राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या लस अंतर्गत ४५ वयोगटावरील व्यक्तींसाठी नऊ हजार ६०० कोविशिल्ड लस तर १०३० कोव्हॅक्सिन लस उपलब्ध झाली आहे. हा साठा गुरुवारी सकाळी भंडारा जिल्ह्यात दाखल झाला. त्यामुळे येत्या दिवसात लसीकरणाला वेग येण्याचीही शक्यता आहे. जिल्ह्यातील तालुका पातळीवर व भंडारा शहरातही तीन ठिकाणी लसीकरण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना ऑनलाइन आयडी व शेड्युल घेऊनच लसीकरणासाठी जायचे आहे.
बॉक्स
ऑनलाइन नोंदणी आवश्यक
१ मे पासून १८ ते ४४ वयोगटाकरिता लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील विविध केंद्रांवर लस उपलब्ध करून देण्यात आली आहे; मात्र काही ठिकाणी नोंदणी न करताच नागरिक लसीसाठी जात आहेत; परंतु ऑनलाइन नोंदणी नसल्याने त्यांना आल्यापावली परतावे लागत आहे. परिणामी लसीकरणासाठी या वयोगटातील व्यक्तींनी ऑनलाइन नोंदणी करूनच लसीकरणासाठी यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे. यात दिलेल्या लिंगाचा वापर करून ओटीपी व त्यानंतर शेड्यूल घ्यावे, जेणे करून लस घेण्यासाठी नागरिकांना कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
बॉक्स
लसीकरणाचे अपडेट
भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत दोन्ही टप्प्यांतर्गत दोन लक्ष २० हजार ९४६ नागरिकांना देण्यात आली आहे. यात १४ हजार ६०४ हेल्थ केअर वर्कर, १३ हजार ८४६ फ्रन्टलाइन वर्कस, ४५ वयोगटावरील ८१ हजार ९२० तर एक लक्ष सात हजार ४९१ वरिष्ठ नागरिकांना डोस देण्यात आले आहेत. उल्लेखनीय म्हणजे गत सहा दिवसात जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील फक्त तीन हजार ८५ व्यक्तींनी लस घेतली आहे.
कोट
लसीकरण केंद्रात गर्दी होऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. लसींचा साठा मागणीनुसार होत आहे. नागरिकांनी कुठल्याही बाबतीत न घाबरता लस घ्यावी. १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींनी नोंदणी करूनच लसीकरणासाठी जावे. प्रत्येक टप्प्यातील लसीकरण योग्य पद्धतीने सुरू असून, नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.
-माधुरी माथूरकर, जिल्हा लसीकरण अधिकारी, भंडारा.