दक्षिण दिशेकडे पाय करून का झोपू नये? दक्षिण दिशा अशुभ का मानतात? जाणून घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 10:16 PM2020-10-08T22:16:03+5:302020-10-08T22:18:55+5:30

धर्मशास्त्रानुसार दक्षिण दिशेस पाय पसरून झोपणे निषिद्ध मानले जाते. या गोष्टीला विज्ञानाचीदेखील पुष्टी आहे.

Why not sleep with your feet facing south? Why is the south considered inauspicious? Find out! | दक्षिण दिशेकडे पाय करून का झोपू नये? दक्षिण दिशा अशुभ का मानतात? जाणून घ्या!

दक्षिण दिशेकडे पाय करून का झोपू नये? दक्षिण दिशा अशुभ का मानतात? जाणून घ्या!

googlenewsNext
ठळक मुद्देदक्षिणेकडे पाय केल्यास देहातील सर्व सूक्ष्म तंतूंचे आकर्षण उलट दिशेने होत राहते. अन्नपचन होण्यास अडथळा निर्माण होतो. शिवाय ज्ञानतंतूची उलट गतीने क्रिया चालू झाल्यामुळे मस्तकास शीण येतो. सतत वाईट स्वप्ने पडू लागतात. वरचेवर जाग येते. म्हणून दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.

बालवयात मुलांना अनेक प्रश्न पडतात. समजूतदार पालक वेळोवेळी मुलांचे शंकानिरसन करतात. बाकीचे पालक 'गप रे' म्हणत, मुलांची चिकित्सक वृत्ती दाबून टाकतात. तीच सवय जडून मोठेपणी, अनेक गोष्टी फक्त ऐकीव माहितीनुसार केल्या जातात. मात्र, त्यामागचे शास्त्र काय, असे कोणी विचारले, तर आपल्याकडे उत्तर नसते. कारण, ते जाणून घेण्याचा आपण कधी प्रयत्नच केलेला नसतो. म्हणून अशाच काही पारंपरिक समजुतींचा खुलासा करण्याचा प्रयत्न. 

झोप हा आपल्या दिनचर्येचा सर्वात महत्त्वाचा भाग. त्यावर आपला सबंध दिवस अवलंबून असतो. मात्र, झोपच अपुरी झाली, तर पुढच्या दिवसावर त्याचा विपरित परिणाम होतो. तो टाळण्याचा पूर्वजांनी सांगितलेला एक उपाय म्हणजे, 
दक्षिण दिशेकडे पाय करून झोपू नये. 

हेही वाचा: पिंपळावर मुंज्या असतो?...छेः हो, रात्रीच्या वेळी पारावर न जाण्यामागचं खरं कारण वेगळंच; जाणून घ्या!

वेदवाणी प्रकाशनाच्या धर्मशास्त्रावर आधारित एका पुस्तकात, या समजुतीचा सविस्तर खुलासा केला आहे. धर्मशास्त्रानुसार दक्षिण दिशेस पाय पसरून झोपणे निषिद्ध मानले जाते. या गोष्टीला विज्ञानाचीदेखील पुष्टी आहे. विश्वातील प्रत्येक अणुरेणुमध्ये चुंबकीय आकर्षण असून प्रत्येक कण कोणत्या तरी विशाल कणाकडे ओढला जातो, हे दिसून येते. याचा परिणाम म्हणून प्रत्येक सुक्ष्म कणास एक प्रकारची भ्रमण गती असते. आपली पृथ्वीदेखील सूर्याकडे चुंबकशक्तीने आकृष्ट होते. खुद्द सूर्यदेखील त्याहून मोठ्या सूर्याकडे चुंबकीय शक्तीने खेचला जातो. 

विश्वातील 'ध्रुव' नामक ताऱ्याकडे हे विश्व सतत आकर्षले जाते. ध्रुव तारा ज्याबाजूला असेल, त्या दिशेने देहातील अणुरेणू कणांचे आकर्षण होत असते. अगदी पोटातील अन्नपदार्थदेखील त्या दिशेने सुक्ष्मत: खेचले जातात. त्यामुळे उत्तरेकडे पाय करून नैसर्गिकरित्या चुंबकीय आकर्षणाचा लाभ देहाला आपोआप मिळतो. पण त्याउलट दक्षिणेकडे पाय केल्यास देहातील सर्व सूक्ष्म तंतूंचे आकर्षण उलट दिशेने होत राहते आणि अन्नपचन होण्यास अडथळा निर्माण होतो. शिवाय ज्ञानतंतूची उलट गतीने क्रिया चालू झाल्यामुळे मस्तकास शीण येतो. परिणामी निद्रावस्था पुरेसे समाधान देत नाही. सतत वाईट स्वप्ने पडू लागतात. वरचेवर जाग येते. म्हणून दक्षिणेकडे पाय करून झोपू नये, असे शास्त्र सांगते. पूर्व-पश्चिम, उत्तर या तिन्ही दिशांकडे अनर्थ ओढवत नाही. 

दक्षिण दिशा अशुभ का मानतात?

'दक्षिण' हा शब्द वाम किंवा डावा या सापेक्षेने शुभ आहे. असे असताना दिशेविषयी समाजाच्या मनात दृढ झालेला समज सहजासहजी दूर होण्यासारखा नाही. प्रत्येक दिशेला एका लोकपालाची नेमणूक असते. वास्तविक यमाविषयी एक प्रकारचा तिटकारा व घृणा मनात असल्यामुळे दक्षिण दिशाही त्याज्य समजली जाऊ लागली. ही मजल इथपर्यंत पोहोचलेली असते, की यज्ञप्रक्रीयेत दक्षिण दिशेचा नुसता उल्लेख आला, तरी तो टाळून 'अवाची' असे म्हटले जाते. 

खऱ्या अर्थाने विचार केल्यास यम आणि त्याची दक्षिण दिशा यांना अशुभ किंवा त्याज्य समजण्यासारखे काही आहे का? असा मोठा प्रश्न आहे. यमाने आपले कार्य केले नसते, तर केवढी भयानक आपत्ती आली असती. ज्यांचे या जन्मापुरते इहलोकीचे कार्य संपले आहे, अशा जीवांना आपल्याकडे खेचून घेऊन त्यांना आपल्यात समाविष्ट करणारा, त्यांच्या दोषांचे शुद्धीकरण करणारा यम तिरस्करणीय कसा?

यम म्हणजे नियमन किंवा नियंत्रण. जगातील प्रत्येक बारीकसारीक क्रियेत नियमनाची आवश्यकता असते. म्हणून यज्ञकर्मात विशेषत: शांतीकर्मात यमाचा आवर्जून उल्लेख केला जातो. त्याची पूजा होते. उत्क्रांतीची वाटचाल दक्षिणेकडून उत्तरेकडे असते. शेवटी लय पुन्हा दक्षिणेतच होतो. पृथ्वीच्या उदरातील महाचुंबक दक्षिणोत्तर असाच आहे. म्हणून रात्री झोपताना दक्षिणेकडे शीर आणि उत्तरेकडे पाय करून झोपायचे असते.

हेही वाचा : 'मांजर आडवी गेली की काम होत नाही', हा भन्नाट 'शोध' कुणी, कसा आणि का लावला माहित्येय?

Web Title: Why not sleep with your feet facing south? Why is the south considered inauspicious? Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.