश्न विचारला जाणार, `पाण्याचा पेला अर्धा भरलेला आहे की रिकामा?'
पण तसे झाले नाही. शिक्षकांनी वेगळाच प्रश्न विचारला. ते म्हणाले, पाणी ओतलेल्या या पेल्याचे वजन साधारण किती असेल? या अनपेक्षित प्रश्नाने विद्यार्थी गोंधळले. त्यांनी आपल्या परीने वेगवेगळी उत्तरे दिली. त्यांचे बोलून झाल्यावर शिक्षक म्हणाले, `पेल्याचे वजन किती आहे, हे महत्त्वाचे नसून पाण्याचा पेला तुम्ही किती वेळ धरून ठेवणार आहात, हे महत्त्वाचे आहे. हा पेला तुम्ही एक मिनिटं धरून ठेवला तर तुम्हाला त्याचे वजन जाणवणार नाही. तासभर धरून ठेवला, तर हाताला मुंग्या येतील. एक दिवसभर धरून ठेवला, तर हात जड होईल आणि कधी एकदा तो पेला हातून टाकून देतो असे होईल.
तीच बाब आपल्या समस्यांची आहे. आपले प्रश्न, समस्या यांच्याकडे काही क्षण पाहिले, तर आपल्याला त्रास होणार नाही. तासभर त्याचा विचार केला, तर डोके जड होईल. दिवसभर विचार केला तर डोके भणाणून जाईन. मग सबंध आयुष्य त्याच चिंतांचा, समस्यांचा विचार करत राहिलो तर वेड लागण्याचीच वेळ येईल.
यावर उपाय हाच आहे, की जे प्रश्न सोडवता येतील त्याची उकल शोधण्याचा प्रयत्न करा. विचार करायचाच असेल तर पर्यायाचा करा, समस्यांचा नाही! तोही किती वेळ करायचा हे ठरवून टाका. कोणतेही कारण असो, त्रास तुम्हालाच होणार आहे. तो करून घेऊ नका. पाण्याचा पेला अर्धा भरलेला आहे की रिकामा याचबरोबर तो किती वेळ धरून ठेवायचा, याचाही विचार करून ठेवा.
मनसोक्त जगा. प्रश्न आज आहेत उद्या नाहीत. परिस्थिती बदलत असते. अति विचाराने प्रश्न सुटत नाहीत. जे लोक प्रश्न कधी सुटतील याचा विचार करतात, ते कायम अडकून राहतात आणि जे लोक प्रश्न कसे सुटतील यासाठी प्रयत्न करतात, ते हमखास परिस्थितीतून मार्ग काढतात. जे प्रश्न सुटत नाहीत, ते सोडून द्या, आपोआप सुटतील. परंतु प्रश्नांमागे लागून आयुष्य संपवू नका. आयुष्यात करण्यासारखे बरेच काही आहे. यासाठी शाळेतला एक नियम लक्षात ठेवा, परीक्षेत प्रश्नपत्रिका हाती आल्यावर येत असलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहून आपण मोकळे होत असू आणि जे येत नाहीत, ते सोडून देत असू, हाच सोपा उपाय आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडवताना उपयोगात आणू, म्हणजे सोडवलेले प्रश्न जास्त गुणांची कमाई करून देतील.