भंडारातील १०० खाटांचे महिला रुग्णालय अडगळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:26 PM2018-11-14T22:26:18+5:302018-11-14T22:26:42+5:30
जिल्ह्यातील पाच लाख महिलांच्या आरोग्यासाठी शासनाने पाच वर्षांपूर्वी जिल्हा महिला रुग्णालयाला मंजुरी दिली. निधीही उपलब्ध करुन दिला. मात्र अद्यापही १०० खाटांचे महिला रुग्णालय अडगळीत पडून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील पाच लाख महिलांच्या आरोग्यासाठी शासनाने पाच वर्षांपूर्वी जिल्हा महिला रुग्णालयाला मंजुरी दिली. निधीही उपलब्ध करुन दिला. मात्र अद्यापही १०० खाटांचे महिला रुग्णालय अडगळीत पडून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. स्वतंत्र महिला रुग्णालय नसल्याने बाळंतपणासह महिलांच्या आजाराबाबत सामान्य रुग्णालयात उपचार केले जातात. येथे पुरेशा सुविधा नसल्याने महिला रुग्णांची हेडसांड होते. त्याचसाठी शासनाने २०१२-१३ मध्ये स्वतंत्र जिल्हा महिला रुग्णालय मंजूर केले. ४३ कोटी ८० लाख रुपयांचे रुग्णालय मात्र आता अडगळीत पडले आहे. सुरुवातीला जागेचा प्रश्न निर्माण झाला. मात्र रुग्णालयालगतची जागा मंजूर झाली. दोन वर्षांपुर्वी शासनाने २५ लाख रुपये टोकन निधी उपलब्ध करुन दिला. परंतू अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रक तयार केले नाही. शासन या रुग्णालयासाठी सकारात्मक आहे. त्यानंतर चार कोटी २६ लाख रुपये उपलब्ध करुन देण्यात आले. आतापर्यंत साडेचार कोटींचा निधी उपलब्ध झाला असतानाही कारवाई मात्र थंडबस्त्यात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याबाबद गंभीर नसल्याचे दिसून येते.
सदर रुग्णालय तात्काळ व्हावे यासाठी सुरुवातीपासून माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पाठपुरावा केला. मात्र या आंदोलनाचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेना स्टाईल आंदोलने केली. आतापर्यंत शिवसेनेच्या वतीने दहा ते बारा आंदोलने करण्यात आली. दोन महिन्यापूर्वी बांधकाम विभागाच्या कार्यालयात संताप व्यक्त करीत तोडफोडही केली होती. मात्र त्यानंतरही रुग्णालयाचा प्रश्न अडगळीत पडून आहे. महिलांच्या आरोग्याशी निगडीत या प्रश्नावर प्रशासकीय स्तरावर कोणत्याच उपाययोजना होत नसल्याने नागरिकात संताप व्यक्त होत आहे.
महिलांनीच केले होते वर्षभरापूर्वी भूमिपूजन
रुग्णालय मंजूर होऊनही भूमिपूजनाचा मुहूर्त निघत नसल्याने शिवसेनेच्या नेतृत्वात गतवर्षी महिलानीच या रुग्णालयाचे भूमिपूजन केले होते. मात्र त्यानंतरही प्रशासन जागचे हालले नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात महिलांची गैरसोय होत असताना याकडे लोकप्रतिनिधी गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही.
राजकीय स्वार्थासाठी महत्वाच्या प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत. आपण आमदार असतांना या रुग्णालयासाठी पाठपुरावा केला. आता आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे. शासनाने महिलांशी आरोग्याशी निगडीत प्रश्नावर योग्य व तातडीने निर्णय घ्यावा.
-नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार, भंडारा