362 ग्रामपंचायती प्रशासकांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2022 09:06 PM2022-11-08T21:06:32+5:302022-11-08T21:07:48+5:30
सप्टेंबरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माेर्चेबांधणी सुरू झाली हाेती. माेठ्या ग्रामपंचायतीत रणधुमाळी दिसायला लागली हाेती. थेट सरपंच निवडला जाणार असल्याने गावात पॅनेल तयार करून सरपंचपदाच्या उमेदवारांची अनेक गावांत घाेषणाही करण्यात आली हाेती. निवडणुकीचे वातावरण तापायला सुरूवात झाली होती. मात्र, ग्रामविकास विभागाच्या आदेशाने सर्व मेहनतीवर पाणी फेरले आणि आता प्रशासकाची नियुक्ती होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नाेव्हेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ५४० ग्रामपंचायतींपैकी तब्बल ३६२ ग्रामपंचायती आठवड्याभरात प्रशासकांच्या ताब्यात जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून प्रशासक नियुक्तीची धडपड सुरू असून, प्रशासक काळात ग्रामविकासाला खीळ बसण्याची शक्यता आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आदेश काढून ऑक्टाेबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश दिले हाेते. भंडारा जिल्ह्यातील ५४० ग्रामपंचायतींपैकी तब्बल ३६२ ग्रामपंचायतींची मुदत ९ ते १६ नाेव्हेंबर या कालावधीत संपणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर आता प्रशासक नियुक्त केला जाणार आहे.
सप्टेंबरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माेर्चेबांधणी सुरू झाली हाेती. माेठ्या ग्रामपंचायतीत रणधुमाळी दिसायला लागली हाेती. थेट सरपंच निवडला जाणार असल्याने गावात पॅनेल तयार करून सरपंचपदाच्या उमेदवारांची अनेक गावांत घाेषणाही करण्यात आली हाेती. निवडणुकीचे वातावरण तापायला सुरूवात झाली होती. मात्र, ग्रामविकास विभागाच्या आदेशाने सर्व मेहनतीवर पाणी फेरले आणि आता प्रशासकाची नियुक्ती होत आहे.
जिल्ह्यात प्रशासक नियुक्त हाेणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक तुमसर तालुक्यातील ७७, माेहाडी ५८, भंडारा ३९, पवनी ४५, साकाेली ४१, लाखनी आणि लाखांदूर तालुक्यातील प्रत्येकी ५१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाने प्रशासक निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, प्रशासक निवडीचे दिव्य पार पाडावे लागणार आहे. जिल्ह्यात पंचायत विभागात अनेक पदे रिक्त आहेत. एकाएका ग्रामविकास अधिकाऱ्याकडे दाेन ते तीन ग्रामपंचायतींचा कारभार आहे. त्यामुळे ३६२ ग्रामपंचायतींवर प्रशासक निवडताना प्रशासनाची दमछाक हाेणार आहे. विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी यांच्यासह मुख्याध्यापकांचीही प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती गेल्यानंतर गावाचा विकासाला खीळ बसण्याची शक्यता आहे. पंधराव्या वित्त आयाेगातील निधी खर्च करण्याचे अधिकार प्रशासकाच्या हातात येणार आहे. त्यामुळे हा निधी याेग्य प्रमाणात आणि याेग्य कामावर खर्च हाेणार की नाही, याची शंकाही आहे.
किती दिवस राहणार प्रशासकाची सत्ता
- मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर आता प्रशासकांची नियुक्ती केली जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची अद्याप काेणतीही घाेषणा झाली नाही. त्यामुळे पुढील किती दिवस प्रशासकाची सत्ता ग्रामपंचायतीवर राहणार हे मात्र सांगणे कठीण आहे. प्रशासक नियुक्त झाले तरी थेट सरपंचाची निवड हाेणार असल्याने अनेक गावांत आजही माेर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र दिसून येते.
२०१७ मध्ये झाली हाेती ग्रामपंचायत निवडणूक
- जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायतीची निवडणूक २०१७ मध्ये झाली हाेती. ग्रामसभेच्या प्रथम तारखेपासून ग्रामपंचायतीचा कार्यकाळ माेजला जाताे. नाेव्हेंबर २०१७ मध्ये ९ ते १६ नाेव्हेंबरपर्यंत प्रथम ग्रामसभा पार पडल्या हाेत्या. आता त्याच तारखेनुसार ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त केले जाणार आहे.
- गावातील प्रस्थापितांकडून सत्ता खेचून आणण्यासाठी तरुणांनी नवीन समीकरणे ऑगस्ट महिन्यापासून आखणे सुरु केले हाेते. मात्र निवडणुकांऐवजी प्रशासक नियुक्तीचे आदेश आले आणि सर्वांच्या उत्साहावर विरजण पडले. आता निवडणूक कधी हाेणार याकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागले आहे. ताेपर्यंत अनेक समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.