आदर्श नगर येथील रस्त्याचे बांधकाम निकृष्ट होत असल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:36 AM2021-01-23T04:36:16+5:302021-01-23T04:36:16+5:30
सदर बांधकाम गोंदिया येथील एका खासगी कंपनीकडे असून, रेतीऐवजी दगड आणि मातीच्या चुरीचा वापर करून आणि सिमेंटच्या वापर न ...
सदर बांधकाम गोंदिया येथील एका खासगी कंपनीकडे असून, रेतीऐवजी दगड आणि मातीच्या चुरीचा वापर करून आणि सिमेंटच्या वापर न करता तसेच नगरपंचायतीच्या नियमानुसार रस्ता बांधकाम करत नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्या रस्त्याचे विनापाणी काम सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. या निवेदनात नागरिकांनी असेही म्हटले आहे की, रस्ता बांधकाम करत असताना रस्त्याच्या एका बाजूकडील पाणी दुसऱ्या बाजूला सहज निघून जावे, याकरिता पीव्हीसी पाईपचा वापर करणे गरजेचे होते. परंतु या पीव्हीसी पाईपची नगरपंचायतीच्या अनियमित आणि दुर्लक्षतेमुळे सदर काम त्या अंदाजपत्रकात योग्य प्रकारे मांडले न गेल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात पूर किंवा जास्त पाऊस आल्यास त्या भागात पाण्याचा निचरा होणार नाही. अस्वच्छता आणि दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर लाखनी नगरपंचायतीचे नगरसेवक ॲड. कोमल गभने यांनी वेळीच पुढाकार घेऊन कामाची पाहणी करून योग्य काम करण्याबाबत कंत्राटदारांशी चर्चा केली. कामांमध्ये अनियमितता आढळल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी दिला. याबाबत नागरिकांनी नगरपंचायतीला आतापर्यंत या कामाबाबत दोनदा निवेदन दिले असून, नगरपंचायत निवेदनाला केराची टोपली दाखवत असल्याचे मत आदर्श नगर येथील रहिवासी अशोक नवघरे, विजय दुबे, थांसिंग बिसेन, पटले गुरुजी, रुपेश गभने, जय देव गभने, राजहंस टेंभुर्णे, राजेश टेंभुर्णी, दादाराम चोपकर यांनी यावेळी व्यक्त केले.