पद्म पुराणातही दिले आहे षटतिला एकादशीचे महत्त्व; वाचा सविस्तर माहिती, कथा आणि उपासना!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 08:00 AM2022-01-26T08:00:00+5:302022-01-26T08:00:02+5:30
केवळ स्वतः साठी न जगता दुसऱ्यांना सहाय्य करा, यथाशक्ती दानधर्म करा, जेणेकरून जिवंतपणी आणि मरणोत्तर विष्णूंची कृपा लाभेल.
आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशी मुख्य असल्या, तरीही वर्षभरातील उर्वरित एकादशींचे महत्त्व ओळखून त्यांना विशेष ओळख दिली आहे. त्यानुसार माघ शुक्ल एकादशीप्रमाणे पौष कृष्ण एकादशीलाही षटतिला एकादशी असे नाव आहे. २८ जानेवारी रोजी षटतिला एकादशी आहे, जाणून घेऊया तिचे महत्त्व!
षटतिला एकादशीची व्रत कथा:
पद्म पुराणात षटतिला एकादशीची व्रत कथा आढळते. त्यानुसार एक महिला विष्णुभक्त होती. तिने विष्णूंची उपासना केली. भक्ती केली. तरी मरणोत्तर तिला वैकुंठ प्राप्ती न होता पुन्हा जन्म मिळून एक साधी झोपडी मिळाली. तिने भगवान विष्णूंचा आर्जव करून त्याचे कारण विचारले, तेव्हा विष्णू तिला म्हणाले, 'गत जन्मात तू केवळ उपासना केलीस परंतु कधी कोणाला दान धर्म केला नाहीस. एक वृद्ध म्हातारा तुझ्या दारावर आला असता तू त्याला काही न देता विन्मुख पाठ्वलेस. तुझ्या पदरी दान धर्माचा पुण्यसंचय कमी पडला म्हणून तुला पुन्हा जन्म मिळाला. हा जन्म सार्थकी लावण्यासाठी तू जेव्हा देवकन्या तुझ्या दाराशी येईल तेव्हा तिला तिळाचे दान कर. अन्न दान श्रेष्ठ दान आहे. त्याचे महत्त्व जाणून एकादशीला म्हणजे माझ्या आवडत्या तिथीला हे दान केले असता तुला मोक्ष मिळेल आणि तू वैकुंठ प्राप्ती करशील. हाच नियम आपल्यालाही लागू होतो. म्हणून केवळ स्वतः साठी न जगता दुसऱ्यांना सहाय्य करा, यथाशक्ती दानधर्म करा, जेणेकरून जिवंतपणी आणि मरणोत्तर विष्णूंची कृपा लाभेल.
षटतिला एकादशीचे महत्त्व :
पौष मासात थंडीचे विशेष प्राबल्य असते. त्या थंडीपासून आपले आरोग्य नीट राखले जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी या महिन्यात तिळाचा विशेष उपयोग विविध व्रतांमध्ये कसा केला जाईल, हे बघितले आहे. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही षटतिला एकादशी! मकरसंक्रांतीच्या निमित्ताने लाडवांचा गोडवा या मासाला लाभला आहे, तो वेगळाच! निसर्गचक्राची आरोग्याशी योग्य सांगड घालणारे हे व्रत आरोग्यदायी असल्यामुळे आरोग्यासाठी म्हणून हे व्रत जरूर करावे.
षटतिला एकादशीचा व्रतविधी :
इतर एकादशीप्रमाणे या व्रताचा विधी आहे. व्रत कर्त्याने प्रात:काळी स्नान करावे. विष्णूपूजा करून नंतर 'ऊँ श्रीकृष्णाय नम:' या मंत्राचा जमेल तेवढा जप करावा. दिवसभराचा उपास करावा. तिळमिश्रित पाण्याने स्नान करावे, तिळांचे हवन करावे, तीळ घातलेले पाणी प्यावे. तीळ घातलेल्या पाण्याचे दान करावे. तीळ असलेल्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. असा सहा तऱ्हेने तिळाचा वापर या षटतिला एकादशीच्या व्रतानिमित्ताने आवर्जून केला जातो. सर्व पापनाशार्थ हे व्रत केले जाते.
षटतिला एकादशीनिमित्त हवन विधी :
तसेच या व्रताला तिलधीव्रत असेही म्हटले जाते. यानुसार षटतिला एकादशीला तीळ मिश्रित गोवऱ्यांचे हवन करणे अपेक्षित असते. परंतु आताच्या काळात शहरात गाईचे शेण मिळणे दुरापास्त आहे. तसेच त्याच्या गोवऱ्या स्वत: करणे देखील कोणी पसंत करणार नाही. त्याऐवजी पूजा हवन साहित्याच्या दुकानातून तयार शेण्या आणून त्याच्या बरोबर तीळ गेऊन दोन्हीचे एकत्रित हवन करणे सोपे होईल. अर्थात हवनही माफक प्रमाणात करणे उचित होईल. अन्यथा शेजाऱ्यापाजाऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. थंडीच्या दिवसात सर्दी खोकला तसेच अनेक आजार होत राहतात. हवनाच्या निमित्ताने गोवऱ्यांचा वापर केल्याने वातावरणशुद्धी होते. घर प्रसन्न वाटते. असा अध्यात्मिक आणि शास्त्रीय हेतू पाहता षटतिला एकादशीचे व्रत आपल्यालाही सहज अनुसरता येईल.