अति विचार वाईटच; विचार बदला, नशीब बदलेल!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 20, 2021 09:00 AM2021-01-20T09:00:00+5:302021-01-20T09:00:02+5:30
अति विचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या अस्तित्वातही नसतात...!
एक धनिक गुरुंजवळ गेला आणि त्यांना म्हणाला, 'गुरुदेव, विचार करून करून माझे डोके भणाणून जाते. ते थांबवण्यासाठी काहीतरी उपाय सुचवा.' गुरुदेवांनी त्याच्या हाती एक चमचा दिला आणि त्याला घेऊन समुद्र किनाऱ्यावर गेले. धनिकाला वाटले, गुरुजी आपल्याला काहीतरी मंत्र सांगणार असतील. बराच वेळ सागरी लाटांकडे पाहिल्यावर एका क्षणी गुरुदेव म्हणाले, `वत्सा, हा समुद्र तुला दिसतोय ना, तो तुला हातातल्या चमच्याने वेचत विरुद्ध बाजूला आणायचा आहे. तसे केल्याने तुझे विचार आपोआप संपतील.' हे ऐकून धनिक चक्रावला, म्हणाला, `गुरुदेव, माझी पूर्ण हयात या कामात निघून जाईल, तरी हा समुद्र इवल्याशा चमच्याने इकडचा तिकडे हलायचा नाही.' यावर हसत गुरुदेव म्हणाले, `वत्सा, एवढे तर कळतेय ना? मग या समुद्राकडे बघ. विचारांचा सागर असाच आहे. त्याला भरती ओहोटी येत राहणार. तू चमचा चमचा प्रयत्न सुरू कर. समुद्र नाही, तर किमान तळे तरी साठेल! म्हणून अतिविचार सोडून दे आणि कामात स्वत:ला गुंतवून घे.'
वरील गोष्टीवरून आपल्यालाही हाच संदेश मिळतो, की नुसता विचार करून उपयोग नाही, त्याला कृतीची जोड द्यायला हवी. परंतु नुसत्या विचारांना बांध कोण घालणार? विचार करू नका म्हटले, की शेकडो विचार येतात. शेकडो विचारांना हजारो फाटे फुटतात. विचारांची ही अखंड साखळी आहे. परंतु त्यातून निष्पत्ती काय? तर शून्य! उलट, अति विचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या अस्तित्वातही नसतात...!
हे विचार थांबवायचे तरी कसे? विचारांना चालू, बंद करण्याचे बटण नाही. ते सुरूच राहतात. अशात कोणी फार विचार करू नको असा सल्ला दिला, की विचारांना आणखी चार चाके जोडली जाऊन विचारांची गती वाढते. मग प्रश्न पडतो, विचार करणे ही प्रक्रिया चांगली म्हणावी की वाईट?
विचार करणे चांगलीच बाब आहे, परंतु अति विचार वाईटच! नुसता विचारही वाईटच! मग विचार साखळीचा मध्य कसा गाठावा? तर विचारांची दिशा योग्य आहे की योग्य हे ठरवून! आपल्याला चांगले, वाईट यातला फरक कळतो. आपण आपल्या वैयक्तिक रागा-लोभापायी विचारांकडे तटस्थपणे बघणे विसरतो. ती कला अवगत करायला हवी, म्हणजे विचारांचे संतुलन करता येते.
आपल्याला वाटते, आयुष्यातील प्रश्न संपले, म्हणजे अति विचारांचे चक्र थांबेल. परंतु, हे सत्य नाही. कारण, दरदिवशी नवे प्रश्न निर्माण होत राहणार आहेत. मग, या प्रश्नांची उकल काढत बसण्यात आयुष्य वाया घालवायचे का? प्रश्न सोडून द्यायचे का? दुर्लक्ष करत जगायचे का? तर नाही! विचारांची दिशा बदलायची. केवळ सकारात्मक दृष्टीकोन उपयोगाचा नाही, तर प्रश्न सोडवण्यासाठी आधी वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. वास्तवदर्शी अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. म्हणजे अपेक्षाभंग होत नाही आणि अति विचारांना खतपाणी मिळत नाही.
विचार दोन प्रकारचे असतात. एक प्रश्नार्थक विचार आणि दुसरे पर्यायात्मक विचार. प्रश्नार्थक विचार न थांबणारे आहेत. त्यांचा विचार करून हाती काहीच लागणार नाही. याउलट पर्यायांचा विचार करून कामाला सुरुवात केली, तर प्रश्न आपोआप सुटत जातील. आपल्याला पर्यायाचा विचार करून प्रश्न मार्गी लावायचे आहेत आणि पर्यायाने आयुष्यही!