प्रगतीच्या प्रशिक्षणात ‘अ’प्रगत व्यवस्था
By admin | Published: February 15, 2017 12:22 AM2017-02-15T00:22:20+5:302017-02-15T00:22:20+5:30
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा प्रगत करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
शिक्षण विभागाचे नियोजन : अखिल सभागृहात बैठक व्यवस्थेअभावी अनेक जण बाहेर
भंडारा : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा प्रगत करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या अनुषंगाने आज गणेशपूर येथील अखिल सभागृहात जलद, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण ठेवण्यात आले. मात्र सभागृहात बैठक व्यवस्था अपुरी असतानाही त्या तुलनेत मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणार्थ्यांना बोलाविण्यात आले होते. त्यामुळे शिक्षण विभागाने टाकलेले प्रगतीचे पहिले पाऊलच अप्रगत ठरल्याचे दिसून आले.
जिल्हा परिषद शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी प्राथमिक म्हणून रविकांत देशपांडे यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी आल्याआल्याच कामामध्ये दिरंगाईपणा करणाऱ्यांची ‘कासरे’ आवरली आहेत. जिल्हा परिषदच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसह खासगी शाळा प्रगतीपथावर नेण्याच्या दृष्टीने राज्य सरकारच्या निर्देशानुसार अंमलबजावणी करण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे. या अनुषंगाने आज गणेशपूर येथील अखिल सभागृहात जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खासगी, प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक तथा ग्रामसेवकांना एकदिवसीय प्रशिक्षणासाठी बोलाविण्यात आले होते. अखिल सभागृहाची बैठक व्यवस्था ७०० ते ९०० च्या घरात असताना शिक्षण विभागाने याची शहानिशा न करता जिल्ह्यातील सुमारे हजारावर शिक्षक व ग्रामसेवकांना येथे बोेलविले. ग्रामसेवक तथा शिक्षक सकाळी ११ वाजता सभागृहात उपस्थित झालेत. मात्र नियोजनाअभावी बैठक व्यवस्था अपुरी असल्याने अनेक ग्रामसेवक तथा शिक्षकांना बसायला जागा मिळाली नाही. सुमारे दोन तास ग्रामसेवक व मुख्याध्यापक सभागृहाबाहेर उभे होते. अनेकांनी या प्रशिक्षणाला पाठ दाखवून बाहेरूनच परस्पर निघून गेल्याचे चित्र बघायला मिळाले. (शहर प्रतिनिधी)
ग्रामसेवक परतले
ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगातून लाखोंचा निधी प्राप्त झाला. १५ टक्के निधी शिक्षणावर खर्च करावयाचा आहे. शिक्षक व ग्रामसेवकांमध्ये समन्वय साधता यावे यासाठी ग्रामसेवकांना बोलाविण्यात आले. मात्र बैठक व्यवस्था नसल्याने ग्रामसेवकही आल्यापावली परतले.
प्रशिक्षणात याचा आहे समावेश
या एकदिवसीय प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थ्यांना शाळासिद्धी, डिजीटल शाळा, ई-लर्निंग व जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र यांची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात येणार होती. मात्र ११ वाजतानंतरही काही तज्ज्ञ सभागृहात उपस्थित न झाल्याने आलेल्यांना ताटकळत राहावे लागल्याने शिक्षण विभागाप्रती त्यांच्यात असंतोष दिसून आला.
यालाच ‘प्रगत’ प्रशिक्षण म्हणायचे काय?
जलद व प्रगत शैक्षणिक प्रशिक्षणाच्या नावावर शिक्षण विभागाने जिल्हाभरातील मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक व ग्रामसेवकांना एकाच वेळी सभागृहात बोलाविले. जागेअभावी अनेकजण सभागृहाबाहेर उभे होते. यावेळी सभागृहात तज्ज्ञ तथा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून उपस्थित प्रगतीचे धडे दिल्या जात होते. यावरूनच सभागृहात एक तर सभागृहाबाहेर दुसरीच परिस्थिती दिसून येत असल्याने प्रगत प्रशिक्षण म्हणावे काय? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.