लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर - बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी गावात ९ फुट लांबीचा अजगर आढळला असून गावातील तरुणांच्या मदतीने अजगराला जंगलात सोडण्यात आले आहे. शेत शिवारात प्रथमच अजगराचे बसस्थान दिसून आल्याने शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बिनाखी गोंडीटोला मार्गावर माजी उपसरपंच नकुल पटले यांचे शेत शिवार आहे. गावातील देवका किरणापुरे या पशुपालक महिलेने मालकीच्या शेळ्या चराई करिता नकुल पटले यांच्या शेतशिवारात नेले. शेत शिवारात दबा धरुन असलेल्या अजगराने एका शेळीवर हल्ला केला. शेळीला गिळण्याच्या प्रयत्न करीत असताना शेळीचा आवाज ऐकू आला. शेळीच्या दिशेने देवका किरणापुरे ह्या शेत शिवारात गेल्या असता ९ फुट लांबीचा अजगर बघुन त्यांची भंबेरी उडाली. शेत शिवारात प्रथमत:च अजगर दिसून आल्याने देवका किरणापुरे यांनी आरडा ओरड केला. गावातील तरुण मुले मदतीला धावून आले. शेळीला तावडीत घेतल्यानंतर अजगराने तिथेच सोडले. हल्यात शेळीचा मृत्यू झाला. अजगराला तरुणांनी पकडल्यानंतर शेत शिवारातुन ग्राम पंचायत प्रांगणात आणण्यात आले. लांब असणाऱ्या अजगराला पाहण्यासाठी गावातील महिला व पुरुषांची एकच गर्दी केली. गावातील माजी उपसरपंचे नकुल पटले, सुमित गणविर, रोहीत बघेले, पप्पु शरुन या तरुणाचे मदतीने अजगराला जीवनदान देण्यात आले. अजगरबाबत माहिती बपेराचे क्षेत्रसहायक सी. एम. ऊके यांना देण्यात आली. वन विभागाचे टी.एन. कावडे, एस. एस. शेंडे, एस. एन. कुंभरे व शिवने यांचे उपस्थितीत अजगराला बपेरा शिवारात असणाऱ्या जंगलात सोडून देण्यात आले. शेत शिवारात प्रथमच अजगर आढळल्याने शेतकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिनाखीत आढळला ९ फुटांचा अजगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2017 12:20 AM