ऐन पावसाळ्यात आठ टक्केच जलसाठा

By admin | Published: July 9, 2015 12:32 AM2015-07-09T00:32:32+5:302015-07-09T00:32:32+5:30

पावसाळा ऋतूला सव्वा महिना लोटत असला तरी पावसाने दडी मारलेली आहे.

8 percent water storage in the monsoon | ऐन पावसाळ्यात आठ टक्केच जलसाठा

ऐन पावसाळ्यात आठ टक्केच जलसाठा

Next

जिल्ह्यात ६३ प्रकल्प  वैनगंगा नदीपात्रात मुबलक जलसाठा   जलस्तरात होतेय घट
देवानंद नंदेश्वर भंडारा
पावसाळा ऋतूला सव्वा महिना लोटत असला तरी पावसाने दडी मारलेली आहे. शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ ७.९७ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात ११.७८ टक्क्यानी घट झालेली आहे.
लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ या प्रकल्पात केवळ ७.६४ टक्के जलसाठा आहे. यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़ सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ८़१५, बघेडा २०़१६, बेटेकर बोथली निरंक आणि सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा निरंक आहे़
जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ९़९८ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ४.३० टक्के आहे़
जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे.
गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे़ असे असले तरी शहरातील नागरीकांना पाण्याची टंचाई भासत आहे.
जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ ९़७०६ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षी ८ जुलै रोजी ६३ प्रकल्पात २४.०३९ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ त्याची टक्केवारी १९.७५ एवढी होती. यावर्षी जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमध्ये पाण्याचा अल्प साठा आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. जनावरांसाठी तसेच वन्य प्राण्यांसाठी धोक्याची घंटा निर्माण झाली आहे.

२२ प्रकल्प पाण्याविना
यावर्षी खरीप हंगामात पावसाने दगा दिल्यामुळे जिल्ह्यातील २२ प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे. दोन मध्यम, ९ लघु, तर ११ माजी मालगुजारी, असे एकुण २२ प्रकल्पांचा समावेश आहे. २२ प्रकल्पांमध्ये बेटेकर बोथली, सोरणा, पवनारखारी, डोंगरला, हिवरा, डोडमाझरी, मालीपार, वाही, भिवखीडकी, पिलांद्री, सालेबर्डी, परसोडी, खंडाळा, लवारी, उमरी, कन्हेरी, चान्ना, डोंगरगाव, एकलाझरी, इंदोरा व दहेगावचा समावेश आहे.

Web Title: 8 percent water storage in the monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.