वारकरी संप्रदायातील 'चैतन्य'मूर्ती आणि त्यांनी अबाधित ठेवलेली ज्ञानेश्वरी चातुर्मास प्रवचन सोहळ्याची परंपरा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: November 4, 2020 02:29 PM2020-11-04T14:29:38+5:302020-11-04T14:31:12+5:30

वारकरी संप्रदायात अग्रणी नाव असलेले देगलूरकर घराणे पंढरपुरात २०० हुन अधिक वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे चालवत आहेत. त्याच वंशातील ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर यांनीदेखील ती परंपरा अबाधित ठेवली आहे. आज तारखेनुसार त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कार्याची, ज्ञानेश्वरी चातुर्मास सोहळ्याची आणि देगलुरकर कुटुंबियांच्या वारकरी परंपरेची उजळणी.

Tradition of 'Chaitanya' idol and Dnyaneshwari Chaturmas discourse ceremony of Warkari sect! | वारकरी संप्रदायातील 'चैतन्य'मूर्ती आणि त्यांनी अबाधित ठेवलेली ज्ञानेश्वरी चातुर्मास प्रवचन सोहळ्याची परंपरा!

वारकरी संप्रदायातील 'चैतन्य'मूर्ती आणि त्यांनी अबाधित ठेवलेली ज्ञानेश्वरी चातुर्मास प्रवचन सोहळ्याची परंपरा!

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ

माऊलींच्या ज्ञानेश्वरीत मनुष्याच्या जगण्याचे सार एकवटले आहे. म्हणून नामदेव महाराज आग्रह धरतात, 

'नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी, 
एक तरी ओवी अनुभवावी.'

इथे त्यांनी 'वाचावी' असे न म्हणता 'अनुभवावी' असे म्हटले आहे. वाचलेली गोष्ट कदाचित विस्मरणात जाऊ शकते, परंतु अनुभवलेली गोष्ट कायम लक्षात राहते. म्हणून ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी ही अनुभवली पाहिजे. 

हीच अनुभुती घेण्याचा आणि देण्याचा सोहळा म्हणजे 'ज्ञानेश्वरी चातुर्मास प्रवचन.'वारकरी संप्रदायात अग्रणी नाव असलेले देगलूरकर घराणे पंढरपुरात २०० हुन अधिक वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे चालवत आहेत. संत गुंडामहाराजांचे वंशज ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर यांनीदेखील ती परंपरा अबाधित ठेवली.  अगदी कोरोना काळातही त्यांनी काहीवेळा ऑनलाईन प्रवचनसेवा देत जवळपास लाखो भाविकांना चातुर्मास प्रवचन सोहळ्याचा आनंद दिला. कोरोना काळात कार्य करत असणाऱ्या सर्व सामाजिक संस्था, कोरोनायोद्धे यांना महाराजांच्या अमृतमय वाणीचा मोठा आधार होता . महाराज रोज प्रत्येक ठिकाणची आवर्जून माहिती घेत होते. अशा प.पू.श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलुरकर यांचा आज तारखेनुसार वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कार्याची, ज्ञानेश्वरी चातुर्मास सोहळ्याची आणि देगलुरकर कुटुंबियांच्या वारकरी परंपरेची उजळणी.

हेही वाचा : प्रेम म्हणजे काय, सांगताहेत संत सेना महाराज

याच परंपरेतील चैतन्यमहाराजांचे शिष्य ह.भ.प. अक्षयमहाराज भोसले, ज्ञानेश्वरी प्रवचनाची परंपरा कशी सुरू झाली ते सांगतात. `देवनाथमहाराज नावाचे एक संत होते. त्यांना माऊलींच्या दर्शनाचा ध्यास लागला होता. त्यांनी आळंदीत येऊन हजारो पारायणे केली, पण माऊलींचे दर्शन घडले नाही. `ज्या जिभेने पारायणे करूनही माऊलींचे दर्शन घडत नाही, त्या जिव्हेचे अस्तित्त्वच नको', असे म्हणत देवनाथमहाराजांनी आपली जिव्हा कापून इंद्रायणीत फेकली, तोच माऊलींनी दर्शन देऊन योगमायेने जिव्हा पूर्ववत जोडली. कृतकृत्य झालेल्या देवनाथमहाराजांनी तिथून पुढे ज्ञानेश्वरी वाचनात कधीच खंड पडू दिला नाही. महाराजांची परंपरा त्यांचे विद्वान शिष्य चुडामणीमहाराज यांनी सुरु ठेवली आणि संत चुडामणीमहाराजांनी आपले जीवनकार्य संपवण्याआधी गुंडामहाराज देगलूरकर यांच्याकडे ही परंपरा सोपवली. आषाढी ते कार्तिकी एकादशी पंढरपुरात राहून ज्ञानेश्वरीचे पारायण करायचे, असा नेम त्यांनी आखून दिला.'

संत गुंडामहाराजांचे वंशज सद्गुरु धुंडामहाराज हे गृहस्थाश्रमी संत होते. प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय त्यांनी साधला. सद्गुरु श्रीजोगमहाराज व गुरुवर्य श्रीसोनोपंत उर्फ मामासाहेब  दांडेकर या संतांचा सत्संगही त्यांना लाभला. भेदभाव न मानणारा नितळ स्वभाव, रसाळ व प्रासादिक वाणी, गतिमान व प्रभावी निवेदनशैली, व्युत्पन्नता यांचा सुंदर मिलाफ म्हणजे त्यांची कीर्तन. सामा‍जिक मनाला स्पर्श करणारी, कुरवाळवाणी, सहज-सोपी भाषा ते वापरत असत. विद्वानांनी, प्राध्यापकांनी, साहि‍‍‍त्यिकांनी, विचारवतांनी प्रशंसा केलेला त्यांचा ग्रंथ- ज्ञानेश्वरांचे पसायदान. त्यांच्या या ज्ञानेश्वरी उपासनेबद्दल व प्रकटनाबद्दल पुणे विद्यापीठाने त्यांचा विशेष गौरव केला.

सद्गुरु श्रीधुंडामहाराजांचे पंढरपुरातील श्रीज्ञानेश्वरी चातुर्मास पारायण ही श्रोत्यांसाठी पर्वणी असे. महाराजांच्या निरुपणाच्या ज्ञानगंगेत डुबकी मारण्यासाठी चार महिने पंढरपुरात मुक्कामी राहत असत. त्यांचे निरुपण म्हणजे गीता, भागवत, उपनिषद, संतगाथा, रामायण -महाभारत, वेद, वाङमयाचा अर्क असे. अशी ज्ञानसरीता त्यांच्या मुखातून ७० वर्षे अखंडपणे प्रवाहित होत राहिली. संत धुंडामहाराजांचे चिरंजीव ह.भ.प. भानुदासमहाराज यांनी ती परंपरा पुढे नेली आणि आता संत श्रीधुंडामहाराजांचे नातू ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर ती परंपरा पुढे नेत आहेत. ते देखील तरुण पिढीतील नामवंत कीर्तनकार आहेत. तसेच संत वाङमयाचे गाढे अभ्यासक आहेत. `ज्ञानेश्वरी आणि काश्मिरी शैव दर्शन' या विषयावर ते पुणे विद्यापीठातून पीएच.डी.साठी प्रबंधलेखन करत आहेत. पुण्यातील सर परशुराम महविद्यालय येथे २ वर्षे व्याख्याते म्हणूनही त्यांनी काम केले आहे. वर्षभर त्यांची ठिकठिकाणी कीर्तन, प्रवचन, लेखनसेवा सुरू असते. मात्र आषाढी ते कार्तिकी एकादशी त्यांचा पंढरपुरात मुक्काम ठरलेला असतो. शे-चारशे लोकांची बैठक व्यवस्था असलेल्या सभागृहात चैतन्यमहाराजांच्या प्रवचनाला रोज हजारोंच्या संख्येने गर्दी होते. त्यात नामवंत व्याख्याते, लेखक, कवी यांचाही समावेश असतो. प्रा. राम शेवाळकर, प्रा. शिवाजीराव भोसले यांसारख्या दिग्गजांनीदेखील त्यांच्या निरुपणाचा लाभ घेतला आहे.

'ज्ञानेश्‍वरीचा अर्थ कळत नसला तरी ती वाचावी. कारण, ती वाचल्याने जो भाव तयार होतो, त्या भावाला भुलते ती ज्ञानेश्‍वरी माऊली आणि मग आपल्या भक्ताला अर्थ समजून देण्याची जबाबदारीही माऊली घेते. संतवाङमय आपल्याला जीवनाचे व्यवस्थापन शिकवते. अशा संतवाङमयाची कास सोडू नये.' असे चैतन्य महाराज सांगतात.

हेही वाचा : सद्गुरुसी शरण जाय, त्यासी ब्रह्मप्राप्ती होय!'

Web Title: Tradition of 'Chaitanya' idol and Dnyaneshwari Chaturmas discourse ceremony of Warkari sect!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.