देवापर्यंत पोहोचायचे आहे? तर नाम घेतलेच पाहिजे!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 1, 2021 04:25 PM2021-01-01T16:25:13+5:302021-01-01T16:25:29+5:30
भगवंताला सगुण म्हणो की निर्गुण रे, असा संतांना प्रश्न पडला. परंतु, त्या ईश्वर तत्त्वाला नाम देऊन त्याची भक्ताला ओळख पटली. त्याच्या नामोल्लेखाने, उच्चाराने भगवंताप्रती आत्मियता वाटू लागली, तेच हे नाम भक्त आणि भगवंताला जोडणारा दुवा ठरले. म्हणून भगवंत भेटीची तळमळ असेल, तर नित्य नाम घेतलेच पाहिजे.
ज्योत्स्ना गाडगीळ
शेक्सपिअरने म्हटले होते, नावात काय आहे. परंतु, अध्यात्म सांगते, नावात सगळे काही आहे. मग ते व्यक्तीचे असो, नाहीतर परमेश्वराचे! नावात ओळख आहे, आपुलकी आहे, स्नेह आहे, प्रेम आहे. म्हणून तर बाळ जन्माला आल्यावर बाराव्या दिवशी किंवा बारशाच्या दिवशी आपण त्याचे नाव ठेवतो, म्हणजेच त्याला ओळख देतो. पाळीव प्राण्यांचेही लोक नामकरण करतात. रस्त्याने फिरणाऱ्या प्राण्यांना नाव नसते, परंतु कुत्रा, मांजर, गाय हे उपनामदेखील त्यांची ओळखच आहे. थोडक्यात नावाने ओळख प्राप्त होते, म्हणून नाव महत्त्वाचे. लहान मुलाला वड, पिंपळ हा फरक कळला नाही, तरी त्याला हे झाड आहे, हे नक्कीच कळते. म्हणजेच नावाशिवाय अस्तित्वाला ओळख मिळणारच नाही. तीच बाब अध्यात्मामध्ये सांगितली आहे.
भगवंताला सगुण म्हणो की निर्गुण रे, असा संतांना प्रश्न पडला. परंतु, त्या ईश्वर तत्त्वाला नाम देऊन त्याची भक्ताला ओळख पटली. त्याच्या नामोल्लेखाने, उच्चाराने भगवंताप्रती आत्मियता वाटू लागली, तेच हे नाम भक्त आणि भगवंताला जोडणारा दुवा ठरले. म्हणून भगवंत भेटीची तळमळ असेल, तर नित्य नाम घेतलेच पाहिजे.
हेही वाचा : प्रतिक्रिया टाळा आणि प्रतिसाद द्यायला शिका, आयुष्यात खूप यशस्वी व्हाल! - गौर गोपाल दास
सासरी आलेली मुलगी, आपले नाव बदलले, तरी मूळची ओळख विसरत नाही. कोणी तिला माहेरच्या नावाने हाक मारली, तरी तिला गलबलून येते. नावाइतकाच तिला आपल्या आडनावाबद्दलही प्रेम असते. म्हणून अलीकडे तर ती माहेर आणि सासर अशी दोन्हीकडची आडनावे लावते. दोन्ही कुटुंबाना ती धरून असते आणि दोन्ही घराण्यांचा नावलौकिक वाढवते.
मुलांनी आपल्या कर्तुत्त्वाने नाव कमावले, तर मागच्या पिढ्यांचाही नामोल्लेख केला जातो. त्यांची परंपरा सांगितली जाते. नावाला विशेषणे चिकटतात. अमक्याचा मुलगा, तमक्याचा नातू ही व्यक्तीवैशिष्ट्येही जोडली जातात.
कधी कधी आपल्याला लोकांचे चेहरे लक्षात नाहीतर नाव. 'नाव ऐकून आहे, पण प्रत्यक्ष भेटलो नाही' असे आपण म्हणतो. म्हणजेच प्रत्यक्ष भेट झालेली नसेल, तरीही संबंधित व्यक्तीचा लौकिक तिच्या नावावरूनही कळतो किंवा चेहरा लक्षात असेल, तरीही त्याला नाम जोडले गेले, की ओळख लवकर पटते.
नुसत्या नावानेही अनेकांची कामे होतात. दुसऱ्याच्या नावावर स्वत:चे पोट भरणारेही अप्पलपोटी लोक असतात. आपले कर्तृत्त्व शून्य असेल, तर 'नाव मोठे आणि लक्षण खोटे' असा उपरोधिक टोलाही लगावला जातो. नाव कमावण्यासाठी लोकांची हयात खर्ची होते. नाव टिकून राहावे, म्हणून चारित्र्य जपले जाते.
अशी नामाची व्यावहारिक उदाहरणे पाहता, नामाचे महत्त्व लक्षात आले असेल. भौतिक जगतात नामाचे एवढे महत्त्व, तर पारमार्थिक दृष्ट्या किती, याची कल्पनाच केलेली बरी! नुसत्या नामाने अनेक भक्त हा भवसागर तरून गेले. त्या नामाची गोडी आपल्यालाही लागावे असे वाटत असेल, तर नाम सातत्याने घेतलेच पाहिजे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्या प्रवचनात म्हणतात, `जसे आपले आपलेपण आपल्या नावात आहे, तसे देवाचे देवपण देवाच्या नामात आहे. नाम घेता घेता नामरूप झाले पाहिजे, तरच भगवंताची भेट होऊ शकेल.'