सात तान्हुल्यांसाठी ठरले देवदूत, बालकांचे वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 06:17 AM2021-01-10T06:17:58+5:302021-01-10T06:19:05+5:30
रुग्णवाहिका चालक राजकुमार दहेकर व राहुल गुप्ता यांनी सांगितले की, पहाटे सुरक्षारक्षक गौरव रेहपाडे व शिवम मडावी यांचा रुग्णालयात आग लागल्याचा फोन आला
सुमेध वाघमारे
भंडारा : स्वत:च्या जिवाची पर्वा न करता चार युवकांनी पहिल्या मजल्यावर शिडीच्या मदतीने चढत, ‘एसएनआयसीयू’ कक्षाचे दार तोडून ७ बालकांना बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. ही सर्व बालके सुखरूप असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या युवकांमध्ये दोन रुग्णालयाचे सुरक्षारक्षक तर दोन खासगी रुग्णवाहिकेचे चालक आहेत. या युवकांनी दहा बालकांना वाचवू शकलो नाही, अशी खंतही व्यक्त केली.
रुग्णवाहिका चालक राजकुमार दहेकर व राहुल गुप्ता यांनी सांगितले की, पहाटे सुरक्षारक्षक गौरव रेहपाडे व शिवम मडावी यांचा रुग्णालयात आग लागल्याचा फोन आला. आम्ही तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. पहिल्या मजल्यावरून धूर बाहेर येत होता. मागील भागातून शिडीने पहिल्या मजल्यावर पोहोचलो. कक्षाचे दार आतून बंद होते. ते तोडले. नाकातोंडात धूर गेला. तोंडाला रुमाल बांधून समोर गेलो. सर्वत्र अंधार होता. खिडक्यांच्या काचा फोडल्या. धूर कमी झाल्यावर बालकांना बाहेर काढणे सुरू केले. दोन हातांनी दोन बालकांना पकडून सहकाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढले.