फुटे तरूवर उष्णकाळमासी, 'जीवन' तयासी कोण घाली? (भाग १)
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 6, 2020 10:22 PM2020-10-06T22:22:50+5:302020-10-06T22:23:57+5:30
आपल्या बागेत एक फुल उमलले, तर त्याचे श्रेय आपण आपल्याकडे घेतो, परंतु जो अखिल विश्वाचा मळा फुलवतोय, त्याला सपशेल विसरतो.
ज्योत्स्ना गाडगीळ
शहरातल्या घरात राहायची मारामार, तिथे बागबगिच्यांची हौस कुठून पुरवणार? पुरवलीच, तरी रोजच्या धावपळीत निगा कोण राखणार, हा मोठा प्रश्नच! मात्र, गेल्या सहा-सात महिन्यात घरात राहून मातीची चांगलीच नाळ जोडली गेली आहे. एक-दोन नाही, चांगली वीस-तीस रोपटी लावली आहेत. रोजची मशागत. निगराणी, खतपाणी यांमुळे एकेका पाना-फुलाशी घट्ट मैत्री झाली आहे. आपण एखाद्या जीवाची निगा राखतोय, वाढवतोय, पालन-पोषण करतोय, या विचाराने कळत-नकळत मनात अहंकार सुखावत होता.
हेही वाचा: देवाकडे काय मागितलं, तर सगळे प्रश्न सुटतील?... सांगताहेत सद्गुरू वामनराव पै
आज सकाळी, अशाच एका बाळसं धरलेल्या रोपट्याच्या अंगाखांद्यावर तीन-चार गुलाबाच्या कळ्या उमलल्या. ते चित्र पाहताना कोण एक आनंद झाला. हा आनंद इतरांना सांगितल्याशिवाय राहवेना. फोटो काढून समाज माध्यमांवर टाकावा, असा विचार डोकावला. शे-दीडशे लाईक पक्के, असा मनानेच मनाला कौल दिला. चहाचा कप बाजूला सारून, मोबाईल कॅमेरा घेत पुढे सरसावले. कॅमेरा अँगल सेट केला. कॅमेऱ्याने आपणहून चार गुलाबांवर फेस अँगल धरला. प्रतिमा स्थिरावण्याची वाट बघत, योग्य क्षणी क्लिक करणार, तोच कॅमेऱ्याने पाचवा चौकोन सेट केला. त्यात इमारतीसमोरच्या कुंपणापलीकडे इतस्तत: वाढलेल्या झाडाझुडपातल्या रानफुलाला, कॅमेऱ्याने गुलाबाच्या फुलांबरोबर सामावून घेतले. त्याक्षणी अहंकार गळून पडला आणि तुकाराम महाराजांचे शब्द आठवले,
फुटे तरूवर उष्ण काळमासी,
जीवन तयासी कोण घाली?
आपल्या बागेत एक फुल उमलले, तर त्याचे श्रेय आपण आपल्याकडे घेतो, परंतु जो अखिल विश्वाचा मळा फुलवतोय, त्याला सपशेल विसरतो. याच गोष्टीची तुकाराम महाराज आठवण करून देतात, 'जीवन' तयासी कोण घाली? जीवन म्हणजे पाणी. उन्हाळ्यात निष्पर्ण झालेल्या झाडाला, तुम्ही कधी पाणी द्यायला गेलेलात का हो? नाही ना? तरी ऋतुचक्र फिरताच निष्पर्ण झाडावर पालवी फुटते. झाड मोहरते आणि पाहता पाहता पाना-फुलांनी, फळांनी डवरते. त्याच झाडाच्या सावलीत जाऊन आपण उभे राहतो. ते कोणी वाढवले, कोणी जगवले? त्या ईश्वराची कायम आठवण राहू द्या.
भगवंत निसर्गाच्या रूपाने कित्येक गोष्टी आपल्याला शिकवत असतो. परंतु, आपणच शिकत नाही. कितीतरी गोष्टींचा फुका अहंकार बाळगतो. मात्र, आपण फक्त निमित्तमात्र आहोत,'बोलविता धनि वेगळाचि' याचे भान संत आपल्याला वेळोवेळी करून देतात आणि मी मी, करणाऱ्या मनुष्याला विचारतात,
का रे नाठविसी कृपाळू देवासी,
पोषितो जगासी एकलाची।
(क्रमश:)