विश्वनाट्य सूत्रधार तूच श्यामसुंदरा...; सृष्टीच्या निर्मात्याला - परमेश्वरासाठी रचलेली 'नांदी'
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: November 5, 2020 05:36 PM2020-11-05T17:36:52+5:302020-11-05T17:37:49+5:30
नाटकाचा सूत्रधार असतो, तसा विश्वाच्या रंगभूमीचा सूत्रधार भगवंत आहे, असे सुंदर वर्णन गीतकारांनी या नांदीमध्ये केले आहे. मराठी रंगभूमी दिन विशेष लेख.
ज्योत्स्ना गाडगीळ
आनंद चित्रपटात राजेश खन्ना यांचा सुप्रसिद्ध संवाद आहे, 'जिंदगी और मौत सब उपरवाले के हाथ में है, हम सब तो रंगमंच की कठपुतलिया है, जिनकी डोर उपरवाले के हाथ में बंधी है। कब, कौन, कैसे उठेगा, यह कोई नही बता सकता!' मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आणि या मुहूर्तावर नाट्यगृह सुरू होणार या निमित्ताने अचानक हा संवाद आठवला आणि लगोलग आठवण झाली, ती आणखी एका मोठ्या रंगभूमीची...
'शाब्बास बिरबल शाब्बास' या संगीत नाटकात गीतकार नानासाहेब शीरगोपीकर यांनी नांदी लिहिली आहे. त्यात, 'अमिट रंग अर्पितोस, जगत रंगमंदिरा' असे परमेश्वराला उद्देशून म्हटले आहे. एवढेच नाही, तर नाटकाचा सूत्रधार असतो, तसा विश्वाच्या रंगभूमीचा सूत्रधार भगवंत आहे, असे सुंदर वर्णन गीतकारांनी या नांदीमध्ये केले आहे. संगीतकार वसंत देसाई यांचे संगीत, जयवंत कुलकर्णी, पं. राम मराठे आणि रामदास कामत या नटवर्यांचा सुस्वर असलेली ही सुरेल नांदी -
विश्वनाट्य सूत्रधार तूच श्यामसुंदरा,
चातुरी तुझी अगाध, कमलनयन श्रीधरा।
हेही वाचा : पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...दोष ना कुणाचा!- गदिमा
या रंगभूमीचे लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना सगळे एकहाती तू सांभाळत आहेस. तू निर्माण केलेल्या नाटकात सगळेच रंगून गेले आहेत. नाटक पाहणारी मंडळी रंगमंचावरच्या नाट्याशी, कलाकारांशी समरस झाली आहेत. हे नाटक कधीच संपू नये, असे इथल्या प्रत्येक नाट्यप्रेमीला वाटते. याचे श्रेय तुला जाते.
सुई-दोरा, नसुनी करी, रात्रीच्या घनतिमिरी,
कशिदा तू काढतोस, गगनपटी साजिरा।
तुझी नाट्यसृष्टी निराळीच आहे. इथे व्यक्ती तितक्या प्रकृती. राग, लोभ, प्रेम, मत्सराचे मुखवटे घेऊन वावरणारे लोक तुझ्या रंगमंचावर लीलया वावरतात. त्या सर्वांची मोट तू बांधतोस. विणलेलया वस्त्रावर जितक्या सुंदर पद्धतीने वेलबुट्टी केलेली असते, तितक्या सहजतेने तू या सृष्टीचा कशिदा विणतोस. नाटकाची गुंफणही तेवढीच सुंदर करतोस, म्हणून तुला सूत्रधाराची उपमा दिली आहे.
मधुबिंदू मधुकरास, मेघबिंदू चातकास,
ज्यास त्यास इष्ट तेच, पुरविसी रमावरा।
कोणाला काय हवे, ते पाहणाराही तूच. म्हणजे रंगकर्मींच्या भाषेत सांगायचे, तर निर्माता, प्रोडक्शन सप्लायरही तूच! पडद्यापुढचे, पडद्यामागचे सगळे कलाकार, यांची जबाबदारी तू घेतली आहेस. फक्त तुला 'दादा' न म्हणता 'देव' म्हणतात, एवढाच काय तो फरक! तू केवळ मनुष्याला नाही, तर सृष्टीला काय हवे-नको ते पाहतोस. भुंग्याला मध, चातकाला पावसाचा थेंब, ज्याची जशी कुवत, गरज, पात्रता, ते समजून उमजून देणारा तू आहेस. म्हणून तू सूत्रधार आहेस.
कुंचला न तव करांत, तरीही तूच रंगनाथ,
अमिट रंग अर्पितोस, जगत रंगमंदिरा।।
या रंगभूमीचे प्रशिक्षण घेण्यासाठी तू कधी नामांकित नाट्य संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी गेलाही नसशील, तरीदेखील, तुला कधी कोणता प्रसंग, कसा खुलून दिसेल, हे अचूक ठाऊक आहे. तुझ्या कलाकृतीला नाव ठेवणारे आम्हीच वेडे. कोवळ्या वेलीला भोपळा आणि विशाल वृक्षावर इवलेसे आवळे देताना, तुझी निश्चितच काहीतरी योजना असेल, हे आम्ही विसरून जातो. परंतु, संपूर्ण कलाकृती पाहून झाली आणि नाटकाचा पडदा पडण्याची वेळ जवळ आली, की लक्षात येते, तू केलेली व्यवस्था योग्यच होती.
विश्वाच्या रंगभूमीचा डौल तू सांभाळत आहेसच, मराठी रंगभूमीलादेखील गतवैभव प्राप्त होवो, हेच मागणे मागतो. याचबरोबर, रंगभूमीची तिसरी घंटा वाजली, तशी लवकरच मंदिरांची घंटाही निनादू दे, एवढा निरोप लक्षात ठेव.
हेही वाचा : या हृदयीचे त्या हृदयी....पं. हृदयनाथ मंगेशकर यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन!