जिल्ह्यातील तीनही आमदार कसतात शेती; सेंद्रीय शेतीकडे ओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2022 05:00 AM2022-02-20T05:00:00+5:302022-02-20T05:00:48+5:30
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले खऱ्या अर्थाने शेतकरीपुत्र आहेत. वंशपरंपरागत शेती हाच त्यांचा व्यवसाय आहे. पूर्वी शेतात स्वत: ट्रॅक्टर चालवून शेती कसायचे. परंतु, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्याने पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र, सुकळी गावात आले की, एक चक्कर शेतावर मारतातच. सेंद्रिय भाजीपाला घेण्याकडे त्यांचा कल असून घरी गायीसुद्धा आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राजकारण आणि समाजकारण करताना कितीही व्यस्त असले, तरी मुळात शेतकरी असलेले जिल्ह्यातील तीनही आमदार वेळात वेळ काढून शेतीकडे लक्ष देतात. आधुनिक तंत्रज्ञानाची जाेड देत सेंद्रिय शेतीही करीत आहे. भंडाराचे आमदार नरेंद्र भाेंडेकर यांनी आपल्या शेतात सेंद्रिय भाजीपाल्याची लागवड सुरू केली, तर तुमसरचे आमदार राजू कारेमाेरे आपल्या भावाच्या मदतीने शेतीचे याेग्य नियाेजन करतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले आपल्या व्यस्त वेळापत्रकातही सुकळी या आपल्या गावी आले की, शेतात गेल्याशिवाय राहत नाही.
व्यस्ततेतही सुकळीच्या शेतात पटाेलेंचा फेरफटका
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले खऱ्या अर्थाने शेतकरीपुत्र आहेत. वंशपरंपरागत शेती हाच त्यांचा व्यवसाय आहे. पूर्वी शेतात स्वत: ट्रॅक्टर चालवून शेती कसायचे. परंतु, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्याने पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र, सुकळी गावात आले की, एक चक्कर शेतावर मारतातच. सेंद्रिय भाजीपाला घेण्याकडे त्यांचा कल असून घरी गायीसुद्धा आहेत.
उत्पादनवाढीकडे राजू कारेमाेरेंचे लक्ष
राइस मिल असाेसिएशनचे अध्यक्ष असलेले आमदार राजू कारेमाेरे मुळात शेतकरी. त्यांच्याकडे ५० एकर शेती असून आपल्या लहान भावाच्या मदतीने ते शेतीचे नियाेजन करतात. धान, तूर, लाखाेरी, गहू, पाेपट, चणा, हरभरा आदी पिकांचे नियाेजन केले जाते. शेती हा २४ तासांचा आणि जाेखमीचा व्यवसाय आहे, असे सांगतच त्यांनी कृषी विभाग शेतकऱ्यांना याेग्य मार्गदर्शन करत नसल्याची खंत व्यक्त केली.
नरेंद्र भाेंडेकर अल्पभूधारक शेतकरी
भंडाराचे आमदार नरेंद्र भाेंडेकर अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. शेतीत नवनवीन प्रयाेग करून शेती कसतात. यावर्षी त्यांनी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लावला आहे. घरी खाण्यासाेबतच सेंद्रिय भाजीपाल्याची ते विक्रीही करतात. शेतात साेलरपंप लावणार असल्याचे सांगत शेतीसाठी मनुष्यबळ मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.