जिल्ह्यात पडली नवीन १,०९२ बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:34 AM2021-03-19T04:34:23+5:302021-03-19T04:34:23+5:30
गोंदिया : कोरोनाने पुन्हा एकदा पाय पसरण्यास सुरुवात केली असून, जिल्ह्यातील बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना दिसत आहे. फेब्रुवारी ...
गोंदिया : कोरोनाने पुन्हा एकदा पाय पसरण्यास सुरुवात केली असून, जिल्ह्यातील बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा हा उद्रेक दिसत असला तरी नववर्षात जिल्ह्यात १,०९२ बाधितांची भर पडली आहे. मात्र, आता परिस्थिती पुन्हा चिघळत चालली असल्याचे दिसत आहे.
सन २०२० मध्ये मार्च महिन्यातच कोरोना देशात शिरला होता व त्याने अवघ्या देशाला हेलावून सोडले होते. वर्षभराचा काळ कोरोनातच गेला व दिवाळीनंतर रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना दिसत होती. त्यानंतर रुग्णसंख्या घटत गेल्याने दिलासा मिळाला होता. अशात डिसेंबर महिन्यात केंद्र शासनाने देशातीलच २ लसींना मंजुरी दिल्यानंतर नववर्षात १६ जानेवारीपासून अवघ्या देशात लसीकरणाला सुरुवात झाली. नववर्षातील हा जानेवारी महिना दिलासा देणारा ठरला असतानाच फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. बघता-बघता फेब्रुवारी महिना गेला व मार्च महिन्यात कोरोनाने आपले पाय पसरण्यास सुरुवात केली असून, बाधितांच्या संख्येत भर पडू लागली आहे. नववर्षातील मार्च महिन्यातील १६ तारखेपर्यंतची आकडेवारी बघितल्यास जिल्ह्यात १,०९२ बाधितांची भर पडली आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात ४६९, फेब्रुवारी महिन्यात २४२, तर मार्च महिन्यातील १६ तारखेपर्यंत ३८१ नवीन बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नववर्षातील आतापर्यंत काळ चांगला गेला.