कृषी कर्मचारी शेतकऱ्यांच्या भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 10:26 PM2018-02-05T22:26:07+5:302018-02-05T22:27:02+5:30
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे यासाठी शासनाने विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे.
मुखरु बागडे ।
आॅनलाईन लोकमत
पालांदूर चौ. : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे यासाठी शासनाने विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे. मात्र, नियोजनाअभावी शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावे लागते. शेतकऱ्यांना अशा योजनांचा लाभ मिळावा, यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी आता थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यांनी पुढाकार घेतला आहे.
विविध योजनेत सुक्ष्म सिंचन, मागेल त्याला शेततळे, अनुदानावर कृषी अवजारे भाजीपाला उत्पादन व विक्री व्यवस्थापन मार्गदर्शन, फळबाग लागवड, भातखाचरे दुरुस्ती, गांढूळ खत प्रकल्प आदी कल्याणकारी योजना राबविण्यात उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोळके व कृषी कर्मचारी पुढाकार घेतला आहे. पालांदूर परिसरात नरव्हा, पाथरी, मऱ्हेगाव, ढिवरखेडा, पालांदूर येथील ५० च्या अधिक शेतकरी नव्या तंत्रात शेती कसायला सरसावले आहेत. दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी खोल जात आहे. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांकडे शाश्वत सिंचन सुविधा नसल्यामुळे दुबार पिके घेण्यास मर्यादा येतात. शेततळे कोरडवाहू शेतकºयांसाठी वरदान ठरले आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत अनुदानावर राबविण्यात येणाऱ्या सुक्ष्मसिंचन योजना व मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात येत आहे.
शेतकºयांना भेडसावणारी दुसरी समस्या म्हणजे मजुर व मजुरांचा वाढता खर्च यावर मात करण्याकरिता कृषी विभागामार्फत शेतकºयांना अनुदानावर ट्रॅक्टर व इतर कृषी उपयोगी अवजारे पुरविण्याकरिता कृषी यांत्रिकीकरण कार्यकम राबविण्यात येत आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांकरिता मदतीचा हाथ देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविली जात आहे. मग्रारोहयो योजनेंतर्गत कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांना नाडेप टाके, गांढुळ खत, निर्मिती टाके, फळबाग लागवड, भातखचारे दुरुस्ती आदी कल्याणकारी योजना राबविलया जात असून अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अंतर्गत शेतकरी सरसावला आहे.
शेतकऱ्यांनी एकट्याने शेती करण्यापेक्षा गटागटाने शेती करावी. यामुळे शेती कसायला व मार्केटिंगला मोठी मदत होते. कृषी विभाग नेहमीच शेतकऱ्यांसोबत आहे.
- पी.पी. गिदमारे, तालुका कृषी अधिकारी, लाखनी
शेतकऱ्यांना विविध योजनेंतर्गत अनुदानावर कृषी साहित्य मिळत आहे. शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंतचे पीक व्यवस्थापन मार्गदर्शन आवश्यक आहे. सोबतच नवनवे पीक उत्पादाकरिता तंत्रशुध्द अभ्यास द्यावा.
- उत्तम मेंढे, प्रगतशिल उच्चशिक्षीत शेतकरी, लोहारा
कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयापेक्षा शेतात अधिक वेळ द्यावा. वेळोवेळी येणाऱ्या अडचणींचा अभ्यासपूर्ण नियोजन करीत शेतकऱ्यांना सहकार्य करावे.
- घनश्याम भेदे, भेंडी उत्पादक शेतकरी, पालांदूर