अबब ! धान कोठारात, आधारभूत केंद्रातील धानाचा शेतशिवारात साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:37 AM2021-05-07T04:37:10+5:302021-05-07T04:37:10+5:30
मोहन भोयर तुमसर : धानाचे कोठार म्हणून ख्याती असलेल्या तुमसर तालुक्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर गोदाम हाऊसफुल झाल्याने केंद्रावरील ...
मोहन भोयर
तुमसर : धानाचे कोठार म्हणून ख्याती असलेल्या तुमसर तालुक्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर गोदाम हाऊसफुल झाल्याने केंद्रावरील धान दुसऱ्या गावाच्या शेत शिवारात साठा करून ठेवले आहे. मागील सहा महिन्यांपासून खरीप हंगामातील धान गोदामात पडून आहे. काही शेतकऱ्यांकचे धानाची मोजणीसुद्धा अजूनपर्यंत झाली नाही, अशी माहिती आहे. आता रबी हंगामातील धान विक्रीला आल्यावर कुठे ठेवावे, असा प्रश्न धान केंद्रांना पडला आहे. खुल्या आभाळाखाली हे धान ठेवल्याशिवाय केंद्रसंचालकापुढे पर्याय शिल्लक नाही. येथे प्रमुख धान उत्पादक तालुक्यात नियोजनाचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे.
तुमसर तालुक्याला धानाचे कोठार असे संबोधले जाते. राज्यात प्रमुख धान उत्पादक तालुका म्हणून नोंद आहे. सिंचनाच्या सोयी- सुविधा उपलब्ध असल्याने खरीप व रबी दोन्ही हंगामांत धानाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. मागील खरीप हंगामात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी धान विक्री केले. सिहोरा येथील एका आधारभूत धान केंद्रावर गोदाम हाऊसफुल झाले. त्यामुळे नाइलाजाने केंद्र संचालकांनी सिलेगाव येथील शेत शिवारात धानाचा पर्यायी व्यवस्था म्हणून साठा करून ठेवला आहे. मागील सहा महिन्यांपासून धानाचे गोदाम हाऊसफुल भरून आहेत. त्यामुळे केंद्रावरील धान कुठे ठेवावे, असा प्रश्न केंद्र संचालकापुढे उभा आहे. पर्यायी व्यवस्था केंद्र संचालकांना नाइलाजास्तव करावीच लागते.
धानाची उचल होत नसल्यामुळे धान खराब होण्याच्या मार्गावर आहे. उंदरासारखे प्राणी अनेक ठिकाणे धान फस्त करीत आहेत. धान खरेदी केंद्र खेडेगावात असून शेत शिवारात लागून आहेत. त्यामुळे उंदरांचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे.
मागील खरीप हंगामात तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली. त्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्रातील गोदाम हाऊसफुल झाले आहे. गोदामाच्या बाहेरही ताडपत्री झाकून धानाची पोती ठेवण्यात आलेली आहेत. काही धान खरेदी केंद्रांवरील धानाची उचल मागील सहा महिन्यांपासून झाली नाही. तसेच मागील खरीप हंगामातील काही शेतकऱ्यांची धान मोजणीसुद्धा झाली नाही, अशी तक्रार पं. स. सदस्य हिरालाल नागपुरे यांनी केली आहे.
रबीचे धान कुठे ठेवणार : खरीप हंगामातील धानाची उचल अजूनपर्यंत झाली नाही. त्यामुळे गोदाम सध्या हाऊसफुल आहेत. रबबीचे धान आता निघण्याच्या मार्गावर आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर उन्हाळी धान विक्री करता गेल्यास धान कुठे ठेवावे, असा प्रश्न शेतकऱ्यासोबतच आधारभूत धान खरेदी केंद्र संचालकांना पडला आहे. त्यामुळे तात्काळ खरीप हंगामातील धानाची उचल करून गोदाम रिकामे करण्याची गरज आहे. अवकाळी पावसात हे धान खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नियोजनाचा फज्जा : दरवर्षी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान्य विक्री केल्यानंतर काही महिने धानाचे गोदाम हाऊसफुल राहते त्यानंतर प्रशासनाकडे तगादा लावल्यानंतर गोदामातून धानाची उचल करण्यात येते; परंतु दरवर्षी नियोजनाचा फज्जा येथे उडत आहे.
बॉक्स
‘मागील सहा महिन्यांपासून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे गोदाम हाऊसफुल आहे. रबी धान कुठे ठेवावे, असा प्रश्न आहे. खरीप हंगामातील धानाची मोजणी काही केंद्रांवर झाली नाही. सिलेगाव येथील शेत शिवारात सिहोरा येथील धान केंद्राचे धान ठेवण्यात आले आहे.
- हिरालाल नागपुरे, पं. स. सदस्य, सिलेगाव क्षेत्र.