वारकऱ्यांएवढा सुखी जगात कोणीच नाही : बाबा महाराज सातारकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 03:55 AM2020-07-03T03:55:43+5:302020-07-03T03:56:18+5:30
आषाढी एकादशीनिमित्त ऑनलाइन कीर्तन
मुंबई : माणसाच्या आयुष्यातील सर्व खटाटोप सुख मिळविण्यासाठी सुरू असतो. माणूस सर्व गोष्टींचा त्याग करू शकतो; परंतु सुखाचा त्याग कधीच करू शकत नाही. कधीकधी माणसाकडे संपत्ती असूनही सुखाचा अभाव असतो. हे पारतंत्री जीवन आहे; परंतु वारकरी हा कधीच पारतंत्री नसतो. वारकरी एक वेळ फाटके व मळके कपडे घालेल; पण ऊन व पावसाला न घाबरता सुखाने पंढरपूरला जाईल. नामदेव महाराजांनीदेखील सांगितले, की जो माणूस सुखासाठी तळमळत आहे त्याने एकदा पंढरपूरला जायला हवे.
त्यामुळे वारकऱ्यांएवढा सुखी माणूस जगात कोणीच नाही, असे निरूपण सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार बाबा महाराज सातारकर यांनी केले. आषाढी एकादशीनिमित्त बुधवारी ‘लोकमत’च्या ‘लोकमत भक्ती’ या यू ट्युब चॅनलवर बाबा महाराज सातारकर यांच्या ऑनलाइन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बाबा महाराज सातारकर यांनी सुंदर अभंगाने कीर्तनास सुरुवात केली. ते म्हणाले, पांडुरंगाला भेटता न आल्याचे दु:ख सर्व वारकºयांना आहे. मात्र जगात ज्या ठिकाणी देव आहे, ती पंढरी आहे.
ऑनलाइन कीर्तनाची सांगता गायक मंगेश बोरगावकर व गायिका सावनी रवींद्र यांच्या सुंदर अभंगाने झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री सिद्धी पाटणे यांनी केले. हे कीर्तन आपणास ‘लोकमत भक्ती’ या यू ट्युब चॅनलवर तसेच फेसबुकवर पाहता येणार आहे.
कीर्तन ऐकण्यासाठी लिंक - bit.ly/Abhangrang_YT
फेसबुक - bit.ly/Abhangrang_FB