सोवळे ओवळे ही संकल्पना कोणत्याही जातीशी संबंधित नाही, त्यामागील विज्ञान समजून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 03:36 PM2022-01-25T15:36:25+5:302022-01-25T15:37:33+5:30
सोवळ्यात असणे याचा अर्थ दुसऱ्याला हात लावू नकोस सांगून हिणवणे असा अर्थ होत नाही. सोवळ्या ओवळ्याचे प्रदर्शन होऊ न देता आपल्यापुरती स्वच्छता पाळून आपले विहित कार्य पार पाडावे असे शास्त्राने सुचवले आहे.
वैदिक धर्माचे सविस्तर प्रतिपादन करणाऱ्या स्मृती, पुराणग्रंथ, धर्मग्रंथ यातून स्पर्श्य अस्पर्श या संकल्पनेवर विचार केलेला दिसून येतो. त्यालाच आपण सोवळे ओवळे म्हणतो. परंतु हल्ली या शब्दावरून सर्रास जातीयवाद गृहीत धरला जातो. परंतु यात काहीएक तथ्य नसून हा शब्द, ही संकल्पना विज्ञान आणि संस्कारांशी संबंधित आहे. कशी ते पाहू...
साधे उदाहरण घ्यायचे झाले, तर एखाद्या कारखान्यात सतत यंत्रापाशी उभे राहून काम करणारा कामगार घरी पाऊल ठेवतो तेव्हा तो अस्पर्श असतो. पण जेव्हा तो हात-पाय धुऊन, स्नान करून, स्वच्छ कपडे परिधान करून येतो, तेव्हा तो स्पर्श्य ठरतो. याचप्रमाणे शास्त्राने प्रमाण ठरवले आहे. जेणेकरून धर्माची वा व्यक्तीची कोणतीही हानी न होता लाभ व्हावा, अशी बंधने शास्त्रकारांनी घालून दिली आहे.
सोवळ्यात असणे याचा अर्थ दुसऱ्याला हात लावू नकोस सांगून हिणवणे असा अर्थ होत नाही. सोवळ्या ओवळ्याचे प्रदर्शन होऊ न देता आपल्यापुरती स्वच्छता पाळून आपले विहित कार्य पार पाडावे असे शास्त्राने सुचवले आहे.
ही संकल्पना केवळ स्वच्छतेशी निगडित आहे. बाहेरून आल्यावर हात पाय स्वच्छ धुण्याचा संस्कार जो विस्मरणात गेला होता, तोच संस्कार कोरोनाकाळात मनामनावर बिंबवला गेला. हात धुणे, सॅनिटाईज करणे, बाहेरून आल्यावर कपडे, चपला, वस्तू एका जागी ठेवणे, हे सुद्धा सोवळेच नव्हे का?
देव धर्म कार्याशी संबंधित आपण जेव्हा एखादी उपासना करतो तेव्हा देहाइतकीच मनाची शुद्धी राहावी, पावित्र्य राहावे याकरिता अन्य विषय, विकार यांची जडण न होता शुचिता जपली जावी, हा सोवळ्या ओवळ्याचा उद्देश आहे त्याचे कोणीही अवडंबर करू नये. संतांनीदेखील अतिशयोक्ती ठरणाऱ्या कर्मकांडांचा निषेधच केला आहे. आपणही त्याचे मर्म जाणले पाहिजे.
त्यामुळे या संकल्पनेचा संबंध कोणत्याही ठराविक जातीशी जोडणे चुकीचे ठरेल. धर्मशास्त्राने सर्वांच्या हिताच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने काही नियम घालून दिले आहेत, त्याचे आपण डोळसपणे पालन केले पाहिजे. कोणत्याही जाती-धर्म-लिंगाबद्दल मनात द्वेष न ठेवता सर्वांशी मिळून राहिले पाहिजे. याठिकाणी सोवळे देहासाठी नसून मनासाठी असायला हवे, हे लक्षात घेतले पाहिजे.