लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तिसऱ्या लाटेनंतर कोरोनामुक्त झालेल्या भंडारा जिल्ह्यात आता वेगाने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच तब्बल १२६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. दररोज सरासरी १५ रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांची ही वाढती संख्या चौथ्या लाटेचे तर संकेत नाही ना, अशी शंका येत आहे. जिल्ह्यात सध्या ८२ ॲक्टिव्ह रुग्ण असून सर्वाधिक तुमसर तालुक्यात आहे. भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट संपली. २७ मार्च रोजी जिल्ह्यात शेवटचा रुग्ण आढळला होता. शासनाने कोरोना नियमातून सवलत दिली. त्यानंतर कुणीही नियमांचे पालन करताना दिसत नाही. मास्कचा वापर तर सर्वच जण विसरले आहेत. अशा स्थितीत २० मे रोजी एक रुग्ण आढळून आला. सुरुवातीच्या काळात एक-दोन रुग्ण आढळून येत होते. मात्र जून महिन्यात रुग्णांची संख्या हळूहळू वाढायला लागली. जुलै महिन्यात तर दररोज रुग्ण आढळत आहेत. १ जुलै रोजी १२, २ जुलै रोजी १७, ३ जुलै १५, ४ जुलै रोजी ११, ५ जुलै रोजी नऊ, ६ जुलै रोजी १६, ७ जुलै रोजी १५, ८ जुलै रोजी २० आणि शनिवार ९ जुलै रोजी ११ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. नऊ दिवसांत १२६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. यामुळे आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.
दोन व्यक्तींवर रुग्णालयात उपचार
- जिल्ह्यात ८२ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी एक व्यक्ती शासकीय रुग्णालयात तर दुसरी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. ८० व्यक्ती गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. - जिल्ह्यात सध्या ८२ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यात सर्वाधिक ३६ तुमसर तालुक्यातील आहेत. भंडारा २५, पवनी नऊ, लाखनी सहा, मोहाडी तीन, लाखांदूर दोन आणि साकोली तालुक्यात एक रुग्ण आहे. शनिवारी १५ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
शनिवारी ११ नवे रुग्ण- जिल्ह्यात शुक्रवारी ६७० व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात तुमसर तीन, मोहाडी, पवनी, लाखनी येथे प्रत्येकी दोन तर भंडारा आणि साकोली प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना नियमांचे पालन मात्र कुठेही होत नाही.