पुरुषार्थ म्हणजे नेमकं काय? वाचा, महारथी कर्णाचे हे बाणेदार उत्तर!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 25, 2021 05:08 PM2021-01-25T17:08:25+5:302021-01-25T17:08:45+5:30
कवी मनोहर कवीश्वर लिहितात, कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था...!
पुरुषार्थ म्हणजे कर्तृत्त्व! केवळ पुरुषच नाही, तर एखाद्या स्त्रिनेदेखील उत्तम कामगिरी बजावली, तर तिने पुरुषार्थ गाजवला, असे म्हटले जाते. कर्तृत्त्व सिद्ध करायला ना जातीचे बंधन असते ना वयाचे, ना लिंगाचे ना परिस्थितीचे. जो प्रतिकुल परिस्थितीला अनुकुलतेत बदण्याचे धारिष्ट्य दाखवतो, तो खरा पुरुषार्थ दाखवतो. याबाबत महाभारतामध्ये महारथी कर्णाने एक वचन सुप्रसिद्ध आहे.
सूतो वा सूतपुत्रो वा, यो वा को वा भवाम्यहम्
दैवायत्तं कुले जन्म, मदायुत्तं तु पौरुषम् ।।
कर्णाचे हे बाणेदार उद्गार त्याच्या ठायी असलेल्या आत्मविश्वासाची साक्ष देतात. वास्तविक कर्ण हा सूर्यपूत्र. परंतु कुंतीला तो कुमारअवस्थेत झाल्याने तिने त्याचा त्याग केला. मग सारथ्याने त्याला वाढवले. जिने आपले पालनपोषण केले, त्या राधेच्या नावाने 'राधेय' म्हणून कर्ण मिरवू लागला. परंतु सूतपूत्र म्हणून त्याची शेवटपर्यंत अवहेलना झाली.
तो क्षत्रिय नाही, या सबबीखाली अर्जुनाशी त्याची स्पर्धा होऊ दिली गेली नाही. द्रौपदीनेदेखील सूतपूत्राला मी वरणार नाही, असे सांगून कर्णाची हेटाळणी केली. तेव्हा, `कोणत्या कुळात जन्म घ्यायचा, हे दैवाच्या हाती असते, परंतु `पराक्रम मात्र मनगटाच्या सामर्थ्यावर अवलंबून असतो', असे कर्ण रोखठोक म्हणाला. कर्णाच्या सामर्थ्यावर कृष्णाचाही विश्वास होता. म्हणून शेवटी त्याने कर्णाला पांडवांच्या पक्षात ओढून घेण्यासाठी प्रयत्न केले.
आपल्या लोकशाहीमध्ये समानतेच्या मूल्याला फार महत्त्व दिले आहे. जातीनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष असे सर्वांना समान अधिकार दिले गेले आहेत. न्यायासनासमोर सर्वजण समान लेखले जावेत अशी तरतूदही घटनेत केली आहे. स्त्रीपुरुष समानतेच्या संदर्भातही स्त्रियांना समानता यावी यासाठीच शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
वास्तविक, समाजात अधिकारांच्या दृष्टीने उच्च नीचता असते. प्रत्येकाला आपल्या कुवतीनुसार प्रगती करण्यात कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जातात. प्रभाकर पिंगळे लिहीतात, मदायत्तं तु पौरुषम् हे सिद्ध करणारे अनेक दाखले आपल्याला सर्वत्र मिळू शकतात. विश्वनाथ भटांनी परंपरेने हाती आलेली पळीपंचपात्री बाजूला ठेवून हातात तलवार धरली आणि तो पेशवा झाला. अहिल्याबाई होळकर धर्मपरायणतेने पुण्यश्लोक झाल्या. रघुनाथ पेशव्यांनी तिचे राज्य गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा, 'अन्यायाविरुद्ध मी लढेन. तुमचा जय झाला, तर बायकांवर विजय मिळवला अशी तुमची अपकीर्ती होईल आणि माझ्याकडून तुमचा पराभव झाला, तर आणि तीच शक्यता जास्त आहे...तर मात्र जगात तोंड दाखवायला तुम्हाला जागा राहणार नाही' या शब्दात केवळ प्रखर शब्दांनी अहिल्याबाईंनी रघुनाथरावाचे आक्रमण परतावून लावले.
मोठे उद्योगपती कोण कुठले. सळेच काही सोन्याचे बोंडल तोंडात धरून जन्माला आले नाहीत. पण प्रचंड उद्योग करून ते नाव कमावतात. हिऱ्यांचा व्यापार करून जगात नाव कमावलेले शहा बंधू घ्या, बोटीवर साडेतीनशे रुपये पगारावर काम करणारे धीरज अंबानी घ्या. गोएंका, टाटा, बिर्ला, खैतान असे मोठमोठे उद्योगक्षेत्रातील राजेमहाराजे बुद्धीमत्ता आणि श्रमाच्या जोरावर पौरुष गाजवतात. जीवन सार्थकी लावतात. कर्णाचे वचन हे कर्णोपकर्णी जाऊन हृदयाला भिडायलाच हवे, तरच आपल्यातलाही पुरुषार्थ जागा होईल.