शाळा सुरू करण्याची शिक्षण विभागाला लगबग सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन निकषांच्या आधारावर शाळा सुरू करायची असे नियोजन केले होते. मात्र ग्रामपंचायत करवी समिती तयार करून शाळा सुरू करण्याचा पुढाकार घ्यायला हवा होता. मात्र शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभाग तत्पर दिसला. कोविडमुक्त गावातील शाळा सुरू करण्यासंदर्भात परिपत्रक ७ जुलै रोजी जारी करण्यात आले होते. त्यानुसार गुरूवारी इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यात आले होते.
दुसऱ्या लाटेनंतर अनेक विद्यार्थी गुरूवारी शाळेत पोहोचले. शाळेच्या प्रवेशद्वारावरच प्रत्येक विद्यार्थ्यांची थर्मल स्कॅनिंग करण्यात आली. तत्पूर्वी वर्गखोल्या ही सॅनिटाईज करण्यात आल्या होत्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. वर्गातही विद्यार्थी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बसलेले दिसत होते. चार महिन्यानंतर पुन्हा शाळेत मित्र मिळाल्याने पहिला दिवस गप्पा आणि कोरोना काळातील अनुभव सांगण्यात गेला.
विद्यार्थ्यांना मास्कच्या वापरासोबतच एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था असेल यावर भर देण्यात आल्याचे दिसून आले. कुठल्याही विद्यार्थ्याला काही आजार तर नाही ना याबाबतही विचारपूस करण्यात आली. शैक्षणिक वर्ग २०२१-२०२२ मध्ये शाळा नियमित सुरू राहून अभ्यासक्रम पूर्ण शिकविला जावा अशी इच्छा ही याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी बोलून दाखविली. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळेचा परिसर गजबजून गेला.
बॉक्स
शाळेच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनिंग
तब्बल चार महिन्यानंतर पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग गुरूवार पासून सुरू करण्यात आले. विद्यार्थी शाळेत पोहोचताच प्रवेशद्वारावर प्रत्येकाची थर्मल स्कॅनिंग करण्यात येत होती. याशिवाय स्वच्छतेबाबत त्यांना दिशा निर्देश ही देण्यात येत होते. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक नियमांची माहिती देण्यासोबत लसीकरणाबाबत ही सांगत होते.