मोहाडी : शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कोण काय करेल, याचा नेम नाही. आता हेच बघा ना श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी गाव पुढाऱ्यांच्या मदतीने वयाचे चक्क खोटे दाखले तयार केले. शासनाची फसवणूक करत अनुदान हडपणे सुरू केले. सर्व बिनबोभाट सुरू असताना मोहाडीच्या तहसीलदारपदी परिविक्षाधीन आयएएस अधिकारी मीनल करणवाल यांची नियुक्ती झाली. हा प्रकार त्यांच्या लक्षात येताच शोधमोहीम हाती घेतली. एक-दोन नव्हे तर चक्क ९२८ बनावट वृद्ध आढळून आले. धडसी निर्णय घेत बोगस वृद्धांचे मानधन बंद केले. गत दहा-बारा वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराने शासनाला काेट्यवधींचा चुना लागला.
शासनाच्या वृद्धापकाळ योजनेंतर्गत दरमहा मानधन दिले जाते. या याेजनेच्या लाभासाठी वयाचा दाखला महत्त्वाचा असतो. सर्व कागदपत्रे तहसील कार्यालयात सादर केल्यानंतर गरजू वृद्धांना अनुदानाचा लाभ मिळतो. मात्र, मोहाडी तालुक्यात राजकीय लाभ मिळवून घेण्यासाठी गावागावात स्थानिक पुढाऱ्यांनी तरुणांना म्हातारे केले. आर्थिक व राजकीय लाभ करून घेतला, वयाचे बनावट दाखले तयार केले. ही बाब तहसीलदार, तलाठी, वयाचा दाखला देणारे डॉक्टर, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य यांना माहीत होती. पण, ‘आपण सगळे भाऊ-भाऊ, सगळे वाटून खाऊ’ या धोरणाने दहा-बारा वर्षांपासून हा प्रकार सुरळीत सुरू होता. हा प्रकार तहसीलदारांच्या लक्षात आली असतानाही राजकीय दबावतंत्राने त्यांनी नांगी टाकली होती. बोगस लाभार्थी अनुदान लाटत होते.
गत सप्टेंबर महिन्यात भारतीय प्रशासन सेवेतील मीनल करणवाल मोहाडी येथे परिविक्षाधीन तहसीलदार म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यांनी अल्पकाळात धाडसी निर्णय घेतले. त्यापैकी श्रावणबाळ, वृद्धापकाळ या योजनेतील पात्र-अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. शोधमोहीम सुरू झाली. मुख्याध्यापक व तलाठ्यांना यात सहभागी करून घेतले. त्यांच्याकडून लाभार्थ्यांच्या जन्मतारखेचे साक्षांकित अभिलेख मागविण्यात आले. या दाखल्यांची तपासणी केली तेव्हा सर्वांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. एक-दाेन नव्हे, तर मोहाडी तालुक्यातील ९२८ लाभार्थ्यांच्या वयात तफावत दिसून आली. परिविक्षाधीन तहसीलदार मीनल करणवाल यांनी कारवाई करत ९२८ लाभार्थ्यांचे लाभ तत्काळ बंद केले. यामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.
बॉक्स
हिवरा गावात सर्वाधिक बोगस लाभार्थी
मुख्याध्यापकांनी वयाचे दाखले तहसीलदारांकडे सादर केले. त्याची तपासणी झाली तेव्हा, वयाचे पुरावे असताना डॉक्टरांकडून ६५ वयापेक्षा अधिक वय असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेतल्याचे दिसून आले. तालुक्यातील ५३ गावांतील लाभार्थ्यांनी शासनाचे अनुदान हडपल्याचे सिद्ध झाले. त्यात हिवरा येथील सर्वाधिक ५० लाभार्थी बोगस आढळून आले. त्यापाठोपाठ बोरगाव ३५, करडी ३५, पालडोंगरी ३३, धोप ३२, वरठी व टांगा प्रत्येकी २९, कान्हळगाव सिरसोली २५, नेरी २३, नवेगाव, विहीरगाव, दहेगाव व मांडेसर येथे प्रत्येकी २१, ताडगाव २१, बछेरा १९ तसेच इतर ३९ गावांत १ ते १६ संख्येपर्यंत बोगस लाभार्थी मिळाले. वीस महिलाही वृद्धापकाळ योजनेत वय लपवून शासनाचे अनुदान हडपले आहे.
बॉक्स
महिन्याला वाचले ९२ हजार
मोहाडी येथे तत्कालीन तहसीलदार मीनल करणवाल यांनी बोगस लाभार्थ्यांना शोधून काढले. त्यामुळे एका लाभार्थ्यांस महिन्याला एक हजार मिळणारे अनुदान त्यांनी वाचविले. आता दर महिन्याला ९२ हजार ८०० रुपये शासनाचे वाचत आहेत.