जिल्हा परिषदेत : चार विद्यमान सदस्यांसह चार माजी सदस्यांचे पुनरागमन नंदू परसावार
भंडारा : राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतर भंडाऱ्यात पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणूक झाली. या निवडणुकीत आरक्षणाचा फटका बसल्यामुळे ४८ विद्यमान सदस्यांना निवडणूक लढता आली नाही. त्यामुळे काहींनी सौभाग्यवतींना रिंगणात उतरविले तर काहींनी क्षेत्रबदल करुन निवडणूक लढले. यात काहींना विजय मिळाला तर काहींचा पराभव झाला. आरक्षणामुळे ४८ नवीन चेहऱ्यांना जिल्हा परिषदेत ‘एंट्री’ मिळाली आहे.चार विद्यमान सदस्यांना संधीसन २०१०-१५ या सत्रात सदस्य असलेल्या चार विद्यमान सदस्यांनी क्षेत्र बदलवून निवडणूक लढले आणि विजयी झाले. यात पवनी तालुक्यातील ब्रम्ही क्षेत्रातून राष्ट्रवादीचे राजेश डोंगरे, पिंपळगाव क्षेत्रातून रेखा भुसारी (अपक्ष), तुमसर तालुक्यातील आंबागड क्षेत्रातून भाजपचे संदीप ताले, भंडारा तालुक्यातील खोकरला क्षेत्रातून भाजपचे अरविंद भालाधरे यांचा समावेश आहे.चार माजी सदस्यांचे पुनरागमन यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य असलेले आणि काही काळ बाहेर असलेल्या चौघांचे जिल्हा परिषदेत पुनरागमन झाले आहे. २०००-०५ मध्ये काँग्रेसचे रमेश डोंगरे हे जिल्हा परिषद सदस्य होते. यावेळी ते लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव क्षेत्रातून विजयी झाले. २००५-१० मध्ये पारबता डोंगरे (अपक्ष), विनायक बुरडे (काँग्रेस) आणि नरेश डहारे (शिवसेना) हे सदस्य होते. यावेळी डोंगरे (राकाँ) या पवनी तालुक्यातील अड्याळ क्षेत्रातून, बुरडे (काँग्रेस) हे लाखनी तालुक्यातील पोहरा क्षेत्रातून तर नरेश डहारे (राकाँ) हे भंडारा तालुक्यातील सिल्ली क्षेत्रातून निवडून आले आहेत.दोन हजारांहून मिळाले मताधिक्यया निवडणुकीत जिल्हा परिषदेत रिएंट्री केलेले काँग्रेसचे रमेश डोंगरे हे पिंपळगाव क्षेत्रातून सर्वाधिक ६,०५३ मते घेऊन २,३१५ मताधिक्याने विजयी झाले आहेत. भाजपचे सुभाष आजबले हे पहेला क्षेत्रातून ४,००३ मते घेऊन २,२०६ मताधिक्याने, काँग्रेसचे प्राचार्य होमराज कापगते हे कुंभली क्षेत्रातून ५,२०३ मते घेऊन २,१०४ मताधिक्याने तर काँग्रेसचे प्यारेलाल वाघमारे हे कोथुर्णा क्षेत्रातून ४,५५८ मते घेऊन २,०३२ मताधिक्याने विजयी झाले आहेत. निसटत्या विजयाचे मानकरीया निवडणुकीत ठाणा क्षेत्रातून भाजपचे चंद्रप्रकाश दुरुगकर हे १,६१३ मते घेऊन केवळ आठ मतांनी विजयी झाले. येरली क्षेत्रातून काँग्रेसच्या रेखा ठाकरे या ३,४२५ मते घेऊन २९ मतांनी, कोंढा क्षेत्रातून राष्ट्रवादीचे विवेकानंद कुर्झेकर हे २,७१४ मते घेऊन ४२ मतांनी, पोहरा क्षेत्रातून काँग्रेसचे विनायक बुरडे हे ३,८३८ मते घेऊन ४६ मतांनी तर अड्याळ क्षेत्रातून राष्ट्रवादीच्या पारबता डोंगरे या ३,६४० मते घेऊन ७२ मतांनी विजयी झालेल्या आहेत.डझनावर पदाधिकाऱ्यांचा पराभव त्या-त्या क्षेत्रात प्रभाव असलेल्या असलेल्या तीन पदाधिकाऱ्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अॅड. वसंत एंचिलवार, तुमसरचे सभापती कलाम शेख, लाखनीचे सभापती अशोक चोले, भंडाराच्या सभापती राजश्री गिऱ्हेपुंजे, मोहाडीच्या सभापती विणा झंझाड, माजी उपाध्यक्ष नितीन कडव, माजी सभापती राजकपूर राऊत, नरेंद्र झंझाड, विद्यमान सदस्य विजय खोब्रागडे, अविनाश ब्राम्हणकर, हंसा खोब्रागडे, उपाध्यक्ष रमेश पारधी यांची पत्नी अंजली पारधी, युवराज वासनिक यांची पत्नी दीपा वासनिक यांचा पराभव झाला.कुठे पत्नी,कुठे पतीने मारली बाजीआरक्षणामुळे विद्यमान सदस्यांना निवडणूक लढता न आल्यामुळे काहींनी सौभाग्यवतींना रिंगणात उतरविले तर काही ठिकाणी ते स्वत: निवडणूक लढले. सन २०१०-१५ मध्ये आसगाव क्षेत्रातून काँग्रेसचे विजय सावरबांधे हे जिल्हा परिषद सदस्य होते. आरक्षणामुळे त्यांनी चित्रा सावरबांधे यांना रिंगणात उतरविले. ४,६६६ मते घेऊन त्या विजयी झाल्या आहेत. मोहाडी तालुक्यातून यापूर्वी मंगला कारेमोरे या सदस्य होत्या. आता पाचगाव क्षेत्रातून भाजपचे रामराव कारेमोरे हे ४,०५४ मते घेऊन विजयी झाले. यापूर्वी दिलीप उके हे सदस्य होते. आता वरठी क्षेत्रातून धर्मशिला उके (अपक्ष) या ३,५८८ मते घेऊन विजयी झाल्या आहेत. २००५-१० मध्ये के.बी. चौरागडे सदस्य होते. त्यानंतर त्यांचा पराभव झाला. आता बेटाळा क्षेत्रातून सरिता चौरागडे (अपक्ष) ३,९५३ मते घेऊन विजयी झाल्या आहेत. यावेळी मोहाडी तालुक्यात सातपैकी तीन अपक्षांची जिल्हा परिषदेत वर्णी लागली आहे. तुमसर तालुक्यातील देव्हाडी क्षेत्रातून खेमराज पंचबुद्धे यांची वर्णी लागली असून मागील तीन टर्मपासून याठिकाणी अपक्ष उमेदवारच निवडून येत आहे.