एक माणूस ऑफिसच्या कामामुळे सतत तणावाखाली असे. त्याचा तणाव त्याच्या घरच्यांवर निघत असे. त्याला एक आठ वर्षांचा मुलगा होता. एक दिवस त्याने बाबांना आपल्या गृहपाठासंदर्भात मदत मागितली. नेहमीप्रमाणे कामात अडकलेल्या त्याच्या बाबांनी त्याला रागवून परत पाठवून दिले. मुलगा हिरमुसला. काम संपल्यावर त्याला आपल्या वागण्याबद्दल पश्चात्ताप झाला. त्याचा स्वत:चा आणि ऑफिस कामाचा राग येऊ लागला. एकदा जाऊन मुलाची माफी मागावी, म्हणून तो त्याच्या खोलीत गेला. मुलगा शाळेची वही हातात घेऊन झोपी गेला होता.
त्याची वही बंद अंगावर पांघरुण घालणार, तोच त्याच्या वडिलांनी वही उघडून पाहिली. त्यात मुलाला शाळेतून निबंधासाठी विषय दिला होता. `मला नावडणाऱ्या गोष्टी आणि त्याचे फायदे' मुलाने त्याच्या वयानुसार काही मुद्दे लिहून काढले होते.
मला नावडणाऱ्या गोष्टी आणि त्याचे फायदे:वार्षिक परीक्षा : मला वार्षिक परीक्षा आवडत नाही, परंतु ती संपल्यावर उन्हाळी सुटी मिळते.औषध : औषध अतिशय कडू असते, पण ते प्यायल्यावर मला बरे होऊन खेळायला जाता येते.अलार्म : रोज सकाळी घड्याळाचा अलार्म माझी झोपमोड करतो, परंतु त्यामुळे मी जागा होतो आणि मी जिवंत आहे, हे मला कळते.माझे बाबा : ते मला आधी आवडत नव्हते. कारण ते खूप ओरडत असत. पण तेच बाबा माझ्या सगळ्या आवडी निवडी पुरवतात, मला फिरायला नेतात. माझे लाड करतात. मला बाबा आहेत, माझ्या मित्राला तर बाबा नाहीत. मी नशीबवान आहे.
हे वाचून मुलाच्या वडिलांचे डोळे पाणवतात. आपला मुलगा नकारात्मक गोष्टींमधूनही सकारात्मक बाजू शोधू शकतो, तर आपण का नाही? असे म्हणत तेसुद्धा नावडणाऱ्या गोष्टी आणि फायदे लिहायला बसतात.
घर : माझे घर छोटेसे मला आवडत नाही, मला मोठे घर घ्यायचे होते. परंतु अनेकांकडे तेवढेसुद्धा घर नाही.कुटुंब : माझ्या कुटुंबाची माझ्याबद्दल सतत तक्रार असते, म्हणून मला ते नकोसे होतात. परंतु सुख दु:खात तेच माझे खरे वाटेकरी असतात. इतरांच्या वाट्याला तेवढेही सुख नसते.नोकरी : माझे काम मला अजिबात आवडत नाही कारण चोवीस तास मी त्यात गुंतून राहिलेलो असतो. परंतु तेच माझ्या उत्पन्नाचे साधन आहे. आज अनेकांची गुणवत्ता असूनही त्यांना काम मिळत नाही, मी नशीबवान आहे.
अवघ्या तीन गोष्टींनी त्याचा दृष्टीकोन पालटला. अशाच गोष्टींची आपणही यादी केली आणि त्याची सकारात्मक बाजू पाहण्याचा प्रयत्न केला, तर आयुष्यात नावडीच्या गोष्टी काही राहणारच नाहीत.