प्रत्येक काम भगवंताचे समजून करा; पांडुरंगशास्त्री आठवलेंचा 'स्वाध्याय'
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 19, 2020 02:49 PM2020-10-19T14:49:03+5:302020-10-19T14:55:56+5:30
धर्म, संस्कृती, गीताविचार यांचा गंध नसलेल्या समाजाला भगवद्गकार्यासाठी प्रेरित करण्याचे श्रेय दादांना जाते.
ज्योत्स्ना गाडगीळ
अध्यात्म समजून घेणे सोपे नाही, त्यासाठी उत्तम मार्गदर्शक आणि गुरु लागतो. प.पु. पांडुरंगशास्त्री आठवले अर्थात दादा यांच्या रूपाने सर्व समाजाला केवळ अध्यात्माचा 'पाठ'च मिळाला नाही, तर फलद्रुप 'स्वाध्याय'ही मिळाला. त्यांचा जन्मदिन 'स्वाध्याय' परिवार 'मनुष्य गौरव दिन' म्हणून साजरा करतो. यंदा त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त त्यांना व त्यांच्या अतुलनीय कार्याला शतशः नमन
आज समाजात ज्यांना मोठे मानले जाते, त्यांचे वर्तन कसे आहे? सत्ता व संपत्ती मिळवण्यासाठी भल्या-बुऱ्या मार्गाचा अवलंब केला जातो. भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनला आहे. ते पाहून सामान्य माणूसही त्याच मार्गाने चालला आहे.
अशा निराशाजन्य अंधारात आशेचा दीप लावला पांडुरंगशास्त्री आठवले, अर्थात दादांनी. त्यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९२० रोजी रायगड जिल्ह्यातील रोहे गावी झाला. त्यांचे वडील वैजनाथशास्त्री आठवले यांच्या संस्कृत पाठशाळेत त्यांचे संस्कृत व वेदवाङमयाचे शिक्षण झाले. वेदोपनिषदांतील विचार हे केवळ पाठांतरासाठी किंवा कर्मकांडासारठी नाहीत, ते दैनंदिन आचारासाठीदेखील आहेत, हा विचार वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी त्यांनी मांडला.
हेही वाचा : देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी - समर्थ वचनाचा प्रत्यय देणरी बोधकथा!
प्राचीन वैदिक तत्त्वज्ञान आधुनिक काळात आचरणात आणून दाखवण्याचे आव्हान त्यांना एका धार्मिक परिषदेत देण्यात आले. ते स्वीकारून त्यांनी १९५८ साली पाठशाळेतील अवघ्या १९ सहकाऱ्यांसह स्वाध्याय चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. ठाणे येथे यांचा अभ्यास कालानुरूप करून हे वाङमय आजही कसे कालबाह्य नाही, हे त्यांनी प्रत्यक्ष आचरणातून पटवून दिले. त्यांचे तत्त्वज्ञान विविध भाषांत प्रकाशित होनाऱ्या मासिकात गीता, उपनिषदे इ. वाङमयातील विचारधनाचा कालानुरूप अर्थ लावून त्याचा प्रसार सर्वत्र करण्यात आला. त्यांची व्यासविचार, गीतामृतम् , गंगालहरी, डॉन ऑफ डिव्हिनिटी, संस्कृतिचिंतन आदी पुस्तके त्यांचा वाङमयाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन आपल्याला देतात.
'मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना' या भगवंताच्या उद्गाराचा त्यांना साक्षात्कार झाला. प्रत्येक काम `भगवंताचे' समजून करायचे. आपल्याला `भगवंताचे साधन' मानायचे, ही त्यांची शिकवण आहे. `भगवंताचे काम करणारा, तो ब्राह्मण' ही त्यांचा ब्राह्मणत्त्वाची व्याख्या! त्यांचा भक्तीमार्ग वैयक्तिक आत्मोद्धारापेक्षा सामाजिक जाणीव व जनसेवेला प्राधान्य देतो. त्यामुळे त्यांचा `स्वाध्यायी', स्वार्थी व आत्मकेंद्री नसून तो समाजभिमुख आहे. तो जातिभेद, धर्मभेद इ. भेदांच्या पलीकडे गेलेला आहे. जीवनात नैतिकता, चारित्र्य यांना महत्त्व देणारा आहे. वर्तमानपत्री प्रचारापेक्षा व्यक्तिगत संपर्कातून संस्कृतीचा प्रचार करणारा आहे.
दादांचे कार्य भारतात सुमारे ऐंशी हजार खेड्यात चालू आहे. इतकेच नव्हे, तर ब्रिट, अमेरिका, आखाती देश अशा सुमारे ३५ देशातही चालू आहे. मागे अलाहबाद येथे तीन लाखांचा `स्वाध्यायींचा' प्रचंड मेळावा अत्यंत शिस्तबद्ध रीतीने पार पडला, तो दैनंदिन जीवनात लावलेल्या शिस्तीमुळेच! स्वाध्यायी सर्व कार्यक्रम पार पाडतात, ते स्वत: न्यायाने मिळवलेल्या द्रव्यातून. `जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी' या संतशिरोमणी तुकाराम महाराजांच्या वचनाचे संस्कार दादांनी स्वाध्यायींवर घातले.
दादांना म.गांधी पुरस्कार, इंदिरा प्रियदर्शनी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, इ पुरस्कार मिळालेच. शिवाय, धार्मिक सुधारणांसाठी असलेला मानाचा टेंपलटन पुरस्कार त्यांना १९९७ मध्ये लंडनमध्ये प्रिन्स फिलिप यांच्या हस्ते मिळाला, तर दोनच वर्षांत ते रॅमन मॅगसेसे पुरस्कारचे मानकरी ठरले. त्याच वर्षी भारत सरकारने त्यांना `पद्मविभूषण'ने गौरवले. तसेच स्वाध्यायिंनी 'दादा' म्हणत दिलेली प्रेमळ साद, ते आपल्यासाठी सर्वोच्च पुरस्कार मानत असत.
२००३ मध्ये दादांनी इहलोकीची यात्रा संपवली, तरीदेखील आजही त्यांनी लिहून ठेवलेल्या प्रवचनातून, पुस्तकातून त्यांच्या वाणीतील तेजस्विता, दिव्यता, भव्यता यांचे दर्शन घडवतात. आध्यात्मिक, पारमार्थिक कथांमागील तर्कशास्त्र दादांनी लोकांना पटवून दिले. कठीण विषय सोपे करून सांगण्याची दादांची हातोटी सर्व स्तरातील समाजाला भावली. म्हणूनच आजही स्वाध्याय परिवार दादांचे विचार समर्थपणे पुढे नेत आहे. आजही दर रविवारी सर्व स्वाध्यायी एकत्र येतात, उपासना करतात, धर्मकायार्थ काम करतात. या कार्यात तरुणांचा सहभाग विशेष उल्लेखनीय आहे.
'धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे' हे गीतेतील श्रीकृष्णांचे वचन, धर्मकार्यार्थ झटणाऱ्या आठवले शास्त्रींकडे पाहिल्यावर खरे झाल्यासारखे वाटते. धर्म, संस्कृती, गीताविचार यांचा गंध नसलेल्या समाजाला भगवद्गकार्यासाठी प्रेरित करण्याचे श्रेय दादांना जाते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सुरुवात झाली. त्यांनी सुरू केलेले धर्मरक्षणाचे कार्य आणि वेदोपनिषदांतील विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी आपणही कटीबद्ध होऊया, तिच दादांसाठी अपूर्व भेट ठरेल.
हेही वाचा : वृद्धापकाळ सुखाचा घालवण्यासाठी श्रीमद् आद्य शंकराचार्यांचा कानमंत्र