लाखनी : तालुक्यातील २० ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडणार आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार मल्लिक वीराणी यांच्या नेतृत्वात तहसील प्रशासनाच्या सहकार्याने निवडणुका घेण्यात येत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकात ४२९ नामनिर्देशन प्राप्त झाले होते. त्यापैकी सहा अर्ज अपात्र ठरले होते. ४२३ अर्ज वैध ठरले होते. यापैकी ९९ अर्ज परत घेण्यात आले. अंतिम उमेदवार संख्या ३२४ आहे. त्यापैकी १० उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या ३१४ आहे. यात १७३ महिलांचा समावेश आहे.
तालुक्यातील सोमलवाडा, परसोडी, सिंदीपार (मुंडीपार), किन्ही, दैतमांगली, रेंगेपार (कोठा), धाबेटेकडी, शिवनी, रामपुरी, डोंगरगाव (साक्षर), सोनमाळा, चान्ना, झरप, लोहारा, सिपेवाडा, रेंगेपार (कोहळी), खैरी, खेडेपार, पोहरा, रेंगोळा या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्र मतदान केंद्रासाठी घेण्यात आले आहे. ६५ मतदान केंद्रावर निवडणूक घेण्यात येणार आहे. पोहरा ग्रामपंचायतच्या निवडणुकीत २७ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक पाचच्या सर्व उमेदवारांनी माघार घेतली आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकात १७३ महिला निवडणूक रिंगणात आहेत, तर १५१ पुरुष निवडणूक लढवीत आहेत. गावाच्या विकासासाठी तरुण युवक-युवती निवडणूक रिंगणात आहेत. अनेक गावात दुय्यम लढत आहेत. दोन पॅनलमध्ये लढत आहेत. निवडणूक प्रचार रंगात आला आहे. उमेदवार दारादारापर्यंत पोहचत आहेत. ग्रामपंचायत निवडणूक गावाच्या व वाॅर्डाच्या विकासासाठी लढविली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
१० सदस्यांची अविरोध निवड
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत १० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. दैतमांगली ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक एकमधून अनुसूचित जमाती स्त्री गटातून वंदना मडावी, प्रभाग क्र. २ मध्ये सर्वसाधारण स्त्री गटातून गीता मडावी, प्रभाग क्र. ३ मध्ये सर्वसाधारण स्त्री गटातून सुषमा सूर्यवंशी अविरोध निवडून आल्या. सिंदीपार (मुंडीपार) ग्रामपंचायतच्या प्रभाग क्र. २ मधून अनुसूचित जाती स्त्री गटातून लता वालदे, धाबेटेकडी ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित जाती स्त्री गटातून प्रभाग क्र. ३ मध्ये उषा गणवीर अविरोध निवडून आल्या. सोनमाळा ग्रामपंचायतच्या प्रभाग क्र. १ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री गटातून गीता इटवले, झरप/कोलारा ग्रामपंचायतच्या प्रभाग क्र. ३ मधून सर्वसाधारण स्त्री गटातून अस्मिता चचाने, खेडेपार ग्रामपंचायतच्या प्रभाग क्र. १ मधून अनुसूचित जमाती स्त्री गटातून सीमा मरस्कोल्हे, प्रभाग क्र. २ मधून अनुसूचित जाती स्त्री गटातून रजनी इलमकार, प्रभाग क्र. ३ मधून अनुसूचित जमाती स्त्री गटातून बबीता मडावी अविरोध निवडून आल्या आहेत. अविरोध निवडून सर्व सदस्य महिला आहेत.
मतदान यंत्रणा सज्ज
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २४० कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण दि. ४ व ९ जानेवारीला घेण्यात आले. तहसीलदार मल्लिक वीराणी यांनी मार्गदर्शन केले . १४ जानेवारीला मतदान साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.