प्रभुला अनन्य शरण रिघा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 06:54 PM2020-11-12T18:54:58+5:302020-11-12T18:58:52+5:30

अनन्य भावाने जो भक्त भगवंताला शरण जातो त्याच्या सर्व संकटांचे भगवान निवारण करतात. असा अनन्य भाव ज्या भक्ताजवळ असतो त्याला देव अंतकाळी अंतीम दुःखातून मुक्त करतो...!

surrender to the Lord without acceptation..! | प्रभुला अनन्य शरण रिघा..!

प्रभुला अनन्य शरण रिघा..!

googlenewsNext

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

अनन्य भावाने जो भक्त भगवंताला शरण जातो त्याच्या सर्व संकटांचे भगवान निवारण करतात. भक्तांसाठी श्रीहरी कसे धावून येतात आणि किती त्वरेने धावून येतात..? याचे वर्णन संतश्रेष्ठ तुकाराम महाराज एका अभंगात करतात -

गजेंद्र पशू आप्ते मो कलीला । तो तुज स्मरला पांडुरंग ॥
त्यासाठी गरुड सोडून धावसी । मोहे झळंबिसी दीनानाथ ॥
धेनू वत्सावरी झेप घाली जैसी । तैसे गजेंद्रासी सोडविले ॥

श्रीमद् भागवत ग्रंथात गजेंद्र आख्यान प्रसिद्ध आहे. इंद्रद्युम्न नावाच्या राजाला अगस्ती ऋषींच्या शापामुळे गजेंद्र नावाच्या हत्तीचा जन्म मिळाला. हा गजेंद्र त्रिकूट पर्वतावर आपल्या कळपासह राहत होता. एकदा या गजेंद्राला जलक्रीडा करण्याची उत्कट इच्छा झाली. तो आपल्या परिवारासह जलक्रीडा करण्यासाठी पुष्कर तलावात आला. देहभान विसरून जलक्रीडा करीत असतांना हा गजेंद्र या पुष्कर तलावाच्या मध्यभागी आला. तिथे एक अजस्र मगर होती. या मगरीने गजेंद्र नावाच्या या हत्तीचा पाय सर्व शक्तिनिशी पकडला. ती मगर या हत्तीला खोल डोहात ओढत होती. गजेंद्र मगर मिठीतून पाय सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता पण त्यात त्याला यश आले नाही. त्याने आपल्या परिवारातील सर्व हत्तींना मदतीसाठी बोलाविले पण

कठिण समय येता कोण कामासी येतो..?

याचा प्रत्यय गजेंद्राला आला. परिवारातील सर्वजण पळून गेले. गजेंद्राला कळाले की, ज्या परिवारासाठी आपण जन्मभर कष्ट केले ते सर्वजण आपल्याला सोडून निघून गेले. तुकोबा म्हणतात -

माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी ।
इष्ट मित्र सज्जन सखे होती सुखाची मांडणी ॥

त्याने पूर्व पुण्याईमुळे भगवंताचा आर्तऽ धावा केला. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी भागवतात अतिशय बहारीचे वर्णन केले आहे -

गज सरोवरी मोहग्रस्त । स्त्रिया पुत्रा सांडिली जीत ॥
तो अंतकाळी माते स्मरत । आर्त भूल अति स्तवने ॥

ईश्वराशिवाय आपले कोणी नाही या निश्चयाने त्याने श्रीहरिचा आर्त धावा केला. गजेंद्राची ती आर्त हाक ऐकून देव कसा आला..? तर त्याचे वर्णन तुकाराम महाराज करतात -

धेनू वत्सावरी झेप घाली जैसी । तैसे गजेंद्रासी सोडविले ॥

भगवंतांनी आपल्या सुदर्शन चक्राने त्या नक्राचा (मगरीचा) उद्धार केला आणि गजेंद्राला मगर मिठीतून मुक्त केले. असा अनन्य भाव ज्या भक्ताजवळ असतो त्याला देव अंतकाळी अंतीम दुःखातून असाच मुक्त करतो.

संतसम्राट ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -

जो मज होय अनन्यशरण । तयाचे निवारी मी जन्ममरण ।
यालागी शरणागता शरण । मी ची एक ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

Web Title: surrender to the Lord without acceptation..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.