आर्त किंकाळ्यांनी हादरला रुग्णालय परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:27 AM2021-01-10T04:27:28+5:302021-01-10T04:27:28+5:30
या घटनेची माहिती होताच पहाटे ३ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक ...
या घटनेची माहिती होताच पहाटे ३ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी रुग्णालयात धाव घेतली. मदत कार्यासाठी सूचना देण्यात आल्या. तोपर्यंत आगीची ही वार्ता क्षणभरात शहरभर पसरली. अनेकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र पोलिसांचा तगडा बंदोबस्त कुणालाही आत जाऊ देत नव्हता. रुग्णालयाबाहेर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. गर्दीला आवरणे कठीण झाले. तेव्हा पोलिसांनी राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्यांना पाचारण केले. सकाळ होता होता राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर, तुमसरचे आमदार राजू कारेमोरे, आमदार डॉ. परिणय फुके, माजी आमदार चरण वाघमारे यांनी भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले. रुग्णालय प्रशासनाला सूचना केल्या.
बॉक्स
आगीच्या घटनेची सखोल चौकशी करा -सुनील मेंढे
जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी आहे. जग पाहण्याच्या आधीच जगाचा निरोप घ्यावा लागणाऱ्या बालकांच्या मृत्यूचे राजकारण करणे हा विषय नाही. परंतु आगीमागचे कारण स्पष्ट होणे व दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यासाठी सखोल चौकशी करावी आणि या आगीत मृत्युमुखी पडलेल्या बालकाच्या परिवाराला दहा लाख रुपये द्यावे, अशी मागणी भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे यांनी केली.
दोषींवर कारवाई व्हावी -राजू कारेमोरे
ही घटना दु:खदायक आहे. या प्रकरणाला जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाई व्हावी, चौकशीअंती सर्व कळेलच. हलगर्जीपणा आहे की आणखी काय हे लवकरच कळेल, असे तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी सांगितले.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा -चंद्रशेखर बावनकुळे
मी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. निष्काळजीपणामुळेच ही घटना घडली. रुग्ण कल्याण समितीने दुरुस्तीची मागणी केली. प्रस्ताव गेला. परंतु दुरुस्ती झाली नाही. केवळ निष्काळजीपणा याला जबाबदार आहे. सरकारने चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृत बालकांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये मदत द्यावी, तसेच अशा घटना महाराष्ट्रात होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी, असे भंडाऱ्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
दोषींना तत्काळ निलंबित करा -आमदार नरेंद्र भोंडेकर
जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेली घटना सुन्न करणारी आहे. निष्पाप चिमुकल्यांचा यात बळी गेला. या प्रकरणात जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे तसेच बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली.
अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवा - चरण वाघमारे
जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेला अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली.
दुर्दैवी व वेदनादायी घटना -प्रफुल्ल पटेल
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागून दहा नवजात बालकांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या घटनेमुळे नवजात बालकांच्या कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. या संकटातून सावरण्याची त्यांना शक्ती देवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशी घडली, याची चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोषींवर निश्चितच कारवाई केली जाईल. या संपूर्ण घटनेकडे राज्य शासनाचेसुद्धा गांभीर्याने लक्ष आहे. सदर घटनेसंदर्भात अनिल देशमुख यांच्यासोबत चर्चा केली. त्यांना तातडीने सामान्य रुग्णालयाला भेट देऊन कारवाईसंदर्भात सांगितले, असे राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
अतिशय दुर्दैवी घटना - राजेंद्र जैन
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीत दगावलेल्या दहा नवजात शिशूंना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या मृत्यूमुळे मातांसह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ईश्वर त्यांना दु:ख सहन करण्याची शक्ती प्रदान करो. ही घटना अतशय दुर्दैवी आहे, असे गोंदियाचे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सांगितले.