लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य शासनाने आता १ मार्चपासून खासगी आणि सरकारी रुग्णालयातून लस दिली जाणार होती. यात सोमवारी फक्त शासकीय रूग्णालयांमधून १४० जेष्ठांना लस देण्यात आली. विशेष म्हणजे जिल्ह्यात नेमून दिलेल्या सातही खाजगी रूग्णालयात एकही जेष्ठाला लस देण्यात आली नाही, हे येथे उल्लेखनीय.जिल्ह्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी देण्यात आल्या. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सुटलेले कर्मचाऱ्यांसह ६० वयोवर्ष ओलांडलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयातून नि:शुल्क तर खासगी रुग्णालयात अडीचशे रुपये मोजून लस दिली जात आहे. जिल्ह्यातील सात खासगी रुग्णालयांना कोरोना लस टोचण्याची परवानगी देण्यात आली होती. पहिल्या दिवशी या रुग्णालयातून कुणालाही लस देण्यात आली नाही. २५० रूपये मोजून ही लस घ्यावी लागणार आहे. ६० वर्षे वयोगटातील १३१ व्यक्तींना आणि ४५ ते ६० वयोगटातील नऊ व्यक्तींना कोरोना लस देण्यात आली.
जिल्हा सामान्य रुग्णालय
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आरोग्य विभागासह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर जिल्हाभरातील ज्येष्ठांनाही सोमवारपासून कोरोना लस देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन इमारतीमध्ये ज्येष्ठांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोविड नियमांचे पालन करून प्रत्येकाची नोंदणी केली जात आहे. ऑनलाईनचा तिढा कायम असल्यास ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करून ज्येष्ठांना लस दिली जात आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम यशस्वी झाल्यास जिल्हा भरातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येही ज्येष्ठांसाठी लस उपलब्ध करून दिली जाणार आहे.
आठ ठिकाणी लसीकरण मोहीम
भंडारातील जिल्हा सामान्य रूग्णालयासह दोन तालुक्यातील सर्वच मुख्य तालुका रूग्णालयात १४० जेष्ठांना लस देण्यात आली. यात मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, पवनी आणि लाखांदूर येथील प्रत्येकी एका सेंटरचा समावेश आहे. खासगी रुग्णालय अंतर्गत साकोली येथील पार्वती नर्सिंग होम, पेस हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, इंद्राक्षी आय केअर, नाकाडे नर्सिंग होम, रंगारी नर्सिंग होम, भुरे हॉस्पिटल तुमसर व तुमसर सिटी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात ही लस उपलब्ध करून देण्यात येणार होती. खाजगीमध्ये एकही जेष्ठांना लस देण्यात आली नाही.