भंडारा : शहराच्या वाढीव लोकसंख्येसोबतच पाण्याचा प्रश्नही ज्वलंत बनला आहे. शहराची लोकसंख्या दीड लाखांपेक्षा अधिक असून जवळपास २४ हजार ११० घरांची संख्या आहे. मात्र शहरात अधिकृत नळधारकांची संख्या १० हजार १४० असुन सार्वजनिक नळांची संख्या ३४० आहे.
भंडारा शहरात दशकभरात पाणीपुरवठ्याच्या बाबतीत नागरिकांच्या पदरी निराशा हाती लागत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परिणामी नळधारकांची संख्याही वाढलेली दिसून येत नाही. वाढीव पाणी पुरवठा योजनेत नवीन जलवाहिन्यांसह नवीन जलशुद्धीकरण केंद्र निर्माण केले जाणार आहेत. मात्र कोरोना संकटकाळात पाणीपुरवठ्याची कामे प्रभावित झाल्याने ही योजना कार्यान्वित होण्यावर अजून बराच कालावधी लागणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. वाढत्या लोकसंख्येसोबतच नळधारकांची संख्याही वाढेल अशी आशा होती. मात्र जागोजागी जलवाहिनीला लिकेज असल्यामुळे दूषित पाण्याचा मुद्दा ऐरणीवर आला. यात नागरिकांनी आरोग्याला प्रथम प्राधान्य दिले. भंडारा शहराला लागून वाहत असलेल्या वैनगंगा नदीपात्रातून शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो. शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी आधी महाराष्ट्र जल प्राधिकरणाकडे होती. मात्र दशकभरापेक्षा जास्त कालावधी झाला असून याची जबाबदारी भंडारा नगर परिषदेवर आहे. साधनांचा अभाव व जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांमुळे शहरात दूषित पाण्याची समस्या निर्माण झाली. यामुळे अनेक नागरिकांनी नळाच्या पाण्यापेक्षा आरोचे पाणी पिणे सुरु केले.
आजही बहुतांश नागरिकांनी आरोचे पाणी सुरु केल्याने नळधारकांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत नाही. लोकसंख्या व कुटुंबांच्या संख्येनुसार अधिकृतपणे नळधारकांचीही संख्या वाढण्याची गरज होती. मात्र तसे झाले नाही. एकंदरीत गत दहा वर्षांच्या कालावधीत स्थानिक प्रशासन पाण्याच्या बाबतीत नागरिकांचे मन जिंकू शकले नाही.
शहरातही अनधिकृत नळ
भंडारा शहरातील घरांच्या तुलनेत नळधारकांची संख्या कमी असल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत दहा हजार ११० अधिकृत नळधारक असून अनधिकृत नळधारक असल्याचे सांगण्यात येते. मात्र याची एकूण संख्या किती हे सांगणे अशक्यप्राय आहे.
गळती सुरूच
शहरातील जलवाहिनी ही ४० वर्षांपेक्षाही जुनी आहे. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असते. त्यामुळेच अनेक वर्षांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. आजही काही ठिकाणी जलवाहिन्यांमधून पाण्याची गळती सुरुच असल्याचा प्रकारही दिसून येतो.
शहरात वाढीव पाणीपुरवठा योजना
शहरात दीड वर्षांपूर्वी ७० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेली वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी प्रदान करण्यात आली. यातून शहरात नवीन जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनी घालण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला.
वाढीव लोकसंख्येच्या तुलनेत नळधारकांची संख्या वाढत असते. मात्र ही बाब आता नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर दिसून येईल. पाणीपुरवठा विभागामार्फत आलेल्या तक्रारींवर कार्य करीत असते. ज्या ठिकाणी लिकेज किंवा गळती असेल त्या ठिकाणची पाहणी करुन ते त्वरित दुरुस्त करण्यावर आमचा भर असतो. नागरिकांनीही समस्या असल्यास त्या निदर्शनास आणून द्याव्यात. त्या निकाली काढण्यात येतील.
-विनोद जाधव, मुख्याधिकारी, नगरपालिका भंडारा