भंडारा : आरटीईअंतर्गत २५ टक्के जागा २०२१-२२ या वर्षाकरिता भरण्यासंदर्भात ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यात भंडारा जिल्ह्यातील ९४ शाळांमध्ये आरटीईच्या ६९१ जागा आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याला बुधवारपासून प्रारंभ झाल्यापासून गुरुवार दुपारपर्यंत १९७ पाल्यांच्या पालकांनी अर्ज सादर केले आहेत.
भंडारा जिल्ह्यात ९४ शाळांपैकी भंडारा तालुक्यात २७, लाखांदूर ४, लाखनी ९, मोहाडी १६, पवनी १२, साकोली १० तर तुमसर तालुक्यात १६ शाळा आहेत. यापैकी भंडारा तालुक्यात २७ शाळांमधून २३९, लाखांदूर १९, लाखनी ७१, मोहाडी १२०, पवनी ७९, साकोली ८६ तर तुमसर तालुक्यात १७७ जागा ऑनलाइन पद्धतीने भरायच्या आहेत. अर्ज सादर करताना एका विद्यार्थ्यासाठी एकच अर्ज सादर करावयाचा आहे. अधिक अर्ज सादर केल्यास पाल्याचा प्रवेश रद्द केला जाऊ शकतो. गुगल ॲपच्या साहाय्याने घराचा पत्ता अचूक असणेही आवश्यक आहे.
बॉक्स
राज्यभरात आरटीईच्या ९,४३१ शाळा असून त्यामध्ये २५ टक्के राखीव जागा अंतर्गत ९६ हजार ६२९ जागा आहेत. ऑनलाइन नोंदणीअंतर्गत गुरुवारी दुपारपर्यंत २९ हजार ६९३ अर्ज ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झाले आहेत. यात भंडारा जिल्ह्यात ७९१ जागांसाठी दोनच दिवसांत १९७ अर्ज प्राप्त झाले आहेत.