पोथ्यापुराणातला देवधर्म सोप्या भाषेत सांगणारे तुकोबा राय, यांची आज तुकाराम बीज!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: March 30, 2021 12:32 PM2021-03-30T12:32:35+5:302021-03-30T12:34:31+5:30

तुकोबांनी समाजातले ढोंगी गुरुपण, अडाणी क्रूर देवभक्ती आणि मूर्ख समजुती यांच्या दावणीतून लोकांना सोडवून साध्या, सोप्या व शुद्ध भक्तीने स्वत:चा उद्धार कसा करता येतो, हे स्वत:च्या उदाहरणावरून समाजाला दाखवून दिले.

Tukaram bij : Sant Tukaram, who explains Devdharma in simple language! | पोथ्यापुराणातला देवधर्म सोप्या भाषेत सांगणारे तुकोबा राय, यांची आज तुकाराम बीज!

पोथ्यापुराणातला देवधर्म सोप्या भाषेत सांगणारे तुकोबा राय, यांची आज तुकाराम बीज!

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ 

संत तुकाराम बीज अर्थात तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले तो आजचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीया ही आजची तिथी. द्वितीयेलाच बीजेची तिथी असेही म्हणतात. फाल्गुन मासातील ही तिथी तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाने पावन झाली, म्हणून दरवर्षी 'तुकाराम बीज' ही महाराजांचा पुण्यतिथीचा दिवसही सोहळ्याप्रमाणे साजरा केला जातो. कारण, महाराज देहाने गेले तरी परमार्थाचे 'बीज' जनात रोवून गेले. 

इंद्रायणीच्या काठी एका सुखवस्तू घरात जन्माला आलेले तुकाराम आंबिले. तीन भावांमध्ये तुकोबा मधले. थोरला भाऊ विरक्त. घर संसार व्यवस्थित असताना या कुटुंबावर एकामागोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या. आई वडील गेले. थोरल्या भावाची बायको गेली. तुकोबांची नेहमी आजारी असणारी बायको रखमाबाई गेली. सुस्थितीत असणाऱ्या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला. या आघातात सर्व सामान्य माणसे खचून जातात, देहत्याग करतात. पण तुकोबा हरिचिंतनात मग्न झाले. त्यांनी स्वत: विठोबा पाहिला आणि आपल्या अभंगातून हरिकीर्तनातून लोकांना दाखवला. चारचौघांप्रमाणे सामान्य जीवन वाट्याला येऊनही तुकोबांनी संकटातून मार्ग काढण्याचा, हरिनामात रंगून जाण्याचा, पाखंडांचे खंडण आणि धर्माचे रक्षण करण्याचा मार्ग दाखवला. 

तुकोबांनी समाजातले ढोंगी गुरुपण, अडाणी क्रूर देवभक्ती आणि मूर्ख समजुती यांच्या दावणीतून लोकांना सोडवून साध्या, सोप्या व शुद्ध भक्तीने स्वत:चा उद्धार कसा करता येतो, हे स्वत:च्या उदाहरणावरून समाजाला दाखवून दिले. समाजाला धर्म शिकवण्याआधी तुकोबा धर्ममय झाले. भागवतधर्माची ध्वजा पुन्हा वर चढू लागली. पोथ्यापुराणातला देवधर्म संस्कृत भाषेत अडकला होता, तो त्यांनी सोपा करून सांगितला. शुद्ध प्रेमाने उच्चारलेल्या विठ्ठलनामात वेदाचे सार आणि ब्रह्मविद्येचा साक्षात्कार होऊ शकतो, हे लोकांना पटवून दिले.

मऊ मेणाहून हृदयाचे तुकोबा खोट्या धर्मबाजीवर कडक शब्दांचे आसूड ओढत. वाद जिंकण्यापेक्षा ते मने जिंकीत असत. समाजाकडून मिळालेले कटू अनुभवांचे हलाहल पचवून जगाला सद्विचारांचे अमृत उपलब्ध करून देणारे तुकोबा जणू महादेवाचा अवतारच!

तुकोबा हेदेखील संतवृत्तीचे तत्कालीन समाजसुधारकच! ते म्हणत, 

आम्ही वैकुंठीचे वासी, आलो याचि कारणासी,
बोलले जे ऋषी, साच भावे वर्तावया।

भजन कीर्तनातून तुकोबांनी केलेली सामाजिक चळवळ एवढी प्रभावी ठरली, की सामुदायिक भक्तीला पूर आला.महाराष्ट्रात शिवशक्ती जागृत झाली. टाळमृदंगात रणवाद्यांचे सामर्थ्य आले. त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांनाही प्रेरणा मिळाली. अजगराप्रमाणे सुस्त पडलेल्या समाजातून जाणता राजा निर्माण झाला आणि त्यांनी स्वराज्य स्थापन करून धर्माची पताका उंचावली. 

अशा तुकाराम महाराजांचे चरित्र म्हणजे म्हणजे प्रपंचाकडून परमार्थाकडे नेणारा सुंदर प्रवास. असे प्रेरणादायी चरित्र आपणही वाचावे आणि त्यांनी आखून दिलेल्या सन्मार्गावर प्रवास करावा. जेणेकरून 'आनंदाचे डोही आनंद तरंग' उमटल्यावाचून राहणार नाही...!

Web Title: Tukaram bij : Sant Tukaram, who explains Devdharma in simple language!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.