विदर्भातील एका बड्या नेत्याचे दोषींना अभय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 05:49 AM2021-01-12T05:49:41+5:302021-01-12T05:50:16+5:30
रुग्णालयातील ‘इन बॉर्न युनिट’ व ‘आऊट बॉर्न युनिट’मध्ये काचेची भिंत आहे. नियमानुसार या दोन्ही कक्षांत २४ तास डॉक्टर, परिचारिका, अटेंडंट व बाहेर सुरक्षारक्षक असावे लागतात
नागपूर : भंडारा येथील नवजात शिशू अग्निकांड प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी विदर्भातील एका बड्या नेत्याने दबाव निर्माण केला असून आता हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. घटनेनंतर कर्तव्यावर असलेले डॉक्टर, परिचारिका, अटेन्डंट, सुरक्षारक्षक जागे झाले. हे स्पष्ट दिसत असूनही कोणावरही अद्याप कारवाई झाली नाही. धक्कादायक म्हणजे, घटनेच्या दिवशी ‘एसएनसीयू’मध्ये कर्तव्यावर असलेल्यांची नावेही सांगण्यास अधिकारी तयार नाहीत. यामागे या नेत्याचा दबाव असल्याचे सांगण्यात येते.
रुग्णालयातील ‘इन बॉर्न युनिट’ व ‘आऊट बॉर्न युनिट’मध्ये काचेची भिंत आहे. नियमानुसार या दोन्ही कक्षांत २४ तास डॉक्टर, परिचारिका, अटेंडंट व बाहेर सुरक्षारक्षक असावे लागतात. कक्षात सोय नसेल, तर बाजूच्या काचेच्या कक्षातून नजर ठेवावी लागते. प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या रात्री तिथे डॉक्टर उपस्थित नव्हते. दोन परिचारिका व एक अटेंडंट होता. परिचारिका रात्री १० च्या सुमारास ‘एसएनसीयू’ला बाहेरून बंद करून झोपण्यासाठी बाजूच्या कक्षात गेली. ‘आऊट बॉर्न युनिट’ला आगीला सुरुवात होण्यापासून तीन बालकांचा जळून, तर सात बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू होईपर्यंत कोणाचेच लक्ष गेले नाही. जेव्हा धूर ‘एसएनसीयू’मधून बाहेर येऊ लागला, तेव्हा कुठे प्रशासन जागे झाले. यावरून कर्तव्यावर असलेल्यांचा कसूर स्पष्ट दिसून येतो. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. दोन दिवसांपासून चौकशी समितीचे सदस्य भंडाऱ्यात तळ ठोकून आहेत. परंतु, दोषींना अद्यापही समोर केलेले नाही.